
मधू य.ना. गावकर
ज्येष्ठ महिना सुरू झाला म्हणजे वैष्णव वारकऱ्यांना पंढरपुरातील विठ्ठलाच्या दर्शनाचे वेध लागतात. कष्टकरी शेतकरी, कामकरी मान्सूनच्या सरींनी ओल्या झालेल्या जमिनीत बियाणे पेरून मोकळा होतो. मात्र मान्सून पाऊस वेळेवर पडला नाही तर, अनेकरूपी विठ्ठलाचा धावा करतो. त्या सांबसदाशिवाला प्रसन्न करून घेत त्याने तो भूमीला आलिंगन देतो आणि शेतकरी आनंदित होतो. कारण त्याला विठ्ठलाची वारी चुकवायची नसते.
संत ज्ञानेश्वरांनी वैचारिक बैठक दिलेली वारी आज संपूर्ण महाराष्ट्रभर पसरून गावागावांतून हजारोंच्या संख्येने वारकऱ्यांचे मेळे विठ्ठल दर्शनासाठी रस्ताभरून चालताना पाहावयास मिळतात. त्यात भर पडली आहे शेजारील राज्यातील वारकरी मंडळांची. कर्नाटक, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड तेलंगणा राज्यातील भागवत वैष्णव वारकरी आषाढी एकादशीला चालत येत विठुरायाचे दर्शन घेतात.
विठ्ठलाला अनेक रूपांनी आणि अनेक नावांनी ओळखले जाते. विठ्ठल, पांडुरंग, कानडा, श्रीहरी, माउली, पंढरीचा राजा, सावळा, विष्णू, भगवान, विठुराया, रघुनाथ, श्रीराम, श्रीकृष्ण, जगन्नाथ, द्वारकाधीश, बद्रिनाथ, काळाराम, रामकृष्ण, अशा अवतार रूपात त्याला पाहिले जाते.
संत ज्ञानेश्वरांच्या जन्मापूर्वीपासून वारी पंढरपूरला जात होती, असे इतिहासकार मानतात. मात्र ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माची स्थापना करून तळागाळातील समाजाला त्यात सामील करून घेतल्याने वैष्णवांच्या भगव्या पताकांना विठ्ठलाच्या वारीने पंढरपुरात हिमालयाचे शिखर गाठून दिले.
ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम या संतांनी वारीतून भक्ती, श्रद्धा आणि सत्याचा मार्ग दाखवला. त्यांना साथ लाभली ती एकनाथ, पुंडलिक, नरहरी, चोखामेळा, सावतामाळी, निवृत्ती, सोपान, गोराकुंभार, गोंदवलेकर, माणकोजी, दामाजी, कान्होपात्रा, जनाबाई, सखू, मुक्ताबाई, या संतमाउलींची.
शिवाय गोव्यातील संत सोयरोबानाथ आणि कृष्णभट बांदकर यांनी गोमंतकीयांना भक्तीचा मार्ग दाखवत त्या महान संतांनी अभंग, ओव्या आणि चारित्र्याचे साहित्य निर्माण केले. तसेच ज्ञानेश्वरांनी मराठीत ज्ञानेश्वरी लिहून सत्यातून भक्तीचा सार सर्वांना दिला. ज्ञानेश्वरांच्या भागवत धर्मात कुठलेच कर्मकांड नाही. त्यांचा धर्म समानतेचा होता.
आपल्या धरणीला ईश्वराने म्हणजे विठ्ठलाने वेगवेगळ्या रूपात पाच तत्त्वे दिली आहेत. पाणी, हवा, ऊर्जा, आकाश आणि माती. त्यांची शक्ती समप्रमाणात आहे. ती तत्त्वे आपल्यातील शक्ती पृथ्वीवरील जैवविविधतेला वेगवेळ्या रूपात पुरवतात. आपल्या सर्वच संतांनी वनराई, शेती, जैवविविधता जगवणाऱ्या पाणी तत्त्वाला आपल्या साहित्यात प्रथम स्थान दिले आहे.
मातीला पाण्याची साथ मिळून बियांना कोंब फुटतो. कोंबाचे झाड वेल होऊन फुले, फळे, येतात. फुले सुगंध देतात, फळे अन्न पुरवतात. चंदन, गुलाब, चाफा, केवडा, मोगरा, सुरंग या झाडवेली, फुले देणारा सुगंध म्हणजेच विठ्ठल!
त्याचा दरवळ सर्वत्र समान पसरतो. निलगिरी, खष्ट, कोकम, नारळ, बदाम, भुईमूग, तीळ, एरंड, सासव या फळांच्या बियांपासून तेल काढतात. ते तेल म्हणजे ईश्वरी रूप आहे. मूग, चणा, कुळीथ, उडीद, अळसांदा, चवळी कडधान्ये, भात, नाचणी, वरी, पाकड, सावा, कांग या धान्याचे अन्न सेवन केल्याने त्यातून ऊर्जा मिळते. तो देव हे आपल्या संतांना माहीत होते.
