Lumpy Disease : उत्तर भारतात जनावरांना लम्पी आजाराची लागण झाल्यामुळे सर्वत्र भीती निर्माण झाली होती. आता या आजारावर लसीकरण, उपचारपद्धती सुरू झाल्याने त्याचा परिणाम कमी झाला आहे. गोव्यात आत्तापर्यंत 22 हजार गायींचे लसीकरण झाले आहे, तर 32 गायींवर सिकेरी येथे सुरक्षित ठिकाणी उपचार सुरू असल्याची माहिती पशुसंवर्धन खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी दिली.
लम्पी आजाराची सुरुवातीला भीती होती, परंतु त्यावर उपचार सुरू झाल्यामुळे आता त्याची तीव्रता कमी झाली आहे. राज्यात भटक्या गायींनाही लस दिली जात आहे. लस दिल्यानंतर त्यांना टॅग लावले जात आहे.
शिवाय अनेक शेतकऱ्यांनी आपल्या गायींना वैद्यकीय दवाखन्यात आणून लस टोचून नेले आहे. लम्पीचा फैलाव होऊ नये यासाठी अगोदरच राज्यात बाहेरून येणाऱ्या जनावरांवर बंदी घातली गेली आहे, असे हळर्णकर यांनी सांगितले.
पशुसंवर्धन खात्याच्या वतीने डॉ. मीनाकुमारी यांना नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त केले आहे. लम्पीवरील लस भटक्या गुरांना देण्यासाठी पंचायत आणि नगरपालिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.
खात्यातर्फे अशा उपक्रमांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी दिला जातो. त्यामुळे आम्ही पंचायत आणि पालिका संचालनालयाकडे पत्रव्यवहार करून त्यांना या उपक्रमात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सहभागी करून सतर्क करावे आणि पशुसंवर्धन खात्याला सहकार्य करावे, असे कळविले असल्याचे हळर्णकर म्हणाले.
लम्पीच्या तपासणीसाठी कायमस्वरूपी फिरते पथक तयार ठेवले आहे. पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा विभागाच्या वतीने आम्ही सर्व डॉक्टरांना सूचितही केले आहे. शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री गरज लागली तरी डॉक्टरनी त्या ठिकाणी जायला हवे, असे स्पष्ट बजावले आहे.- नीळकंठ हळर्णकर, पशुसंवर्धन खात्याचे मंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.