खरी कुजबुज: शेवटी तवडकरांना महामार्ग सापडला

Khari Kujbuj Political Satire: ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आक्रमक भूमिका घेतल्यावर १०० कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्याचे प्रकरण वर काढले गेले असे सांगण्यात येते.
Khari Kujbuj
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

शेवटी तवडकरांना महामार्ग सापडला

काणकोणातील मोठमोठ्या राजकरण्यांना जे शक्य झाले नाही, ते सभापती डॉ. रमेश तवडकर यांनी शक्य करून दाखवले आहे. बेंदुर्डे ते पोळेपर्यंतच्या हमरस्त्याच्या चौपदरीकरणाचे स्वप्न आता दृष्टिपथात आले आहे. तवडकर यांचे दिल्ली दरबारी बरेच वजन आहे. त्यात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व फोंडा तालुक्यातील एका मंत्र्याचा घरोबा आहे. त्यामुळे तवडकर यांच्यावर गडकरी साहेबांची मेहरनजर आहे.

बाळ्ळी ते पोळेपर्यंतचा हमरस्ता पुढे मंगळूरपर्यंत जातो. कर्नाटक सरकारने दोन वर्षांपूर्वीच पोळे सीमेपासून मंगळूरपर्यंत चारपदरी रस्ता केला आहे. मागे आहे ते गोवा सरकार. पोळे येथे भव्य असे प्रवेशद्वार उभारण्याचा मानस तवडकरांचा आहे. करमल घाटात चारपदरी रस्ता काढण्यासाठी काही वृक्ष कापावे लागणार आहेत.

यापूर्वीही वन खात्याने लागवड केलेल्या सागवान वृक्षांची कत्तल अज्ञातांनी केली आहे. मात्र, हमरस्त्यासाठी अधिकृतरीत्या कापण्यात येणाऱ्या वृक्षासंबंधी पर्यावरणप्रेमींचे वृक्षराजीसंबंधी प्रेम उफाळून येणार आहे. त्या प्रेमाचे सांत्वन व परिमार्जन तवडकर कसे करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

विजयची पुढची चाल काय?

‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आक्रमक भूमिका घेतल्यावर १०० कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्याचे प्रकरण वर काढले गेले असे सांगण्यात येते. या प्रकरणात गोवा फॉरवर्डशी जवळ असलेल्या दोघांचे नाव पुढे आल्याने विजयला रोखण्यासाठीच हा सारा उपद्‍व्याप असे सांगितले जाते, पण विजय हे सारे मुकाट्याने सोसणार का? की पलटवार करणार? काय असेल बरे विजयची नवीन चाल.

‘कॅश फॉर जॉब’बाबत दडपण?

‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणाने राज्यात जी खळबळ माजवून दिली होती, त्याला एक महिन्याहून अधिक काळ लोटल्यानंतर त्याची धारही कमी झाली आहे. वेळोवेळी मुख्यमंत्री या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असे नेहमीच घोषणा करत असतात. मात्र, या घोटाळ्यात अनेक प्रकरणांमध्ये रोख रक्कमेने व्यवहार झाले आहेत. त्यामुळे त्याचे पुरावे जमा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

ज्यांनी लोकांना फसवले आहे, त्यांनीसुद्धा कोणतेही पुरावे मागे ठेवलेले नाहीत. त्यांच्याकडे असलेली मालमत्ता व त्याचा स्रोत या अनुषंगाने तपास सुरू आहे. काही एक दोन आरोपी वगळल्यास इतरांना न्यायालयाने पोलिस कोठडी वाढवून दिली नाही. त्यामुळे पोलिसांचा तपासकाम योग्य दिशेने सुरू आहे की घोटाळ्याचा भडका शांत करण्यासाठी पोलिसांवर दडपण आहे अशी चर्चा लोकांमध्ये आहे.

लोकांचा सरकार व पोलिसांवर विश्‍वास नाही. नोकरीही नाही व पैसेही गेले, त्यामुळे तक्रारी दाखल करून न्यायालयाचे उंबरठे का झिजवायचे. जी रक्कम दिली आहे त्याची चौकशी ईडी करील की नाही, असाही प्रश्‍न फसवणूक झालेल्यांना पडला आहे.

Khari Kujbuj
खरी कुजबुज: ‘शॅक’धारकांना सुखद धक्का!

रवींचा भाव वधारला

कृषिमंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक हे सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत. तसे त्यांना कोणत्यावेळी कोणता चेंडू फटकावा याची चांगलीच माहिती असते म्हणा. आता बघा कर्नाटकातील तिनईघाटातील रस्त्याचा व फोंड्याचा काही संबंध आहे का? पण तरीही रवींनी या बेळगाव - गोवा महामार्गावर असलेल्या रस्त्याच्या दुर्दशेची तक्रार केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलीच आणि गडकरींनीही या रस्त्याचे काम सुरू करतो असे रवींना लिहून कळवलेही. यातून रवींनी गडकऱ्यांकडे आपली किती पोच आहे हे दाखवून दिलेच. त्याचबरोबर तेथून वाहतूक करणाऱ्या गोमंतकीयांना दिलासा दिला. यामुळे सध्या भाजप गोटात रवींचा भाव वधारला आहे. आहे की नाही खऱ्या अर्थी ‘गोंयचो लोकनायक’?

