

वाळपई: येथील ‘मारिया’ बार परिसरात एका व्यक्तीला मारहाण करून जखमी केल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यावरही हल्ला केल्याप्रकरणी वाळपई पोलिसांनी सुनील गजानन मडकईकर (३६, रा. गवळेभाट-चिंबल) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील याने काल शनिवारी रात्री अकराच्या सुमारास वाळपई येथील ‘मारिया’ बारजवळ लखपत सिंग यांच्यावर वाहनाच्या चावीने डोक्यावर व पाठीवर वार करून तसेच ठोसे मारून जखमी केले.
या हल्ल्यात लखपत सिंग यांना रक्तस्त्रावासह दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच पीसीआर पथक घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू असताना आरोपीने आक्रमक होत हेड कॉन्स्टेबल ओली खान यांच्यावर हल्ला केला. त्यांना थपडा व ठोसे मारून नाक आणि चेहऱ्यावर दुखापत केल्याचा आरोप आहे.
तसेच पोलिसांच्या कर्तव्यात अडथळा निर्माण करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. जखमी हेड कॉन्स्टेबल ओली खान यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. या प्रकरणी साहाय्यक उपनिरीक्षक नामदेव गावस यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाळपई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
घटना रात्री उशिरा बार परिसरात घडल्याने वाळपईतील काही बार निर्धारित वेळेनंतरही सुरू राहत असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. संबंधित यंत्रणांनी याबाबत तपास करून नियमांचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.