
मये: जमिनीचा मालकी हक्क लोकांना देण्यापासून रोखण्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यात हिम्मत नाही, असे म्हणत आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी मयेवासीयांना मालकी हक्क देण्याचा वायदा केला. मयेत गेल्या २५ वर्षापासून भाजपचा आमदार आहे. पण, भाजपने तुम्हाला काय दिले? रस्त्यांची दुरावस्था झालीय, रोजगार नाही, हॉस्पिटलची सुविधाही नाही, असे केजरीवाल म्हणाले.
मये येथे आप कार्यालयाचे उद्धाटन केल्यानंतर केजरीवाल यांनी उपस्थितांशी संवाद साधला. "२०१४ मध्ये Abolition Act पास करण्यात आला होता. या कायद्यांतर्गत ज्या व्यक्तीकडे जी आहे त्या जमिनीचा मालकी हक्क संबंधित व्यक्तीला दिला जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. पण, आजवर मालकी हक्क देण्यात आला नाही."
"काही दिवसांपूर्वी प्रमोद सावंत यांनी या जमिनींवर सरकारचा हक्क असल्याचे सांगून मालकी हक्क दिला जाणार नसल्याचे सांगितले. हा धोका आहे", असा आरोप केजरीवाल यांनी केला.
"नागरिकांना जमिनीचा मालकी हक्क देण्याचे काम आम आदमी पक्ष करेल, त्यासाठी पक्ष लढेल, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. प्रमोद सावंतांमध्ये हिम्मत नाही हक्क रोखण्याचा, त्यांनी तसं करुन दाखवावं आप त्यासाठी रस्त्यावर उतरेल", असे केजरीवाल म्हणाले.
"प्रमोद सावंत यांच्या पत्नीला मयेतून निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केलीय, अशी अफवा समोर आलीय. राज्यात २० लाख नागरिक आहेत, राज्यातील दुसरी कोणतीही महिला त्यांना दिसली नाही का?", असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला.
गेल्या साठ वर्षात १३ ते १४ कुटुंबांनी वर्चस्व निर्माण करुन ठेवले आहे. घरातच निवडणूक लढण्यासाठी प्रत्सोहन दिले जात असून, सर्व सिस्टिम लूटमार करण्यासाठी तयार केल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला.
यावेळी सिस्टिम बदलायला हवी, असे केजरीवाल म्हणाले. राज्यात भाजप आणि काँग्रेस एकच आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचा खाण व्यवसाय असून, तो व्यवसाय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या आशिर्वादाशिवाय चालणार नाही, असा आरोपही त्यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.