आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबाच्या घराची मोडतोड झाल्यानंतर ते दुरुस्त करण्याचे पूजा शर्मा हिने दिलेले आश्वासन तसेच काही संशयितांनी दिलेली जबानी यामुळे या घटनेमागील मुख्य सूत्रधार तीच असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
परिणामी तिची पोलिस कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. पूजा हिच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी आज पूर्ण होऊन त्यावरील निवाडा पणजी प्रधान सत्र न्यायालयाने येत्या बुधवारी १० जुलैला दुपारी २.३० वाजता ठेवला आहे.
आगरवाडेकर कुटुंबाने हणजूण पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर पूजा शर्मा हिच्या प्रतिनिधीने त्यांना भेटून घर दुरुस्त करून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे ही तक्रार मागे घेण्यात येत असल्याचे प्रतिज्ञापत्र क्राईम ब्रँच एसआयटीला आगरवाडेकर कुटुंबाने दिले आहे.
पूजा हिचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही तर घराची दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन आगरवाडेकर कुटुंबाला तिने का दिले? असा प्रश्न सरकारी वकील दर्शन गावस यांनी युक्तिवाद करताना उपस्थित केला.
पूजा शर्मा हिला या घराची मालमत्ता मिळवून देण्यात संशयित अर्शद ख्वाजा हा गुंतलेला आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आगरवाडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलिसांना या प्रकरणाचा तपास करणे क्रमप्राप्त आहे. तक्रारदाराने नंतर तक्रार मागे घेत असल्याचे सांगितले तरी तपासकामावर त्याचा काहीच फरक पडत नाही.
आगरवाडेकर कुटुंबाने त्यासाठी न्यायालयात अर्ज करायला हवा. मात्र अजूनही तो केलेला नाही. पूजाने घराची मालमत्ता खरेदी करताना तिने कोणाशी पैशांचा व्यवहार केला होता? तसेच तिची या प्रकरणामागील भूमिका काय आहे? याचा तपास करायचा असल्याने तिची पोलिस कोठडी आवश्यक आहे असा युक्तिवाद सरकारी वकील दर्शन गावस यांनी केला.
तपासकाम प्राथमिक टप्प्यात आहे. मूळ मालक ख्रिस पिंटो यांच्याकडून ना हरकत दाखला घेऊन आगरवाडेकर कुटुंब ते राहत असलेल्या आसगाव घराची घरपट्टी तसेच वीज व पाणीबिल जमा करत होते.
पूजा शर्मा ही या घराची मालकीण आहे तर तिने न्यायालयातून आगरवाडेकर कुटुंबाला ते घर खाली करण्यासाठी आदेश आणायला हवा होता. मात्र तिने बाऊन्सर्सचा वापर करून ‘शॉर्टकट’ पद्धत वापरल्याचे वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.