Zambaulim Gulalotsav: ‘श्री रामनाथ दामोदर महाराज की जय'! जांबावलीचा वैभवशाली गुलालोत्सव

Jambavali Gulalotsav: जांबावलीचा गुलालोत्सव हा उत्सव किमान पाचशे वर्षांपासून मडगांवकर श्री दामोदर देवासमोर साजरा करीत आले आहेत.
Zambaulim Gulalotsav
Zambaulim GulalotsavDainik Gomantak
Published on
Updated on

जांबावलीचा गुलालोत्सव हा उत्सव किमान पाचशे वर्षांपासून मडगांवकर श्री दामोदर देवासमोर साजरा करीत आले आहेत. या शिमगोत्सवात आबालवृद्ध, मुली, महिला सर्व भेदभाव विसरून वैयक्तिक हेवेदावे विसरून श्री दामोदराच्या चरणी लीन होत असतात.

‘श्री रामनाथ दामोदर महाराज की जय,’ या जयघोषात नाचत, बँडवादनाच्या तीरावर शिमगोत्सवाचा कोंब - मडगाव येथे पूजलेला नारळ जांबावलीपर्यंत आवाज दुमदुमून गेलेला असतो.

आठ दिवसपर्यंत मठग्रामस्थ हिंदूसभेतर्फे साजरा होणाऱ्या शिमगोत्सवाने श्री दामोदर संस्थानात नृत्य गाणी, पारंपरिक लोकनृत्य, नाट्य प्रयोगांनी गजबजलेला असतो. वसंत ऋतूतील निसर्गाच्या आनंदात मठग्रामस्थ देहभान विसरून शिमगोत्सवात तल्लीन होतात.

फाल्गुन महिन्यातील होळी पौर्णिमेनंतर कृष्ण पक्षांत मठग्रामस्थ हिंदू सभेतर्फे मडगांवकरांचे ग्रामदैवत असलेल्या जांबावली येथील श्री दामोदर संस्थानांत प्रसिद्ध शिमगोत्सव साजरा करतात. गोव्यात फाल्गुन महिना हा शिमगोत्सव उत्सवी महिना.

गोव्याच्या कानाकोपऱ्यात फाल्गुन शुद्ध नवमी ते होळीपर्यंत लोकनृत्ये, पूजा, नाटके, सांस्कृतिक कार्यक्रमात रमलेले असतात. परराज्यांत नोकरीनिमित्त गेलेले लोक या शिमगोत्सवात सहभागी होण्यासाठी परततात. आपल्या गावी मडगावातील ग्रामस्थही या शिमगोत्सवात मुद्दाम येत असतात.

हा उत्सव किमान पाचशे वर्षांपासून मडगांवकर श्री दामोदर देवासमोर साजरा करीत आले आहेत. या शिमगोत्सवात आबालवृद्ध, मुली, महिला सर्व भेदभाव विसरून वैयक्तिक हेवेदावे विसरुन श्री दामोदराच्या चरणी लीन होत असतात. शिमगोत्सवानिमित्त खास तयार करून घेतलेले रंगीबिरंगी कपडे परिधान करून आनंद व्यक्त करतात.

‘राम राघव गोविंदा, हरि रे रमणा, गोविंद माधव गोविंद हरि रमणा गोविंद’ असा गजर करीत दररोज रात्री गणपतीची आरती हरिदासाच्या नेतृत्वाखाली पखवाजाच्या तालावर व झांज, टाळाच्या सूरांत सूर मिसळून श्री दामोदरचरणी जातात.

त्यानंतर प्रार्थना करून श्री दामोदराची मूर्ती घेऊन त्याला वरती सज्जावर विराजमान केले जाते. त्यानंतर गणपती पूजा, सीतास्वयंवर नाटक व त्यानंतर नाट्यप्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. जांबावली येथे श्री नारळ नेल्यापासून मंगळवारी गुलाल होईपर्यंत हे उत्सव दररोज रात्रौ अखंडितपणे चालतात.

यंदा ग्रामस्थ हिंदूसभेचे १११ वे वर्ष आहे. त्या अगोदर मडगांवच्या ‘दहा जणां’तर्फे हा उत्सव साजरा केला जायचा. १९१३ मध्ये ‘दहा जणांची’ हिंदू कैवारी सार्वजनिक सभा स्थापन केली व त्यानंतर या सभेतर्फे तर १९२७ मध्ये सभेचे नामांतर ‘मठग्रामस्थ हिंदू सभा’ असे केले गेले.

शेकडो वर्षांची वैभवशाली परंपरा मठ ग्रामस्थ हिंदू सभेच्या झेंड्याखाली मडगावकर उत्साहाने साजरा करीत आले आहेत. गेली दोन वर्षे कोविड महामारीमुळे तो साधेपणाने साजरा करावा लागला. फक्त अत्यावश्यक विधी तेवढे करावे लागले. सांस्कृतिक कार्यक्रम, जेवणावळी बंद ठेवाव्या लागल्या.

