Goa Crime News: बेताळभाटी येथे एका डॉक्टरचा झालेला खून सगळीकडे सध्या चर्चेचा विषय बनला आहे. हा खून पैशासाठी आणि डॉक्टरच्या गाडीसाठी केला गेल्याचे सांगितले जाते. मात्र तो डॉक्टर ज्या फ्लॅटमध्ये राहत होता, त्या फ्लॅटची पोलिसांनी खुनानंतर झडती घेतली तेव्हा तिथे काही कंडोम्सची पाकिटे सापडली होती.
तसेच काही प्रमाणात ड्रग्सही सापडले होते असे सांगण्यात येत आहे. मात्र पोलिस पंचनाम्यात त्याचा उल्लेख केला गेलाच नाही. हा उल्लेख न करण्यामागे काही खास कारण होते का?
निर्बंध किनारपट्टीवरच कशाला?
गोव्याचे, खरे म्हणजे गोंयकारांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी झगडण्याची गरज आहे. पण अनेक भागातील एकंदर स्थिती वेगळेच काही दर्शवत आहे.
काणकोणमधील आगोंद किनाऱ्यावर गत आठवड्यात जलक्रीडा व्यवसायावरून दोन गटात भांडणे झाली व त्याचे पडसाद ग्रामसभेत उमटून या व्यवसायात केवळ स्थानिकांनाच मुभा असावी असा निर्णय घेतला गेला.
मात्र त्यातून आता वेगळीच चर्चा जोर पकडून लागली आहे व ती म्हणजे केवळ किनारी भागापुरते हे निर्बंध कशाला? गावातील अन्य व्यवसायांत इतरांना मुभा का? ते व्यवसाय, धंदेही स्थानिकांकडेच असावेत
अशी विचारसरणी रुजू लागली तर मात्र पंचाईत होईल असे तेथील जुनीजाणती मंडळी म्हणू लागली आहे. खरे तर गोव्याच्या खेड्यापाड्यात विविध व्यवसायांनिमित्त पोचलेल्यांना हा इशाराच आहे.
अजब तुझे सरकार...!
‘उद्धवा अजब तुझे सरकार, लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार’ या गाण्याप्रमाणेच आपले सरकार चालते का?सरकारचा कारभार पाहिल्यावर असा प्रश्न पडणे सहाजिकच आहे. सरकारच्या माहिती व प्रसिद्धी खात्याने मडगाव जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार कक्ष स्थापन केला होता.
मडगाव हे प्रमुख शहर असल्यामुळे व दक्षिण गोव्याचे हेडक्वॉर्टर असल्याच्या कारणाने दक्षिणेतील सरकारी कार्यक्रमांना प्रसिद्धीसाठी व दक्षिण गोव्यातील पत्रकारांना भेटण्याकरिता हा कक्ष उपयोगी पडावा म्हणून सुरू केला होता.
मात्र या कक्षात पत्रकार म्हणे चुकूनही भेट देत नसल्याने व माहिती खात्याकडे मनुष्यबळ नसल्याने खात्याने पत्रकार कक्षच बंद केला. आता राहिला आहे केवळ फलक. खात्याने तोही काढून टाकला असता तर पत्रकारही विसरले असते, कधीकाळी या जागेवर पत्रकार कक्ष होता म्हणून.
म्हापसा नगरपालिकेतील विरोधकांचे भलतेच धाडस!
म्हापसा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदासाठी आज बुधवारी निवडणूक होत आहे. नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीप्रमाणे ही निवडणूक बिनविरोध होईल अशी अपेक्षा होती. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी विरोधी गटाकडून नगरसेवक आनंद भाईडकर यांनी अर्ज भरला.
सत्ताधाऱ्यांकडून नगरसेवक विराज फडके यांनी अर्ज भरला आहे. एकूण 20 पैकी 15 नगरसेवकांचे संख्याबळ सत्ताधाऱ्यांकडे आहे. ही निवडणूक हात उंचावून होणार आहे. त्यामुळे गुपित मतदान होणार नाही.
नगरसेविका केएल ब्रांगाझा या मूळच्या सत्ताधारी गटातील. मात्र हल्लीच त्यांनी म्हापसा कार्निव्हल समितीच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. नगरसेवक सुधीर कांदोळकर हे विरोधी गटाचे असले तरी ते नेहमीच सत्ताधाऱ्यांना साथ देताना दिसतात.
अशावेळी उर्वरित तीन नगरसेवक नक्की कुणाच्या बाजूने उभे राहतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. आपल्याकडे बहुमताचा आकडा नसताना विरोधी गटाने उमेदवारी अर्ज भरण्याचे धाडस केले हे महत्त्वाचे. कारण लोकशाहीत विरोधक हवेच असतात, हे विसरून चालणार नाही.
ही कसली सेटलमेंट?
थकलेली वीजबिले ग्राहकांनी त्वरित फेडावीत यासाठी खात्याने ‘वन टाईम सेटलमेंट’ योजना जाहीर केली खरी, पण काही महाभाग त्यातून स्वतःचाच सेटलमेंट करून घेत असल्याचे दिसून येत आहे. केपे येथील वीज खात्याचा कार्यालयात म्हणे काही मोठ्या रकमेची बिले लिकेजच्या नावाखाली झपाट्याने खाली उतरण्याची किमया झालेली आहे.
अर्थात यामागे कुणीतरी झारीतील शुक्राचार्य लपलेला असल्याचे सांगितले जाते. या शुक्राचार्याला भेटल्यास आणि त्याचे हात ओले केल्यास हे वाढलेले बील म्हणे लिकेज दाखवून झटकन कमी केले जाते. यासाठी म्हणे कार्यालयातील काही एक्स्पर्ट महिला कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेतले जाते. आहे की नाही हा अनोखा सेटलमेंट?
कुंकळ्ळीत हा चेहरा भाजप करणार प्रमोट?
‘एका कापडान बायल म्हातारी जायना आनी एका अपयशान जग सोपना’ अशी कोकणीत एक म्हण आहे. कुंकळ्ळी मतदारसंघात पुढचा आमदार म्हणून भाजप नवीन चेहरा पुढे करण्याचा विचार करीत असल्याचे कळते. यासाठी भाजपने होमवर्क केला असून तीन नावे शॉर्टलिस्ट झाली आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढलेले संतोष फळदेसाई यांना पक्षात एंट्री देऊन भाजपचा पुढील उमेदवार म्हणून प्रमोट करण्याचे ठरले असल्याचे काही भाजप कार्यकर्ते सांगतात.
समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी संतोषला भाजपमध्ये आणण्यासाठी फिल्डिंग लावली असून त्यांना प्रमोट केल्यास पक्षाचा फायदा आहे असा विश्वास काही भाजप कार्यकर्त्यांना आहे. आता पाहुया पुढे होते काय ते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.