

पणजी: बेतोडा जंक्शन परिसरात बुधवारी मृत पावलेले होमगार्ड दिनेश गावडे यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचे म्हणत याबाबत चौकशी करण्याची मागणी वन खात्याने दक्षिण गोवा अधीक्षकांकडे पत्राद्वारे केल्यानंतर वन खात्याचे पत्र आणि गावडेंच्या शवविच्छेदन अहवालाची प्रत सोशल मीडियावर झळकली.
त्यामुळे दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील फॉरेन्सिक विभागाचे साहाय्यक प्राध्यापक डॉ. मधू घोडकिरेकर यांनी वन खात्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शवविच्छेदन अहवालात गावडेंचा मृत्यू शिंगाच्या जखमेमुळे झाल्याचे नमूद केले असतानाही वन खात्याने पोलिसांना पत्र पाठवलेच कसे? असा सवाल उपस्थित करीत वन खात्याचा दावा डॉ. घोडकिरेकर यांनी फेटाळून लावला. गावडे यांच्या मृत्युबाबत संशय व्यक्त करीत या घटनेची सखोल चौकशी करण्याचे पत्र वन खात्याने दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांना पाठविल्यानंतर आणि या पत्रासह शवविच्छेदन अहवाल सोशल मीडियाद्वारे सार्वजनिक झाल्यानंतर डॉ. घोडकिरेकर यांनीही यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
१. ‘‘फॉरेन्सिक मेडिसीन विभागाकडून प्रसिद्धीपत्रक जारी करणे असामान्य असले तरी, गावडे यांच्या मृत्यूसंदर्भात वन खात्याने दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांना ९ मे रोजी पाठवलेल्या पत्रामुळे प्रसारित होत असलेल्या मतांबाबत माध्यमांना तातडीने स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे.
२. वन विभागाच्या पत्रात गावडे यांच्या शवविच्छेदन अहवालासंदर्भात काढलेले निष्कर्ष पूर्णत: चुकीचे असून, ते वैद्यकीय तज्ज्ञांचे मत न घेता काढले आहेत. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पशुवैद्यकीय डॉक्टरांचे मत घेतले असेल, तर त्यांना मानवी मृतदेहाच्या अहवालावर मत देण्याचा अधिकार नाही.’’
३. ‘‘गावडे यांचा शवविच्छेदन अहवाल फॉरेन्सिक मेडिसीन विभागाने पोलिसांव्यतिरिक्त कोणालाही दिलेला नाही. पोलिस तपास अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, त्यांनीही वन विभागाव्यतिरिक्त कोणालाही प्रत दिलेली नाही, असे सांगितले.
४. तरीही वन विभागाच्या पत्राची आणि शवविच्छेदन अहवालाची प्रत सोशल मीडियावर कशी काय प्रसारित झाली? फौजदारी तपास प्रक्रियेतील अटींचे हे उल्लंघन आहे. हा एका आदिवासी तरुणाचा मृत्यू असल्याने प्रत्येक जबाबदार अधिकाऱ्याने हे दस्तऐवज अत्यंत गुप्ततेने आणि संवेदनशीलतेने हाताळणे गरजेचे होते.’’
५. गवा हा दोन शिंगे असलेला महाकाय प्राणी आहे. परंतु, मृत व्यक्तीच्या गुदद्वाराच्या मध्यभागी असलेली एकच खोलवर गेलेली जखम संशय निर्माण करते. ती केवळ ७ सेंटीमीटर लांबीची आहे. ६. या जखमेव्यतिरिक्त शवविच्छेदन अहवालात मानेच्या डाव्या भागावर असलेली लाल रंगाची आणि ६.५ सेंमी लांबीची एक खरचटलेली जखम दिसते. तिच्यातून कोणताही रक्तस्राव झालेला नाही किंवा मानेच्या रचनेला कोणतेही नुकसान झालेले नाही. गव्याच्या हल्ल्याचे सर्वसाधारण स्वरूप पाहता मानेच्या भागावर शिंगाने खरचटल्याची शक्यता कमी वाटते. ७. शवविच्छेदन अहवालानुसार, गळ्याभोवतीचे हाड आणि बरगड्यांना फ्रॅक्चर झाल्याचे आढळले. परंतु, फुफ्फुसांना कोणतीही इजा किंवा नुकसान झाल्याचा उल्लेख नाही. सामान्यतः बरगडीला फ्रॅक्चर झाल्यास फुफ्फुसांना इजा होते किंवा ती निकामी होतात. गव्याने माणसावर केलेल्या हल्ल्यांच्या यापूर्वीच्या प्रकरणांमध्ये असे दिसून आले आहे.
८. शवविच्छेदन अहवालात पीडित व्यक्ती नैसर्गिक विधीसाठी घटनास्थळी गेल्याचा उल्लेख आहे. परंतु, संबंधित व्यक्तीने घटना घडण्याआधी ज्या घराला भेट दिली होती, तेथे शौचालय उपलब्ध होते. त्यामुळे या प्रकरणाची पडताळणी होणे आवश्यक आहे.
९. घटनेची नोंदविलेली वेळ सायंकाळी सुमारे ६.१५ ची आहे, जी गोव्यातील सध्याच्या वातावरणानुसार अंधाराची वेळ नाही. शिवाय, पीडित व्यक्तीचा अनेक वर्षांपासूनचा मित्र असल्याचा दावा करणारे बेतोडा येथील रहिवासी देविदास गावकर यांच्याव्यतिरिक्त या घटनेत दुसरा कोणताही साक्षीदार नाही.
१०. शवविच्छेदन अहवालात दिल्याप्रमाणे पोलिसांनी ६ मे रोजी नोंदविलेल्या साक्षीदारांच्या जबाबांची वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी ७ मे रोजी नोंदविलेल्या जबाबांशी तुलना करता विसंगती आढळून येते. कारण वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी नोंदविलेल्या जबाबाबत देविदास गावकर यांनी पीडित कुठे जात आहे, हे पाहण्यासाठी आपण त्याचा पाठलाग केल्याचे तसेच एका गव्याने पीडिताला उचलून झुडपात फेकून दिल्याचे म्हटले आहे.
ही घटना घडल्यानंतर मी जवळच असलेल्या बहिणीच्या मद्यालयात जाऊन तिला १०८ रुग्णवाहिकेला फोन करायला सांगितले. त्यानंतर मी पीडित व्यक्तीला प्राणी पाहिल्याचे विचारल्यानंतर, आपण कोणताही प्राणी पाहिला नाही, असे त्याने सांगितल्याचे गावकर यांनी म्हटले आहे. यातून पीडित व्यक्ती त्याच्या घरी कोणत्या कारणासाठी आला होता, हे त्याला माहीत नाही; पण तो दारूच्या दुकानात जाण्यासाठी आला असावा, असा त्याचा विश्वास असल्याचे दिसते. त्यानंतर गावकर यांनी रुग्णालयात पीडित व्यक्तीचा मोबाईल पोलिस कर्मचाऱ्यांऐवजी मेहुण्याकडे सुपूर्द केला. त्यामुळे संशय बळावतो.
११. वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी मद्यालयाच्या मालकिणीचा (साक्षीदाराची बहीण) जबाब नोंदवण्याचा प्रयत्न केला असता, ती आणि तिची मुलगी ७ मे व ८ मे रोजी बेतोडा येथे उपलब्ध नव्हती. ९ मे रोजी अधिकाऱ्यांनी त्यांचे जबाब नोंदवले. त्यातही विसंगती आढळून आली. त्यामुळे या प्रकरणात गुन्हेगारी कृत्यांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.