म्हणून त्यांनी पाच तत्त्वे आणि पर्यावरणाला आपल्या साहित्यात प्रथम स्थान दिले आहे. ईश्वराच्या चरणी तिन्ही प्रहरी श्रवणीय संगीताला सुरुवात होते. त्यात मृदंग, पखवाज, टाळ, सारंगी, तंबोरा, मुरली, हार्मोनिअम, टाळ, चिपळीचा वापर करतात. संगीताची सुरुवात भैरव रागाने होऊन शेवट भैरवीने होतो. ही भक्ती देव विठ्ठलाला प्रसन्न करून घेण्यासाठी आहे. भैरव आणि भैरवी या दोन रागांमधील त्या आर्त सुरांत त्यांचे विश्वरूप सामावले आहे.
वारी करून एकमेकाचे सुखदुःखाचे धागेदोरे त्याच्या चरणाकडे घट्ट विणून ते प्रेमभावनेने धागे एकमेकाच्या झोळीत टाकण्यासाठी वारकरी एकादशीला पंढरपुरात कुंभमेळा भरवतात. हा वारीचा पाया, मंदिर आणि त्यावर कळस चढवण्याचे काम विठुरायाची पालखी धरणाऱ्या महान संतांनी आणि लाखो वारकऱ्यांनी केले आहे.
त्यांनी एकमेकांना सावरत विठुरायाच्या भीमा नदीच्या पवित्र पाण्यात स्नान करून क्षणिक पाप धुऊन पुण्य मिळाल्याचे समाधान मानले आहे. विश्वासाची ताकद, एकोप्याची जाण ठेवीत ते माउलीचा निरोप घेतात. एकादशीचा मेळा म्हणजे विठ्ठलास आवडत्या पारिजातकाच्या फुलांच्या राशीप्रमाणे वारकऱ्यांची गर्दी होते. परकीय राजवटींनी या एकादशीच्या मेळाव्याला आडकाठी आणण्याचा प्रयत्न केल्याचे इतिहासात सापडते. पण त्या विठ्ठलाच्या शक्तीने बंदी आणणाऱ्या राजवटी नष्ट केलेल्याही इतिहासात सापडते.
पूर्वी गोव्यातून एखादा माणूस पंढरपूरला जाऊन आल्यास त्याने दिव्य पार केले असे समजत होते. त्याला जाण्यायेण्यास महिना - दीड महिना लागायचा. घरी परतल्यावर तो गावच्या देवळाकडे थांबायचा.
तो आल्याचे समजल्यावर गावातील लोक त्याला भजन करीत घरी न्यायचे. त्याने आणलेले चंद्रभागेचे तीर्थ गंगारुपात पुजून त्याचे पूजन करायचे. एखादा मोठा उत्सव साजरा व्हायचा. गेल्या पंधरा सोळा वर्षांपूर्वी प्रथम वारी मुळगावातून सुरुवात झाली. दुसऱ्यावर्षी माशेलातून देवकीकृष्ण मंडळाने वारीला सुरुवात केली.
आज संपूर्ण गोव्यामधून चाळीस पन्नास वारी मंडळे गोवा ते पंढरपूर पायी चालत आषाढी एकादशीला जातात. त्यात वयोवृद्ध, आयाबहिणी, माता पिता आणि मुले भाग घेतात. गोव्यातून एक श्वान पंढरीची वारी नियमितपणे करते हे आश्चर्यच म्हणावे लागेल! साडेतीनशे किमीचे अंतर चालत पार करणे हे सोपे काम नाही.
दरदिवशी पंचवीस तीस किमी अंतर चालून साधारण तेरा चौदा दिवसांत भेटीची आस लागलेल्या विठोबाचे दर्शन घेऊन वारकरी हसतमुखाने घरी परततात. चोर्लाघाट, तिळारी घाट, आंबोली घाट पायी चालत वर जाणे सोपी गोष्ट नाही.
पण विठुरायाचे स्मरण करीत दाट धुक्यातून वाट काढीत, पावसाच्या सरी अंगावर झेलीत, आपल्या सामानाचे ओझे पाठीवर झेलीत इच्छाशक्तीच्या जोरावर, पाय सुजल्याची पर्वा न करता, तहानभूक विसरून, मिळेल ते खाऊन धन्यता मानीत दिसेल त्या नदीच्या वाहणाऱ्या पाण्यात स्नान करून आपल्या वारीचे व्रत पूर्ण करतात.
गोव्यात माशेल, पणजी, रायबंदर, म्हापसा, आखाडा, मडगाव, फोंडा, साखळी ठिकाणी विठ्ठल मंदिरे आहेत. तसेच त्याच्या दुसऱ्या रूपात श्रीकृष्ण मंदिरे आणि तिसऱ्या रूपात रामाची मंदिरे आहेत. यातून भागवत धर्मातील वैष्णवांची भक्ती मोठी असल्याचे दिसून येते. माशेलात द्वादशीला देवकीकृष्णाच्या विशाल पटांगणात चिखलकाला साजरा होतो.
हल्लीच्या वर्षांनी चिखलकाल्यास जत्रेचे स्वरूप येण्यास सुरुवात झाली आहे. चिखलात कृष्णाच्या क्रीडा, खेळ खेळणे, म्हणजे पर्यावरणातून कृषीसंस्कृतीशी एकरूप होणे. भगवान कृष्णाने गोपालन आणि कृषी पिकाने या देशाला सुवर्णभूमी बनवली. आज गोव्यात कृषिक्षेत्र नाहीसे होत असून त्या हरी, विठ्ठल, ज्ञानेश्वर, तुकारामाचे पर्यावरणीय विचार नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.