

म्हापसा: उत्तर गोव्यातील हडफडे येथील 'बर्च बाय रोमियो लेन' या प्रसिद्ध नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. या अग्नितांडवात २५ व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला होता. या प्रकरणातील मुख्य संशयित सौरभ आणि गौरव लुथरा या बंधूंना आज सोमवारी (ता. २२ डिसेंबर) म्हापसा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (JMFC) न्यायालयाने मोठा धक्का दिला असून, त्यांच्या पोलीस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ केली आहे.
लुथरा बंधूंची आधीची पोलीस कोठडी संपल्यामुळे त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपासादरम्यान अनेक महत्त्वाचे दुवे अद्याप उलगडणे बाकी असल्याचे सांगत गोवा पोलिसांनी आरोपींची आठ दिवसांची कोठडी मागितली होती.
पोलिसांच्या मते, या दुर्घटनेमागील तांत्रिक कारणे आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन यांबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.
या भीषण दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गोवा सरकारने तातडीने दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीला आगीचे नेमके कारण आणि जबाबदार घटक शोधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान, सरकारने या समितीला अहवाल सादर करण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला आहे. त्यामुळे या समितीच्या अहवालात कोणते धक्कादायक खुलासे होतात, याकडे संपूर्ण गोव्याचे लक्ष लागले आहे.
बर्च नाईट क्लबमध्ये लागलेली आग ही केवळ एक अपघात होती की मानवी चुकांचा परिणाम, याचा शोध पोलीस घेत आहेत. कोठडीच्या वाढीव काळात पोलीस संशयितांकडून क्लबचे परवाने, अग्निशमन यंत्रणा आणि आपत्कालीन बाहेर पडण्याच्या मार्गांची उपलब्धता यांबाबत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतील.
या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाई ही प्रामुख्याने कोठडीत होणाऱ्या तपासावर आणि दंडाधिकारी समितीच्या निष्कर्षांवर अवलंबून असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.