कामत यांना सरकारात उच्चपद?

जेव्हापासून मडगावचे आमदार दिगंबर कामत काँग्रेस सोडून भाजपात गेले आहेत, तेव्हापासून त्यांना मंत्रिपद दिले जाईल अशा बातम्या पसरत आहेत. कित्येक वेळा असे झाले व नंतर या ना त्या कारणावरून त्या बातम्या थंडावल्या, पण आता परत एकदा मंत्रिमंडळात आमूलाग्र बदल होण्याच्या बातम्या माहितगार गोटातून पसरल्या जात आहेत.

एकदा का महाराष्ट्र सरकारचे गठन झाले व तेथील मुख्यमंत्री आपल्या खुर्चीवर आरूढ झाले की पक्षश्रेष्ठी गोव्यासंदर्भात मोठा निर्णय घेतील असे बोलले जात आहे. सध्या गोव्यात जे अनेक घोटाळे उघड होत आहे व त्यात काही उच्चपदस्थ पदाधिकारी, मंत्र्यांच्या नावांची चर्चा विरोधक व लोकांमध्ये चालू आहे ते पाहता पक्षश्रेष्ठी गोव्यासाठी मोठा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे व त्यात दिगंबरबाबांना उच्चपद मिळण्याच्या शक्यतेबद्दलही पक्षात चर्चा सुरू आहे असे आतील गोटात आपसात बोलणी चालली आहेत.

सनबर्न अन् चर्चा...

सनबर्न महोत्सव धारगळमध्ये होणार याचे संकेत मिळत आहेत. असे असले तरी स्थानिक पातळीवर या महोत्सवाच्या विरोधात व पाठिंबा देणारे असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे पेडण्यामध्ये प्रशासन व स्थानिक असा संघर्ष अटळ दिसतोय! दुसरीकडे, हणजूणमधील काही सनबर्नला उचलून धरणारे हिरमुसले आहेत.

कारण सनबर्न मागील काही वर्षे वागातोरमध्ये व्हायचा. परंतु वाढत्या विरोधामुळे की काय, आयोजकांनी वागातोरमधून काढता पाय घेत आपला मोर्चा धारगळमध्ये वळविल्याचे दिसते. मात्र, आयोजकांसाठी हा रस्ता इतका सोपा नसेल.

कारण लोकप्रतिनिधी या महोत्सवाच्या विरोधात उभे राहिलेत. अशातच काही जाणकारांच्या मते सरकारचा पाठिंबा मिळाल्यास सनबर्न धारगळमध्येच होईल! कारण हा परिसर सनबर्नसाठी पुरेसा अनुकूल आहे. शेजारील मोपा विमानतळ सनबर्न महोत्सवासाठी सध्या यूएसबी ठरत असल्याचे पेडणेकर पोटतिडकीने बोलत आहेत.

Khari Kujbuj
LPG Price Hike In Goa: गॅस सिलिंडर महागला! पाच महिन्यांत झाली भरमसाठ वाढ; नवे दर जाणून घ्या

चर्चेतील गावे!

मागील काही महिन्यांपासून दक्षिण गोव्यातील सांकवाळ गाव चर्चेत होते. तेथील प्रस्तावित भूतानी मेगा प्रकल्पाला स्थानिकांकडून विरोध होत राहिल्याने हे गाव चर्चेत आले. आता चर्चा सुरू झाली उत्तर गोव्यातील धारगळ गावाची. धारगळ गावात ‘सनबर्न’चे आयोजन होणार असल्याने त्याला विरोध करणारा आणि त्याचे समर्थन करणारा गट निर्माण झाला.

धारगळमधीलच लोकांचे दोन गट पडल्याने आता या सनबर्नचे भवितव्य काय? असा सवाल उपस्थित झाला आहे. गोव्यात दररोज कोठे ना कोठे आंदोलन, मोर्चे काढले जात आहेत. सांकवाळ येथील आंदोलनात अनेक कंगोरे होते, त्या आंदोलनाला प्रसारमाध्यमांतही प्रसिद्धी मिळाली. मात्र, ‘सनबर्न’ हा विषय मागील वर्षांपासून गाजत असल्याने तो कोठे होणार यावरून राज्यात वादंग सुरू झाला आहे.

धारगळमधील लोकच आता उघडपणे सनबर्नला समर्थन आणि विरोध करीत असल्याने हे गाव अजून काही दिवस चर्चेत राहणार हे नक्की. कारण सरत्या वर्षातील शेवटचा डिसेंबर महिना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com