

म्हापसा: बागा समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या एका गटाने मद्याच्या नशेत धिंगाणा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शॅकमध्ये कन्नड गाणी लावण्याच्या कथित मागणीवरून झालेल्या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले असून, पर्यटकांनी शॅकची तोडफोड करत एका कामगारावर हातदेखील उचलला. ही घटना शुक्रवारी (ता.८) सायंकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बागा बीचवरील गुड लक बीच शॅकमध्ये पर्यटकांचा एक गट आला होता. या गटाने शॅकमालकाकडे कन्नड गाणी लावण्याची मागणी केली. मात्र, तांत्रिक बिघाड किंवा इतर काही कारणांमुळे शॅक प्रशासनाने गाणी लावण्यास असमर्थता दर्शवली. या किरकोळ कारणावरून मद्याच्या नशेत असलेल्या पर्यटकांनी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
वादाचे रूपांतर लवकरच हातघाईवर आले. संतापलेल्या पर्यटकांनी शॅकच्या मालमत्तेचे नुकसान केले आणि तिथे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला शारीरिक इजा पोहोचवली. इतकेच नव्हे तर, ‘शॅक कायमचा बंद पाडू,’ अशी धमकीही या पर्यटकांनी मालकाला दिली.
घटनेची माहिती मिळताच कळंगुट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी पोलिसांनी चार पर्यटकांना ताब्यात घेतले असून, त्यापैकी एका मुख्य संशयिताला अटक करण्यात आली आहे. दयानंद कारजगी (२३, रा. बेळगाव, कर्नाटक) याला पोलिसांनी त्याला बीएनएसएस कलम १७० अंतर्गत प्रतिबंधात्मक अटक केली आहे.
पर्यटकांवर फक्त नॉन-कॉग्निझेबल रिपोर्ट नोंदवली जाते. मात्र, जेव्हा भांडण होते, तेव्हा केवळ शॅक कर्मचारी आणि मालकावरच कारवाई केली जाते. या कथित उपद्रवी पर्यटकांवर गुन्हे का नोंदवले जात नाहीत? ‘अतिथी देवो भव’ म्हणून स्थानिकांनीच मार खायचा का? उत्तर गोवा पोलिस अधीक्षक आणि डीआयजींनी गेल्या हंगामात आणि या हंगामातही कळंगुटमधील भांडणानंतर आम्हाला मोठे प्रवचन दिले की, पर्यटकांना मारू नका तर पोलिसांना फोन करा. पोलिसांना बोलावण्याचा परिणाम हाच आहे का की, त्यांनी फक्त त्यांच्याकडून पैसे घ्यायचे आणि त्यांना सोडून द्यायचे अन् आम्ही मात्र त्रास सहन करायचा?
- जॉन लोबो, शॅक मालक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.