

मडगाव : बाळ्ळी-केपे येथील श्री शांतादुर्गा बाळ्ळीकरीण संस्थानचा पारंपरिक शिडियोत्सव गुरुवारी सकाळी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. शिमगोत्सवानिमित्त दरवर्षी साजरा होणारा हा सोहळा पाहण्यासाठी देवस्थानाच्या प्राकारात भाविकांचा जनसागर उसळला होता.
या उत्सवाची खास वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे गड्यांना लाकडी आड्याला बांधून फिरवणे ही होय. देवीचे आशीर्वाद मिळावेत आणि गावात सुखसमृद्धी नांदावी या श्रद्धेतून ही परंपरा अनेक वर्षांपासून पाळली जात आहे. उत्सवाच्या वेळी उपस्थित भाविकांनी भक्तिभावाने जयघोष करत देवीचे दर्शन घेतले.
श्री शांतादुर्गा बाळ्ळीकरीण देवस्थानाबरोबरच कुनेश्वर देवस्थानातही हा शिडीयोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
या परंपरेत गावातील गडे सहभागी होतात. सुमारे ३३ हात लांब आणि १५ हात उंच असे भव्य लाकडी आडे तयार केले जाते. उत्सवाच्या आदल्या रात्री वाजत-गाजत, पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात हे आडे रानातून देवस्थानात आणले जाते.
सकाळी विधिपूर्वक आड्याची पूजा करण्यात येते. त्यानंतर गड्यांना त्या आड्याला बांधून पाच वेळा फिरवले जाते. हा सोहळा पाहण्यासाठी देवस्थान परिसरात मोठी गर्दी उसळते. स्थानिकांसह बाहेरून आलेले भाविकही या अद्वितीय परंपरेचे दर्शन घेतात.
या देवस्थानाचा शिमगोत्सव ९ मार्चपासून सुरू झाला असून विविध धार्मिक कार्यक्रमांनी परिसरात उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. उद्या शुक्रवार, १३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता गुलाल कार्यक्रम, दुपारी महाआरती व प्रसाद वाटप होणार आहे. रात्री गळखांब गाऱ्हाणे झाल्यानंतर या वर्षीच्या उत्सवाची सांगता होईल.
रविवार, १५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता श्रींस अर्पण केलेल्या वस्तूंचा पारंपरिक लिलाव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमालाही भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष संकेत फळदेसाई यांनी केले आहे.
१३ मार्च : सकाळी ९ वाजता गुलाल, दुपारी महाआरती व प्रसाद, रात्री गळखांब गाऱ्हाणे व नंतर उत्सवाची सांगता. १५ मार्च : सकाळी ११ वाजता श्रींस अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव.
गड्यांना लाकडी आड्याला बांधून फिरविणे
३३ हात लांब व १५ हात उंच भव्य आडे
रात्री वाजत-गाजत रानातून देवस्थानात आणण्याची प्रथा
शेकडो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरण