

म्हापसा: हडफडे बर्च क्लब दुर्घटनेप्रकरणी, म्हापसा जेएमएफसी कोर्टाने लुथरा बंधूंच्या पोलिस कोठडीत आणखीन ४ दिवसांची वाढ केली. तर, संशयित अजय गुप्ता याची ११ दिवसांसाठी न्यायालयीन कोर्टात म्हणजे कोलवाळ कारागृहात रवानगी केली आहे.
यावेळी लुथरा बंधूंतर्फे संशयित सौरभने, न्यायालयासमोर आम्ही तपासात सहकार्य करू, असे तोंडी सांगितले. दरम्यान, क्लबच्या चार व्यवस्थापकांच्या जामीन अर्जावर मंगळवारी (२३) म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालय आदेश देईल.
सोमवारी (२२) दुपारच्या सत्रात, संशयित सौरभ व गौरव लुथरा या दोघांना हणजूण पोलिसांनी म्हापसा जेएमएफसी कोर्टात आणले. त्यांची पाच दिवसांची पोलिस कोठडी संपुष्टात आल्याने, दोघांना पुन्हा अतिरिक्त कोठडीसाठी न्यायालयात उभे केले होते.
सरकारी वकिलांनी न्यायालयास सांगितले की, संशयितांनी क्लबसाठी जो करार केला होता, त्या कागदपत्रांत बोगसपणा केला आहे. याची चौकशी गरजेची आहे. कोर्टात अर्ज करून, संशयितांचा ताबा आपल्याकडे चौकशीसाठी (ट्रान्सफर) द्यावा, अशी मागणी केली. यावर मंगळवारी न्यायालय आदेश देईल.
लुथरा बंधूंच्या प्रकरणात, दिल्लीतील पीडित पर्यटक जोशी कुटुंबीयांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. त्यानुसार, अॅड. विष्णू जोशी हे या पीडित कुटुंबीयांकडून कोर्टात सोमवारी हजर राहिले होते. या आगीच्या प्रकरणात पोलिस तपासात रोज नवीन तथ्ये समोर येताहेत. त्यामुळे लुथरा बंधूंची कोठडी आवश्यक आहे, असे त्यांनी न्यायालयासमोर सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.