Goa Politics: केजरीवालांच्‍या ‘एकला चलो’चा गोव्‍यावर परिणाम? राजकीय वर्तुळात चर्चा; युतीशिवाय पर्याय नसल्याचे विरोधकांचे मत

Arvind Kejriwal: गुजरातमधील वादावरून ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसबरोबर युती तुटली, अशी भूमिका घेतल्‍याने आगामी निवडणुकीवर काही परिणाम होऊ शकतो का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला जर हरवायचे असेल तर सर्व प्रमुख विरोधकांनी एकत्र येऊन टक्‍कर द्यावी, अशा तऱ्हेची हवा, सध्‍या गोव्‍याच्‍या लोकमानसात तयार होत असतानाच गुजरातमधील वादावरून ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसबरोबर युती तुटली, अशी भूमिका घेतल्‍याने आगामी विधानसभा निवडणुकीवर काही परिणाम होऊ शकतो का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

याबाबत विश्‍लेषकांनी वेगवेगळी मते व्‍यक्‍त केली आहेत. काहींना आपचा हा तात्‍पुरता स्‍टंट असे वाटू लागले आहे, तर काहींना आपल्‍या जागा वाढवून घेण्‍यासाठी आपने पुढे आणलेली ही रणनीती असे वाटू लागले आहे.

नमूद करण्‍यासारखी गोष्‍ट म्‍हणजे आपच्‍या केंद्रीय नेत्‍यांनी व्‍यक्‍त केलेली ही भूमिका आपच्‍या स्‍थानिक नेतृत्‍वाला फारशी मान्‍य नाही. यासंदर्भात उघडपणे प्रतिक्रिया देण्‍यासाठी एकही स्‍थानिक नेता पुढे येत नसला तरी आगामी निवडणुकीत भाजपाला हरवायचे असेल तर युतीशिवाय पर्याय नाही, अशी भूमिका हे नेते खासगीत व्‍यक्‍त करीत आहेत.

गुजरातमधील विसावादर या मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून या निवडणुकीत काँग्रेसने आपला उमेदवार उतरविला आहे. त्‍यामुळे आपचे अरविंद केजरीवाल यांनी स्‍पष्‍ट नाराजी व्‍यक्‍त करताना, जर युती असती तर काँग्रेसने आमची मते फोडण्‍यासाठी आपला उमेदवार का रिंगणात उभा केला? असा सवाल करीत काँग्रेसबरोबरची युती संपुष्‍टात आल्‍याची घोषणा केली होती. त्यामुळे सध्‍या आता गोव्‍यात चर्चा चालू आहे.

अद्याप दोन वर्षे बाकी

राजकीय विश्‍लेषक क्‍लिओफात कुतिन्‍हो यांनी याबद्दल प्रतिक्रिया व्‍यक्‍त करताना, विधानसभा निवडणूक येण्‍यासाठी अजून दोन वर्षे बाकी आहेत आणि कुठल्‍याही पक्षांची युती व्‍हावी की नाही याचे निर्णय निवडणूक जाहीर झाल्‍यावर घेतले जातात, हे आजवर दिसून आलेले आहे. त्‍यामुळे गोव्‍यात काँग्रेस आणि आपची युती होणार की नाही, हे निवडणूक जाहीर झाल्‍यावरच स्‍पष्‍ट होईल. मात्र सध्‍या आपने जी भूमिका घेतली आहे ती पाहिल्‍यास गोव्‍यात त्‍यांना आपल्‍या जागा वाढवायच्‍या आहेत आणि त्‍यामुळेच या पक्षाचे केंद्रीय नेते अशातऱ्हेची वक्‍तव्‍ये करत आहेत असेच वाटते असे सांगितले.

इंडिया आघाडी फक्‍त लोकसभा निवडणुकीपुरती

काँग्रेसचे गोवा प्रभारी असलेले काँग्रेसच्‍या केंद्रीय समितीचे सरचिटणीस माणिकराव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्‍यक्‍त करताना, अरविंद केजरीवाल हे आपचे राष्‍ट्रीय निमंत्रक आहेत. आणि त्‍यांचा पक्ष काय निर्णय घेतो हा त्‍यांचा प्रश्‍न आहे. काँग्रेसच्‍या बाबतीत सांगायचे झाल्‍यास इंडिया आघाडी ही फक्‍त लोकसभा निवडणुकीपुरती मर्यादित होती. यापुढे विधानसभा निवडणुकीत जर कुठलाही निर्णय घ्‍यायचा असेल तर तो वेळ आल्‍यावर पक्षश्रेष्‍ठी घेतील असे सांगितले.

Arvind Kejriwal
AAP Goa: आम आदमीच्या नेत्याला पोलिसाने मारहाण केल्याचा दावा; दोन्ही आमदार आक्रमक, निलंबनाची मागणी

...ते काँग्रेसमध्‍ये जाणार

मला जी खात्रीची माहिती मिळाली आहे, त्‍यानुसार आपचे वेंझी व्‍हिएगस व क्रूझ सिल्‍वा हे दोन्‍ही आमदार आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेसचे उमेदवार म्‍हणून लढणार आहेत. आपचे गोवा अध्‍यक्ष अमित पालेकर हेही काँग्रेसमध्‍ये सामील होतील. कदाचित याची चाहूल आपच्‍या केंद्रीय नेतृत्‍वाला लागलेली असेल त्‍यामुळे गोव्‍यात काँग्रेसशी युती करणार नाही अशी भूमिका केजरीवाल यांनी घेतली असावी, अशी प्रतिक्रिया राजकीय विश्‍लेषक राधाराव ग्रासियस यांनी व्‍यक्‍त केली.

Arvind Kejriwal
AAP Protest: मोफत पाणी योजना बंदीवर 'आप'चा संताप! भाजप कार्यालयाबाहेर आक्रमक आंदोलन

सरदेसाई म्‍हणतात, भाजपविरोधात एकत्र यावे

सर्व विरोधकांची युती व्‍हावी, हा मुद्दा सर्वप्रथम गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी पुढे आणला होता. केजरीवाल यांच्‍या भूमिकेबद्दल सरदेसाई यांना विचारले असता, केंद्रीय नेते काय भूमिका घेतात, ते त्‍यांनाच माहीत असेल. मात्र गोव्‍याबद्दल सांगायचे झाल्‍यास भाजपला सत्ताभ्रष्‍ट करण्‍यासाठी सर्व भाजप विरोधी मते एकत्र असणे गरजेचे आहे, अशी तीव्र लोकभावना आहे.

लोकभावनेची जर कुणी कदर केली नाही तर लोक त्‍यांना माफ करत नाहीत, हे यापूर्वी जनतेने दाखवून दिलेले आहे. गोव्‍यातील लोकांची भावना काय आहे, हे मागच्‍या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्‍यातून दिसून आले होते. आता जर त्‍यात कुणी बदल करत असेल तर तो कोण करत आहे, हे लोकांना कळेल आणि अशा पक्षांना गोव्‍यातील जनता पाठिंबा देईल, की नाही याचे उत्तर येणारी विधानसभा निवडणूक देईल, असे ते म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com