
मधू य. ना. गावकर
स ध्या गोव्यात आयआयटीचा विषय बराच गाजत आहे. खरे म्हणजे आयआयटी ही उच्च शिक्षण देणारी संस्था, ती गोव्यात सुरू झाल्यास गोमंतकीय विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल. भारतातील कैक राज्यात आयआयटी शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. अशा उच्च शिक्षणाने देशाचा विकास घडतो. गोव्यात गेल्या काही वर्षांपासून आयआयटी सुरू करण्यास सरकार प्रयत्न करीत आहे.
पण त्यांच्या प्रयत्नांना अजूनपर्यंत यश आलेले नाही. प्रथम लोलयेचे भगवती पठार, शेळ, मेळावली, सांगे, रिवण आणि आता फोंडा तालुक्यातील कोडार गावच्या वाघाटे नावाच्या सर्वे नंबर ६३ या जमिनीवर ती उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ‘वाघाटे’ (कसमशेळ) ही जमीन कोडार कोमुनिदादीच्या मालीकीची.
तिचे एकंदर क्षेत्रफळ १९,४७,६०० चौ.मी. सर्वेमध्ये नोंद आहे. त्यातील ५०२५ चौ.मी बागायत लागवडी खाली आहे. आयआयटी संस्था कोडार गावात आणण्याचा प्रयत्न होताच तिथल्या गावच्या शेतकरी बांधवांनी आणि स्थानिकांनी या संस्थेला विरोध करण्यास सुरुवात केली. म्हणून खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी मी कोडार, बेतोडा, कसमशेळ, कोनशे आणि निरंकाल गावांना भेट देऊन त्या ‘वाघाटे’ परिसराची पाहणी करून तिथल्या स्थानिकांकडून विरोधासंबंधी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
वाघाटे परिसरात पोहताच तिथल्या शुद्ध प्राणवायूने मन प्रसन्न झाले. वाघाटे परिसराच्या सभोवार डांबरी रस्ता आहे. त्या जागेच्या पूर्व बाजूने गोव्याला जीवन देणारी ओपा खांडेपार नदी वाहते. त्या नदीकडील भागात सरकारी कृषी फार्म आहे.
पश्चिम बाजूने दाट जंगलाने भरलेला सिद्धनाथ डोंगराचा पायथा आहे. सिद्धनाथ डोंगराच्या पायथ्याकडून दोन ओहोळांचा उगम झाला आहे. एक ओहळ निरंकाल गावातून खांडेपार नदीस मिळतो, तर दुसरा बेतोडा, कोडार गावातून खांडेपार नदीस मिळतो.
उत्तर बाजूने कोडार डोंगर आणि वाहणारा ओहळ. दक्षिण बाजूने निरंकालचे जंगल आणि वाहणारा ओहळ. मात्र पर्यावरणीयदृष्टीने पाहिल्यास पश्चिम घाटाची एक डोंगररांग वाघाच्या पंजाप्रमाणे दिसते. संपूर्ण फोंडा तालुक्याच्या मध्यभागातून तिने प्रवेश केला आहे.
मोले, शिगाव, कुळे, बिंबल, वाघोण, दाबाळ, निरंकाल, पंचवाडी, कोनशे, बेतोडा, कोडार, कुर्टी, खांडेपार, वाघुर्मे, सावईवेरे, बोरी, ढवळी, कवळे, प्रियोळ, केरी, कुंकळ्ये, कुंडई, भोमा, मडकई, अडकोण, बेतकी, तिवरे, वरगाव आणि खांडोळा मांडवीच्या पात्रापर्यंत पोहोचली आहे.
या डोंगररांगेत वाघाटे, ढवळी, बेतोडा, कवळे, भूतखांब, धाट, कुंडई, मडकई, आट्याळ, गोळीकडे, पालसरे, फर्मागुडी ही पठारे त्या डोंगराच्या सान्निध्यात निसर्गाने निर्माण केली आहेत. त्यायोगे वन्यप्राण्यांना गवताचे खाद्य, ओहळ, तलावांचे पाणी, जंगलाचा निवारा बहाल केला आहे.
