

पणजी: बागा समुद्रकिनाऱ्यावरील धोकादायक कठड्यावर बसलेल्या एका मद्यधुंद युवकाचा समुद्राच्या प्रचंड लाटेच्या तडाख्यामुळे पाण्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली. या धक्कादायक घटनेनंतर किनाऱ्यावरील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांकडून होत आहे.
स्थानिकांच्या मते, ज्या कठड्यावरून संबंधित युवकाचा मृत्यू झाला, त्या ठिकाणी जाण्यासाठी थेट आणि मोकळा रस्ता असल्याने पर्यटक सहजपणे तेथे पोहोचतात. त्यामुळे या मार्गावर मजबूत फेन्सिंग किंवा बॅरिकेड्स उभारून धोकादायक कठड्यापर्यंत पर्यटकांना जाण्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे.
तसेच, परिसरात स्पष्ट इशारा देणारे फलक लावून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठा दंड आकारला जाईल, अशी सूचना केल्यास पर्यटकांमध्ये जागरूकता निर्माण होईल आणि अशा प्रकारांना आळा बसेल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. व्यावसायिक ग्लेन फर्नांडिस यांनी पर्यटन विभागाने अधिक प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज व्यक्त केली.
ते म्हणाले, "मद्यधुंद अवस्थेतील पर्यटकांना स्वतःचे भान राहत नाही. अशा वेळी केवळ समजावून सांगून उपयोग होत नाही. विशेष कृती दल स्थापन करून त्याचा स्वतंत्र संपर्क क्रमांक जाहीर करावा. मद्यधुंद पर्यटकांकडून हुल्लडबाजी किंवा नियमभंग होत असल्याची माहिती मिळताच हे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचून कठोर कारवाई करू शकेल.
बागा किनाऱ्यावर पर्यटक लाटेत वाहून गेल्याची घटना घडताच उपायांचे मोहोळ उठले असून आता खडकाळ भागाभोवती कुंपण घालण्याची कल्पना पुढे येत आहे. म्हणजे पुढे समुद्रकिनाऱ्यावर जाण्याआधी पर्यटकांनी समुद्र पाहायचा की कुंपण, हा प्रश्न पडेल. काहीजणांच्या बेफिकिरीची शिक्षा निसर्गालाच देण्याची ही नवी पद्धत म्हणावी लागेल. समुद्रकिनारे हे सौंदर्य, स्वातंत्र्य आणि आनंद अनुभवण्यासाठी असतात; त्यांना लोखंडी चौकटीत अडकविणे हा उपाय नसून व्यवस्थापनातील त्रुटी दूर करणे हा सर्वांत सोपा मार्ग आहे.
एकंदरीत, केवळ मद्याच्या अतिसेवनामुळे आणि स्वतःवरील नियंत्रण सुटल्याने त्या युवकाला आपला अमूल्य जीव गमवावा लागला आहे. ही घटना इतर पर्यटकांसाठीही डोळे उघडणारी ठरावी. मात्र, आता पर्यटन विभाग आणि स्थानिक प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.