

पणजी: भारतीय रेल्वेने प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी आणि वेगवान कनेक्टिव्हिटी देण्यासाठी कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून आता आयटी हब बंगळुरू आणि पर्यटकांचे नंदनवन असलेल्या गोव्याला जोडण्यासाठी 'वंदे भारत एक्स्प्रेस' चालवण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाने तयार केला आहे. या प्रस्तावामुळे बंगळुरू ते मडगाव हा प्रवास आता अवघ्या १३ तासांत पूर्ण होणार असून, प्रवाशांना एका दिवसात दोन्ही राज्यांची सीमा ओलांडता येईल.
मिळालेल्या माहितीनुसार, ही नवीन वंदे भारत एक्स्प्रेस बंगळुरूच्या यशवंतपुर स्थानकावरून सकाळी ६:०५ वाजता प्रस्थान करेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ७:१५ वाजता गोव्यातील मडगाव स्थानकावर पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ही ट्रेन मडगाव येथून पहाटे ५:३० वाजता निघून संध्याकाळी ६:४० वाजता यशवंतपुरला पोहोचेल. ही ट्रेन मंगलुरू रेल्वे विभागाच्या किनारपट्टी भागातून (कोस्टल रूट) धावणार असल्याने प्रवाशांना निसर्गसौंदर्याचा आनंदही घेता येणार आहे.
प्रवासाचा एकूण वेळ कमी करण्यासाठी रेल्वेने एक विशेष रणनीती आखली आहे. ही वंदे भारत ट्रेन मंगलुरू जंक्शन आणि मंगलुरू सेंट्रल या गजबजलेल्या स्थानकांवर थांबणार नाही. त्याऐवजी ती 'पदिल बायपास' मार्गावरून थेट पुढे जाईल. या निर्णयामुळे इंजिन बदलण्याचा आणि स्थानकांवरील गर्दीचा वेळ वाचणार असून रेल्वेचे परिचालन अधिक सुलभ होणार आहे.
दक्षिण-पश्चिम रेल्वेने या मार्गावरील काही विशिष्ट टप्प्यांवर रेल्वेचा वेग वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. चिक्कबनावरा ते हासन दरम्यानचा वेग सध्याच्या ११० किमी/तास वरून १३० किमी/तास करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसेच, आव्हानात्मक असलेल्या सकलेशपुर-सुब्रह्मण्य रोड या घाट सेक्शनमध्ये रेल्वेचा वेग ३० किमी वरून ४० किमी प्रतितास केला जाण्याची शक्यता आहे. या तांत्रिक सुधारणांमुळे प्रवाशांचा अमूल्य वेळ वाचणार आहे.
इतर वंदे भारत गाड्यांप्रमाणेच या ट्रेनमध्येही जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा असतील. यात आरामदायी रिक्लाइनिंग सीट्स, स्वयंचलित दरवाजे, मोबाइल चार्जिंग पॉइंट्स, बायो-टॉयलेट्स आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. दरम्यान, देशाच्या दुसऱ्या भागात म्हणजेच गुजरातमध्येही १६ फेब्रुवारी रोजी सहाव्या वंदे भारतचे (असरवा-उदयपुर सिटी) उद्घाटन करण्यात आले असून, रेल्वेचे हे जाळे आता वेगाने विस्तारत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.