Author Journalist Valmiki Faleiro Passed Away: साक्षेपी पत्रकार आणि इतिहास संशोधक म्हणून ओळख असलेले मडगावचे माजी नगराध्यक्ष वाल्मिकी फालेरो (71) यांचे आज गुरुवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. फालेरो यांच्यामागे पत्नी डेझी या आहेत.
गुरुवारी दुपारी घरातच असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तियांकडून मिळाली. त्यांच्या निधनाची वार्ता शहरात काही मिनिटांतच पसरली. या निधनाने साहित्य आणि सामाजिक वर्तुळातील अनेकांना धक्का बसला.
गोव्यासंदर्भातील अनेक पुस्तके लिहिलेले फालेरो हे ‘दै. गोमन्तक’साठीही नियमित लेखन करत हाेते. दर रविवारी त्यांचा ‘मठग्राम ते मडगाव’ हा कॉलम प्रसिद्ध होत होता. त्यांच्या लिखाणाची वाचक आवर्जून वाट पाहात होते.
आपल्या तरुण वयात राष्ट्रीय वृत्तपत्रासाठी लेखन करणारे फालेरो यांची ओळख त्यावेळी अत्यंत अभ्यासू आणि धडाडीचे पत्रकार अशी होती.
‘इंडियन एक्सप्रेस’साठी गोव्याचे प्रतिनिधी म्हणून काम करत असतानाच त्यांनी द इलेस्ट्रेटेड विकली, करंट विकली, मिरर यासारख्या राष्ट्रीय मान्यतेच्या वृत्तपत्रांतही काम केले होते.
गोव्यात त्यावेळी सुरू केलेल्या ‘द वेस्ट कोस्ट टाईम्स’ या दैनिकात त्यांनी मुख्य प्रतिनिधी म्हणून काही काळासाठी काम केले होते. हा काळ छोटा असला तरी त्यांची या दैनिकातील कारकीर्द अत्यंत गाजली होती.
लोकांच्या प्रश्नांना धडाडीने वाचा फोडणारे पत्रकार अशी त्यांची प्रतिमा त्यावेळी बनली हाेती. ‘नवहिंद टाइम्स’ आणि ‘गोवा टुडे’ या गोव्याच्या वृत्तपत्रातही त्यांनी बरेच लिखाण केले आहे.
संशोधकाची वृत्ती
फालेरो हे पत्रकार असले तरी त्यांचा मूळ पिंड संशोधकाचा होता. कुठल्याही गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन त्याचे संशोधन करणे आणि पुस्तकरूपातून ते लोकांसमोर आणणे यासाठी ते प्रसिद्ध होते.
गोव्याच्या मुक्तीपूर्व काळातील घटनांवर त्यांनी लिहिलेले ‘गोवा १९६१ द कम्प्लिट स्टोरी ऑफ नॅशनलिझम ॲण्ड इन्टिग्रेशन’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले होते. ‘पेंग्वीन’सारख्या प्रतिष्ठित प्रकाशन संस्थेेने प्रकाशित केलेल्या या पुस्तकावर सध्या वाचकांच्या उड्या पडत आहेत.
राजभाषा आंदोलनात सक्रिय
यापूर्वी त्यांनी मडगावच्या होली स्पिरीट चर्चच्या इतिहासाबद्दल लिहिलेले ‘सोरिंग स्पिरीट’ हे पुस्तक असेच गाजले हाेते.
फालेरो यांचा पिंड राजकारण्याचा नसला तरीही गोवा राजभाषा आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. मडगाव पालिका निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. १९८५ ते १९८७ या कालावधीत त्यांनी मडगावचे नगराध्यक्षपदही भूषविले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.