
कोणाही जिवाचा न घडो मत्सर! वर्म सर्वेश्वर पूजनाचे!
या भावनेने तुकोबारायांच्या अभंगाचा चंदनी टिळा लावून भागवत संप्रदायातील सरळ साध्या तत्त्वज्ञानाचा अंगीकार वारीत दिसून येतो. परमसुखाच्या आणि समानतेच्या अनिवार ओढीने सावळ्या मेघश्यामाच्या सेवेत पंढरीची वाट हिरवी-हिरवी, बरवी बरवी होत राहते. पडणाऱ्या पावसाची तमा नाही, गर्दीची पर्वा नाही.
हरिनामाचा नामघोष करीत वारकरी वाट चालत राहतात. तमो गुणांना मागे सारून सत्त्वगुणाचा उदय करणारी पंढरी ही महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी. या राजधानीला जाणारा मार्ग कसा पाहा... फुगड्या खेळत, टाळ वाजवत, मृदंगाच्या तालावर, मृदू अंगाचे होत पंढरीची वाट चालता येते. खेळीमेळीने द्वेषरहित जगावे कसे याची सोपी आधार पद्धती म्हणजे आषाढी एकादशी वारी.
विठुरायाला सोने नाणे, धन धान्य काहीही लागत नाही. हा देव भावाचा भुकेला आहे. विठू माऊली एकच देवता आहे जिच्या पायाला डोके टेकून नमस्कार करू शकतो. तसेच संतवाणी काव्य, अभंग, भारूड, गवळणी या साहित्याचा ज्ञानभंडार भरपूर आहे.
शिवाय श्री विठ्ठल देवता अभ्यासक्रमामध्ये संदर्भग्रंथ म्हणून प्रचलित आहेत. पंढरपूरचे महत्त्व वाढवण्याचे कार्य महाराष्ट्रातील संतांनी केले आहे. त्यात प्रामुख्याने संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गोरा कुंभार, संत नामदेव, संत चोखामेळा, संत सावता माळी, संत जनाबाई, संत कान्होपात्रा यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात भक्ती संप्रदायाचा पाया ज्ञानदेवांनी घातला असला, तरी याची खरी सुरुवात यापूर्वी भक्त पुंडलिक यांच्यापासून सुरू झाली आहे. कारण तुकोबारायांनी म्हटले आहे, की ‘पुंडलिकासाठी परब्रह्म आले भेटी’ म्हणजे साक्षात ईश्वर त्याच्या नामसंकीर्तनात मग्न असलेल्या या भक्ताच्या भेटीला आला असताना पुंडलिकाने भक्तीने विठ्ठलाला एका विटेवर उभे राहायला सांगितले.
पांडुरंगाने पुंडलिकाला काय वर पाहिजे असे विचारले असता, पुंडलिकाने जो वर मागितला तो असा पांडुरंगांनी याच रूपात येथेच उभे राहावे. आषाढी एकादशीला ‘श्री पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’ या गजराने अवघे पंढरपूर दुमदुमून जाते. हा घोष समस्त वारकरी संप्रदायाचा गाभा आहे.
श्री हरी हा परमात्मा कृष्ण आहे तसेच तो विष्णू आहे. हरी हे श्रीकृष्णाचे नाव आहे व ही दोन्ही नावे विष्णूचीच आहेत. भक्तराज पुंडलिकाच्या भेटीसाठी साक्षात परब्रह्म विठ्ठल रूपाने भीमातिरावर पंढरपुरी प्रकट झाले. जिथे भक्त असतात तिथेच श्री विठ्ठल असतो. ‘पंढरीची वारी’ हा एक भव्य दिव्य सोहळा असतो.
अठरा दिवसाचा हा सण एकदा अनुभवला की दरवर्षी पुन्हा पुन्हा अनुभवावा अशी तीव्र आस लागते. जगतगुरू संत तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बाबा पंढरीची वारी करत होते. तसेच तुकोबाराया चौदाशे वारकरी घेऊन वारीला गेले होते. पादुका पूजनाची प्रथा त्यांचे धाकटे पुत्र नारायण महाराज यांनी सन १६६५ मध्ये सुरू केली.
देवशयनी एकादशीच्या एक दिवस आधी वारकरी पंढरपुरात पोहोचतात. सर्व नोंदणीकृत दिंड्यांना क्रमांक दिले जातात. मिरवणुकीत त्यांची जागा दिली जाते.
एकाचवेळी एका दिवसात सर्वाधिक भेट दिलेले ठिकाण म्हणून ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये पंढरपूर वारीची नोंद आहे. प्रत्येक वारीत प्रत्येक दिंडीचे व्यवस्थापन अतिशय शिस्तबद्ध असते. वेळापत्रकानुसार सर्व दिंड्या काटेकोरपणे पालन करतात. विश्रांतीचे स्थान, रात्री मुक्कामाची ठिकाणं ठरलेली असतात. पहाटे लवकर उठून स्नान उरकून पालखी व पादुका पूजन होते. तीनवेळा तुतारी वाजविली जाते. प्रथम निघायची तयारी, दुसऱ्यावेळी दिंड्या उभ्या राहतात, तिसऱ्यांदा तुतारी वाजल्यावर दिंडी चालू लागते.
दहा ते पंधरा लाख भक्तगण पंढरीला येतात. एवढं करून वारकऱ्याची पांडुरंगाचरणी मोठं असं मागणं नसतं ‘पंढरीचा वास चंद्रभागा स्नान आणिक दर्शन विठोबाचे’
एवढेच मागणं नाहीतर नगरप्रदक्षिणा किंवा कळसदर्शन आणि शक्य असेल तर मुखदर्शन आणि दुग्धशर्करा योग म्हणजे चरणस्पर्श दर्शन...
आजही पंढरीची वारी विज्ञान युगाला आव्हान देणारी आहे. गोव्यातूनसुद्धा माऊली नाम प्रचार होत असून प्रत्येक गावातून वारकरी संस्था व दिंडी पथके वाढत आहेत ही अभिमानाची गोष्ट. जी आनंदवारी ज्ञानदेव रचिला पाया आणि तुका झालासी कळस नि झाली तिची व्याप्ती आपल्याही गावातून वारी निघते तो खरा विठ्ठल भक्तीचा परमानंद.
ही विशेष भक्ती चळवळ दिवसेंदिवस व्यापक होताना दिसतेय. विष्णू भक्त आध्यात्मिक विद्येचे संवर्धन करताहेत. निर्व्यसनी, नीतिमान सुस्वभावी पिढीला वळण लावणाऱ्या वारीला प्रणाम. सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
- नीलेश धर्मा नाईक (मेणकुरे - डिचोली)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.