

पणजी : महापालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर आता पणजीवासीयांचे लक्ष लागले आहे, ते महापौर निवडीकडे. एकंदरित परिस्थितीचा अंदाज घेता, पुन्हा एकदा महापौर पद रोहित मोन्सेरात यांनाच मिळण्याची दाट शक्यता आहे. महापालिकेवर सलग पाचव्यांदा सत्ता प्रस्थापित करणारे मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सुचविलेल्या नगरसेवकाच्या नावावर भाजप नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर शिक्कामोर्तब होणार, हे स्पष्ट आहे.
येत्या काही दिवसांत महापौर-उपमहापौर निवडीबाबत चर्चा सुरू होईल. निवडून आलेल्या २७ नगरसेवकांमध्ये विद्यमान महापौर रोहित मोन्सेरात, माजी महापौर कॅरोलिना पो, उदय मडकईकर, शुभम चोडणकर, विठ्ठल चोपडेकर यांचा समावेश आहे. त्यामुळे पूर्वी महापौरपद हाताळलेल्या या चार नावांवरही चर्चा होऊ शकते.
२०२१ मध्ये पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर रोहित मोन्सेरात यांच्याकडे महापौरपद दिले होते. त्यामुळे काही नगरसेवकांमध्ये नाराजीही होती; पण ही नाराजी काही काळापुरतीच होती. त्यानंतर हा विरोध मावळला. तोपर्यंत रोहित यांनी या पदावर पकड मजबूत केली. रोहित यांच्याबरोबर वसंत आगशीकर आणि संजीव नाईक यांनी उपमहापौर म्हणून काम केले; परंतु या निवडणुकीत आगशीकर यांना उमेदवारी देण्यात आली, तर संजीव नाईक यांना उमेदवारी नाकारण्यात आली.
बाबूश यांचे कट्टर समर्थक बेंटो लॉरेन यांच्यासह इतर नावांवरही महापौर-उपमहापौर पदासाठी विचार केला जाऊ शकतो; परंतु निर्णय सर्वस्वी भाजप नेत्यांशी चर्चा करून होणार असल्याने मंत्री बाबूश कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, हे स्पष्ट होईल. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत रोहित यांना उतरविण्याचा विचार मंत्री बाबूश करीत असतील तर काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या या निवडणुकीचा विचार करता ते रोहितला महापौरपद देऊ शकतील काय? हाही एक प्रश्न आहे.
मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी महापालिकेवर एकहाती सत्ता आणली आहे. बाबूश यांनी स्वबळावर ३० पैकी २७ नगरसेवक निवडून आणले आहेत. या निवडणुकीत प्रचारासाठी पक्षाच्या कोणत्याही नेत्याला त्यांनी आमंत्रित केले नव्हते. निवडणुकीत त्यांनी जे एकहाती यश मिळविले. त्यामुळे बाबूश यांचे पक्षातील वजन निश्चितच वाढणार आहे; परंतु ते ज्या नावाला पसंती देतील, तोच महापौर व उपमहापौर पदावर विराजमान होणार, हे स्पष्ट आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.