म्हणून पश्चिम घाटातील पट्टेरी वाघ निरंकालपर्यंत येतात. शिवाय काळा बिबटा, मेरू, गवे, भेकरू, हरणे, रानडुक्कर, कोल्हे, काळेमांजर हे वन्यप्राणी कवळे, आट्याळ, कुंडई, ढवळी, पालसरे, आकवार फातर धाट गोळीकडे, भूतखांब पठारावर वास्तव्यास असतात.
कोडार गावची ‘वाघाटे’ जमीन पठार आहेच. पण पश्चिम आणि दक्षिण बाजूने तिने डोंगराचे रूप घेतले आहे. ती संपूर्ण टेकडी जांभ्या दगडाने परिपूर्ण बनली आहे. त्या जमिनीत काही वर्षांपूर्वी चिरेखाण मारण्याचा प्रयत्न झाला होता, असे स्थानिकांकडून ऐकावयास मिळाले.
नंतर ती खाण बंद करण्यात आली. त्या पठारावरील जमिनीत मारट, किंदळ, नाणा, बेळ, मोय, त्रिफळ, कुमयो, जांभा, पडवळ, हासण, शिसवी, कारा, हेद, शिरस, अर्जून, दाबण, शिवण, खैर, चार, पंगारा, कुसमो, सावर, गेळ, रंजिण, कुडा, रानआंबाडा, कांगल, कोकम, भेसड, केवण, घोटींग भिलमाड, बांबू, कुंफळ, फागल, हरकुली, उसकी, झिरमुला, आंबटमीरी, खष्ट, कणेर, हासळ, फातरफळ, चानीवाल, चुरन, करवंद, पिटकळ, गोडवाल, धावतीवाल, कात्रेवाल, वाघचपका, बाळा, एळंब, चानाडा, जांभूळ, अशा औषधी वनस्पती आणि रानमेवा या वाघाटे टेकडी पठारात आहे.
त्या वनस्पतींचा सुकलेला पालापाचोळा पावसाच्या पाण्यात कुजल्याने ते खाद्य वाळवी, कीटक, मुंग्याना मिळून त्याच पाल्यापाचोळ्यात वारुळे बनवतात. त्या वारुळातील वाळवी, मुंग्या खाण्यासाठी नागसर्प, धामण वावरतात. त्यांना खाण्यासाठी घोरपड, मुंगूस येतात.
त्यांचा फडशा पाडण्यासाठी बिबटे, कोल्हे गरुडपक्षी वावरतात. मांडोळ साप पक्षांना खाण्यासाठी गवतात दडून बसतात. भुंगे, बेडूक खाण्यास फुरसे, रक्तमांडोळ, हेवाळा दबा धरून बसतात. बकुळी, सुरंग, सितेचीवेणी, ओहोळाच्या काठावरील केवडा, चिरडा, कार्वी या फुलांचा मध घाण्यास मधमाश्या वावरतात.
अनेक प्रकारचे कीटक खाण्यास तिथे पक्षी वावरतात. या परिसंस्थेमुळे वाघाटे परिसर एकदम सुपीक आहे. काही जागांवर कर्पिल काडी गवत, गोणये, गवत, भाल्याआळ, आणि वनस्पती, फुलोरा वाढलेला पाहावयास मिळतो.
त्या जागेवर गवे, भेकरे, मेरू, ससे ही जनावरे चरण्यास येतात. शिवाय पाळीव जनावरे चरण्यास जातात, रात्रीची हिंसक जनावरे त्या जंगल भागात विसावा घेतात. वाघाटे पठारावर पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात आहे. पावसाळ्यात त्या डोंगर पठारावरून तीन ओहळ आपले पाणी खालच्या परिसराला पुरवतात. त्या पाण्याने परिसरातील झाडांना येणारी कोवळी पाने खाण्यास वानरांचे सैन्य ठाण मांडून झाडावर बसलेले पाहावयास मिळते.
