मोरजी: मोरजीवासीयांनी आमदार जीत आरोलकर यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निवेदन दिले होते. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी आपण मोरजीवासीयांवर अन्याय होऊ देणार नाही. जी पायवाट किंवा रस्ता अडवण्यात आला, ती गेट खुली करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती. त्यानुसार संबंधित रस्त्याच्या बाजूला लावलेली गेट शुक्रवार, २३ रोजी खुली करण्यात आल्यामुळे मोरजीवासीयांनी आनंद व्यक्त केला.
मोरजी पंचायत क्षेत्रातील वरचावाडा डोंगर माळरानावर रस्त्याच्या बाजूलाच एक गेट लावून शेतामध्ये, डोंगर माळरानावर आणि देवाच्या स्थळावर जाणारी पायवाट संबंधित भूमाफियांनी अडविल्यामुळे मोरजीवासीय चिंताग्रस्त झाले होते.
डोंगर माळरानावरील जमिनी मोठ्या प्रमाणात बिगर गोमंतकीयांनी विकत घेऊन त्या ठिकाणी ना विकास झोन भागातील जमिनी टीसीपी विभागाला आणि राजकर्त्यांना हाताशी धरून रूपांतरीत करण्याचा सपाटा चालवलेला आहे. यासंदर्भात मोरजीवासीयांनी ग्रामसभेमध्ये वेळोवेळी आवाज उठवला. सरकारला निवेदन सादर केले होते. मात्र, मागच्या चार दिवसांपूर्वी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर आणि ग्रामस्थांनी मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. त्यानंतर घडामोडीला सुरवात झाली.
मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले की ज्या पद्धतीने डोंगर माळरानावर जाताना रस्ता आणि पायवाट अडवण्याचा प्रयत्न संबंधितांनी केला होता. तो प्रश्न सोडवण्याची ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली होती. त्यानुसारच ही गेट हलवण्यात आल्याने हा प्राथमिक स्तरावर मोरजीवासीयांचा विजय आहे. यापुढे कुणावरही आपण अन्याय होऊ देणार नाही.
मोरजीतील लोकांनी आपल्या पिढीजात जमिनी अव्वाच्या सव्वा दर मिळत असल्यामुळे विकून टाकल्या. जमिनी विकत घेतल्यानंतर व्यावसायिकांनी तेथे प्रकल्प आणले. काही प्रमाणात डोंगर टेकड्या सपाट केल्या. काही झाडेही कापल्याचा दावा ग्रामस्थांनी वेळोवेळी केला. तक्रारी केल्या. मात्र, तक्रारींची दखल सरकारकडून घेतली जात नव्हती.
भाटी वाडा भागातील स्थानिक नागरिकांनी आमदार जीत आरोलकर यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर झाल्यानंतर मात्र रस्त्यावरील गेट २३ रोजी खुली करण्यात आली. ती गेट कायमचीच खुली करावी, अशी मागणी सध्या मोरजीवासीयांनी केली असून एकत्र आल्यानेच मागणी पूर्ण झाली, असे काही नागरिक सांगतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.