सभेचे पदाधिकारी व देवालयाच्या समितीच्या सदस्यांनाच साजरा करावा लागला होता. त्यामुळे मडगावकर अस्वस्थ बनले होते. ते नैराश्य यावर्षी घालवून, हर्षोभरीत मनाने साजरा करण्यात येत आहे.

यावर्षी नारळाच्या मिरवणुकीत शेकडो स्त्री-पुरुष, तरुण मंडळी सहभागी झाली व दरररोज रात्री हजारो भाविकांची शिमगोत्सव प्रेमी, कलाकारांनी जांबावली दुमदुमून गेली. या आठ दिवसात सर्वत्र विजेच्या दिव्यांची रोषणाई, विविध तऱ्हेचे फलक, आकर्षक प्रवेशद्वारांनी सजलेली असते. बाहेरील प्राकारात विविध दुकाने, फेरीने भरलेली असतात.

तसेच सभेतर्फे दुपारी व रात्रौ भोजनावळ चालू असते. हा उत्सव यशस्वीपणे साजरा करण्यासाठी सभेचे सदस्य, स्वयंसेवक वावरताना दिसतात. या आठ दिवसात नाट्यप्रयोग देवळाच्या सभामंडपात तर सांस्कृतिक कार्यक्रम हे श्री रामनाथ देवाच्या समोरील प्राकारात होतात. दररोज सुवारी वादन, बॅण्ड वादन चालू असते.

शिमगोत्सवाची सुरुवात जांबावली येथे श्री दामोदर मंदिरात हळदुण्याने होते. त्यावेळी कोंबवाडा येथे वै. पुरुषोत्तम केणी यांच्या निवासस्थानी शिमग्याचा नारळ पूजला जातो व दुसऱ्या दिवशी रात्रौ मिरवणुकीने तो नारळ जांबावली येथे नेण्यात येतो.

त्या दिवसापासून मंगळवारी गुलालापर्यंत सात नाट्यप्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम चालू असतात. कित्येक मडगावकर आठ दिवस तिकडेच थांबतात तर काही जण शनिवार ते मंगळवारपर्यंत जांबावली येथे राहतात. मठग्रामस्थ हिंदू सभेचे माजी अध्यक्ष वै. बाबू नायक यांनी या उत्सवाला विशाल स्वरूप दिले व त्यानंतर आता त्यांचे सुपुत्र भाई उर्फ पांडुरंग नायक व त्यांची समिती ती परंपरा मोठ्या आनंदाने व जबाबदारीने चालवितात.

यंदा त्यात प्रथमच प्रशासक नेमल्याने खंड पडला आहे. सोमवार सायंकाळी ६ ते मंगळवार सायंकाळी पाचपर्यंत अखंडित कार्यक्रम चालू असतात. वेशभूषा, नृत्य स्पर्धा, लावणी व पहाटे ५.३० पर्यंत नाट्यप्रयोग. त्यानंतर श्रींच्या पालखीची मिरवणूक श्री रामनाथ देवाच्या प्रांगणात विराजमान होते व ती गुलाल होईपर्यंत तेथेच असते.

तेथे सुवारीवादन जयघोषाने प्राकार आनंद लहरींनी भरलेला असतो. शिमगोत्सवाच्या तयारीसाठी व खर्चासाठी वर्गणी गोळा करण्यात येते. तत्पूर्वी तीन महिन्यांअगोदर सोमवारी श्री दामोदर सालांत मठ ग्रामस्थ हिंदू सभेची सर्वसाधारण सभा भरून वार्षिक कार्याचा आढावा व भावी कार्याची दिशा ठरविण्यात येते तर त्यानंतरच्या सोमवारी शिमगोत्सवाची बैठक होऊन वर्गणी जमवण्यास सुरुवात होते.

मडगावकरांची व व्यापारी मंडळींची श्री दामबाबावर श्रद्धा व भक्ती. सभेचे पदाधिकारी कुठेही वर्गणीसाठी न पोहचल्यास ते स्वतः सभेच्या पदाधिकाऱ्यांकडे वर्गणी आणून देतात. या उत्सवात शिस्त कडक असते व शेकडो गोवा व गोव्याबाहेर अशी शिस्त कुठेच बघायला मिळणार नाही.

जांबावलीच्या शिमगोत्सवासाठी कित्येक जण गोव्याबाहेरून मुद्दाम येथे येतात व उत्सवात भाग घेतात. मनमुराद आनंद लुटतात व श्री दामोदराचा प्रसाद घेऊन परततात. फाल्गुन महिन्यात वसंत ऋतूची चाहूल लागलेली असते.

निसर्ग आनंदाने डोलत असतो. निसर्गातील वृक्षवेली फळाफुलांनी बहरलेली असतात. काजू, आंबे पिकून तयार असतात. याच निसर्गाचे उदाहरण मानव घेतो. वर्षापासून प्रत्येक जण कटाक्षाने निसर्गाशी एकरूप होऊन त्या पाळतो. मठग्रामस्थ हिंदू सभेतर्फे साजरा होणारा शिशिरोत्सव, वसंत ऋतूच्या स्वागतास सज्ज असतो.

-अनिल पै, मडगाव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com