वाघाटे जागेत तिथल्या स्थानिक अडतीस शेतकऱ्यांची नावे सर्वेमध्ये नोंद आहेत. शिवाय, २०१६साली फोंडा मामलेदारांकडे टेनन्सी कायद्याखाली आपली नावे नोंद करावीत यासाठी चाळीस शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.
ते सारे शेतकरी पावसाळ्यात भेंडी, काकडी, टरबूज, पडवळ, कोकणदुधी, कुवाळा, कारले, भोपळा, करांदे, कणगी, झेंडू आणि पालेभाजी पीक घेतात. वाघाटे पठारावर मोठ्या प्रमाणात अळंबी पीक येते, असे प्रवासात ऐकावयास मिळाले.
वाघाटे जमिनीच्या वर्तुळात शेतकरी लोकांची घरे आहेत. त्यांच्या बागायतीत सुपारी, नारळ, आंबा, फणस, ओटम, कोकम, जायफळ, केळी, मिरी, मावळींग, तिखटमिरची, चिर्का, सुरण यांची लागवड त्यांनी केली आहे.
तिथल्या ओहळ, विहीर, तळी, झरीच्या पाण्यावर त्यांनी या बागायती फुलवल्या आहेत. काही सखल भागात भातशेती आहे. त्या शेतात आणि वाहणाऱ्या ओहोळात प्रथम पडणाऱ्या पावसाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात खेकडे बाहेर येतात.
ते खेकडे पकडून जेवणात वापरतात. शिवाय, रानकोल्ह्यांनाही मारून खातात. वाघाटे पठारावर धनगर लोकांची घरे आहेत. त्यांनी त्यांच्या घराशेजारी शेतीबागायती फुलविली आहे. दुभती जनावरे पोसून आपला संसार ते चालवतात. त्या पठारावरील सुके गवत आणून गुरांना चारा पुरवतात. अशी ही कोडार गावचा वाघाटे टेकडी पठार निसर्गाने निर्मिला आहे.
अनेक प्रकारच्या जैवविविधतेने नटलेली ही देवराई राखण्यास देवलंगडेश्वर आणि तळेश्वर त्या कोडार गावात पूर्वजांनी स्थापन केलेले पाहावयास मिळतात. एखादे काम व्हावे म्हणून तिथला शेतकरी देवाला सांगणे घालून त्याला नवस बोलला जातो व काम झाल्यावर तो फेडलाही जातो. फोंडा तालुक्यातील डोंगर आणि त्या डोंगरातून वाहणाऱ्या ओहोळांनी आमच्या पूर्वजांना जीवनदान दिले.
सरपटणारे प्राणी, हिंस्र प्राण्यांच्या संगतीत तिथला पूर्वज निसर्गाच्या आशीर्वादाने जगला आहे. आम्हा गोवेकरांना आय आय टी पाहिजे हे सत्य आहे, पण तिथले लोक म्हणतात, आमचे कृषिक्षेत्र आणि पर्यावरणीय जंगल नष्ट केल्यास आमचे भविष्य नष्ट होईल. आज फर्मागुडीवर शैक्षणिक हब झाला आहे, त्या ठिकाणी मागणी होत असताना सरकार तिथे आयआयटी का करीत नाही, हा प्रश्न तिथल्या कष्टकरी समाजाकडून विचारला जात आहे.
हा प्रश्न ऐकून माझ्या बालपणातील आठवण जागी झाली. माझ्या खांडोळा गावात देवळाय नावाची मोठी देवराई होती. वर लिखित सर्व गोष्टी त्या जागी होत्या, पण पैशाच्या लोभाने भाटकाराने ती देवराई-वनराई कापून जैवविविधतेचा नायनाट केला आणि श्रीमंत माणसासाठी कॉंक्रीटचे जंगल उभारले. खांडोळा गावास शहर बनवले. एकूण पाहता, काखेत कळसा आणि आयआयटीसाठी गोव्याला वळसा, असा हा प्रकार आहे!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.