गोव्यातील उत्कृष्ट योग केंद्रे

ही आहेत गोव्यातील (Goa) काही उत्कृष्ट योग केंद्रे, जिथे तुम्ही कोविडकाळात (Corona) सुट्टी घेऊन योग आणि निवासही करू शकता.
Best yoga centers in Goa
Best yoga centers in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

'योग’ तुम्ही आपल्या घरात, एखादा निवांत कोपरा शोधून करू शकता. सध्याच्या वातावरणात मन शांत राहण्यासाठी एखादा बाह्य उपाय मदतीला येण्याची शक्यता कमीच आहे त्यामुळे वैयक्तिकरित्या आपल्याला तणावरहित व्हायचे असेल तर योग (Yoga) हा उपचार नक्कीच आपली मदत करू शकतो. जर का आपल्याला योग आणि दीर्घ मुदतीची सुट्टी असा आणखीन अधिक सुविधायुक्त पर्याय मिळाला तर त्यासारखे आणखी सुख नाही. सध्या कोविडकाळात सुट्टी घेऊन दूर ठिकाणी जाण्यासारखी परिस्थिती नाही पण गोव्यातच (Goa) तुम्हाला उत्कृष्ट असा पर्याय मिळाला तर? ही आहेत गोव्यातील काही उत्कृष्ट योग केंद्रे, जिथे तुम्ही काही दिवस निवासही करू शकता.

* लिटल कोव्ह योगा हॉलिडे रिट्रीट, अागोंद, काणकोण.

हे ठिकाण लोकप्रिय आहे. अष्टांग योग आणि निसर्गोपचार यात डिप्लोमा मिळवलेल्या एका भारतीय योगगुरुमार्फत हे केंद्र चालवले जाते. योगाचे वर्ग समुद्रकिनाऱ्यावर घेतले जातात. इथला आहार (Food) हा भारतीय पद्धतीचा आणि संपूर्ण शाकाहारी असतो. सात्विक पाककला शिकण्यासाठी इथे पाककृती वर्ग आयोजित होतात. आयुर्वेदिक उपचार सुविधाही येथे उपलब्ध आहेत.

* बांबू योगा रिट्रीट, पाटणे

‘कोंदे नास्त ट्रॅव्हलर, इंडिया’, या मासिकाने या केंद्राला भारतातील उत्कृष्ट रिट्रीट केंद्र म्हणून पहिल्या दहात स्थान दिले आहे. किनाऱ्याच्या अगदी लगत असलेल्या इथल्या निवासांतून समुद्रकिनाऱ्याचे आकर्षक दृश्य दिसते. दिवसातून दोनदा योगाचे वर्ग घेतले जातात त्याशिवाय रेकी, मसाज, आयुर्वेद यासारख्या उपचार पद्धतीही इथे उपलब्ध आहेत.

* आशियाना योग रिसॉर्ट, मांद्रे

मांद्रेच्या किनाऱ्यावर (Mandre) वसलेल्या या रिसॉर्टमध्ये वर्षभर उपचार पद्धती चालतात. सोना, स्पा अशा सुविधा उपलब्ध असलेल्या या ठिकाणी हठ, निद्र आणि कर्मयोग शिकवले जातात. निवासाची श्रेणी; किनाऱ्यावरच्या झोपड्या, ट्री हाऊस आणि लक्झरी खोल्या अशी आहे. योगाव्यतिरिक्त सर्जनशील लेखन , चित्रकला (Drawing) , पोषक आहार (Healthy Food) यावरच्या कार्यशाळाही इथे घेतल्या जातात.

Best yoga centers in Goa
दक्षिण गोव्यातील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

* दि मंडाला, मांद्रे

मांद्रेच्या समुद्रकिनाऱ्यापासून हे ठिकाण हाकेच्या अंतरावर आहे. ‘योग’च्या विविध शैली इथे शिकवल्या जातात. नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या एका निवांत घुमटीत योगाचे (Yoga) वर्ग घेतले जातात. ‘कायाकिंग’ आणि पक्षी निरीक्षणासाठीही इथे सुविधा उपलब्ध आहेत. योग कार्यक्रमात पौष्टिक आहारासह शरीर शुद्धीकरणावर लक्ष पुरवले जाते.

* स्वान योग रिट्रीट, आसगाव

आसगाव या शांत गावात वसलेल्या या ठिकाणी गुरुकुल पद्धतीने शिकवले जाते, कर्नाटकातील शिवानंद आश्रम आणि विवेकानंद अनुसंधान संस्था इथे प्रशिक्षण घेतलेले शिक्षक इथले योग वर्ग चालवतात. ‘तांत्रिक’, ‘अग्निविधी’, ‘मंत्रोच्चार’, ‘योगीक क्रिया’ यांचा समावेश अध्ययनात असतो. पोषक आहारासाठी इथल्याच बागेत विविध प्रकारच्या औषधी वनस्पती, भाज्या आणि फळे पिकवली जातात.

* बन्यान ट्री योगा, आश्वे

समुद्रकिनाऱ्यापासून वीस मिनिटे आत असलेल्या एका वटवृक्षाच्या जवळ हे ठिकाण आहे. इथले निवास शेण आणि मातीपासून बनलेले आहेत. सर्व स्तरावरचा हटयोग इथे शिकवला जातो. स्थानिक शेतकऱ्यांनी पिकवलेल्या भाजीपाल्याचा वापर करून जेवण बनवले जाते.

* योगा मॅजिक इको रिट्रीट. हणजुणे

माडांच्या बनात ही जागा उभारली गेली आहे. राजस्थानी पद्धतीच्या तंबूमध्ये राहण्याची सोय केली जाते. ‘योग टेम्पल’ नावाच्या शेण आणि मातीने बनवलेल्या जागेत योगवर्ग घेतले जातात, ज्यात ‘अष्टांग’, ‘विन्यास’, स्वरवेली’, कुंडलिनी इत्यादीचा समावेश असतो. पाककला, संगीत आणि कलाविषयक कार्यशाळांचेही आयोजन येथे केले जाते.

Best yoga centers in Goa
...म्हणून गोव्यात कोरोनामुळे मृत्यू वाढले

* पर्पल व्हॅली योगा रिट्रीट, आसगाव

‘अष्टांग योग’ ही इथली खासियत आहे. दोन आठवड्यांच्या योगवर्गाव्यतिरिक्त आयुर्वेदिक उपचार, सौंदर्य चिकित्सादेखील शिकण्याची इथे सोय आहे.

* अर्थ योग विलेज, पाळोळे

बांबूचा बनवलेला एक लहान पूल ओलांडल्यावर तुम्ही या ठिकाणी पोहोचता. ‘आवडणारे जीवन जगा आणि जगत असलेल्या जीवनावर प्रेम करा’ हे इथले घोषवाक्य आहे. वैयक्तिक विकास आणि आरोग्य यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी हे ठिकाण खुले आहे. योग तर तिथे शिकवला जातोच त्याशिवाय प्रत्येक बुधवारी इथे मौनव्रत आचरले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com