आग भडकली, धावपळ सुरु झाली, 40 सेकंदात सर्व काही संपले! हडफडे दुर्घटनेप्रकरणी तिघे निलंबित; मालकाच्या अटकेसाठी पोलीस दिल्लीत

Goa Night Club Fire: पोलिसांनी आतापर्यंत क्‍लबच्‍या चार वरिष्‍ठ अधिकाऱ्यांना अटक केली असून, मालक सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांच्‍याविरोधात ‘एफआयआर’ दाखल केला आहे.
Romeo Lane fire incident Arpora, Goa
Goa accident latest updatesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी/म्हापसा: हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्‍लबमध्‍ये लागलेल्‍या आगीचा ठपका ठेवत राज्‍य सरकारने माजी पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर, राज्‍य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्‍या तत्‍कालीन सदस्‍य सचिव शमिला मोंतेरो आणि हडफडे–नागवा पंचायतीचे तत्‍कालीन सचिव रघुवीर बागकर यांना निलंबित केले आहे.

तर, पोलिसांनी आतापर्यंत क्‍लबच्‍या चार वरिष्‍ठ अधिकाऱ्यांना अटक केली असून, मालक सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांच्‍याविरोधात ‘एफआयआर’ दाखल केला आहे. या दोघांच्‍या अटकेसाठी पोलिस दिल्लीला रवानाही झाले आहेत.

२५ जणांचा मृत्‍यू झाला. त्‍यात पाच पर्यटक आणि २० कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. तर, सहा जण जखमी झाले असून, त्‍यांच्‍यावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) उपचार सुरू आहेत.

या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी क्‍लबचे सरव्‍यवस्‍थापक राजीव मोडक (४९, दिल्ली), व्‍यवस्‍थापक विवेक सिंग (२७, उत्तर प्रदेश), बार व्‍यवस्‍थापक राजीव सिंघानिया (३२, उत्तर प्रदेश) आणि गेट व्‍यवस्‍थापक हिमांशू ठाकूर (३२, दिल्ली) या चार जणांना अटक केली आहे.

तर, मूळ दिल्‍ली येथील असलेले क्‍लबचे मालक सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांच्‍याविरोधात ‘एफआयआर’ दाखल करण्‍यात आलेला असून, त्‍यांनाही लवकरच अटक करण्‍यात येईल, असे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले होते.

याशिवाय या क्‍लबला ज्‍या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीररीत्‍या परवाने दिले त्‍यांच्‍यावरही कठोर कारवाई करण्‍यात येईल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले होते. दरम्यान, अटक केलेल्या चौघांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आग इलेिक्‍ट्रक आतषबाजीमुळे

‘बर्च बाय रोमिओ लेन’ या क्‍लबमध्‍ये इलेिक्‍ट्रक आतषबाजीमुळे आग लागली. तेथे कोणत्‍याही प्रकारचा स्‍फोट झाला नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्‍या जवानांनी तत्‍काळ तेथे धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु, या घटनेत एकूण २५ जणांचा मृत्‍यू झाला. घटनेत जे २५ जण दगावले, त्‍यातील २३ जणांचा गुदमरून मृत्‍यू झाल्‍याचे तपासातून समोर आलेले आहे. जखमी झालेल्‍या सहा जणांवर सध्‍या बांबोळी येथील गोमेकॉत उपचार सुरू आहेत, असे मुख्‍यमंत्री सावंत यांनी सांगितले.

मृतांच्‍या कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्‍येकी पाच लाख

घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहाटे आपल्‍याशी फोनद्वारे संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. त्‍यानंतर त्‍यांनी केंद्र सरकारमार्फत मृत पावलेल्‍यांच्‍या कुटुंबियांना प्रत्‍येकी दोन लाख आणि जखमींना प्रत्‍येकी ५० हजार रुपयांची भरपाई जाहीर केली. त्‍यानंतर राज्‍य सरकारने मृतांच्‍या कुटुंबियांना प्रत्‍येकी पाच लाख आणि जखमींना प्रत्‍येकी ५० हजार रुपये देण्‍याचा निर्णय घेतला असल्‍याचेही मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनी नमूद केले.

सर्वच क्‍लबचे होणार ऑडिट

राज्‍यात अशा प्रकारच्‍या घटना घडू नये, यासाठी राज्‍य सरकार पूर्णपणे प्रयत्‍नशील आहे. या घटनेची चौकशी करण्‍यासाठी उत्तर गोवा जिल्‍हाधिकाऱ्यांच्‍या अध्‍यक्षतेखाली समिती स्‍थापन करण्‍यात आली असून, त्‍यात पोलिस अधीक्षक आणि अग्निशामक दलाच्‍या संचालकांचा समावेश आहे. या समितीला एका आठवड्यात अहवाल सादर करण्‍यास सांगितले असल्‍याचे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्‍हणाले.

याशिवाय महसूल सचिवांच्‍या अध्‍यक्षतेखाली स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या समितीला राज्‍यातील सर्वच क्‍लबचे ऑडिट करण्‍याचे निर्देश देण्‍यात आलेले आहे. त्‍यांनी ऑडिट केल्‍यानंतर क्‍लबबाबत मार्गदर्शक तत्त्‍वे जारी करण्‍यात येतील. त्‍यानुसार राज्‍यात क्‍लब चालवता येतील, असेही त्‍यांनी नमूद केले.

राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून शोक

गोव्यातील आगीची दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. केंद्र सरकार पीडितांशी पाठीशी ठामपणे उभे आहे.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

आगीच्या घटनेबद्दल समजल्यानंतर अत्यंत दुःख झाले. मृतांच्या नातेवाइकांबद्दल मी सहवेदना व्यक्त करते, या अत्यंत कठीण काळात त्यांना हा धक्का सहन करण्याचे बळ मिळो. त्याचप्रमाणे जे या दुर्घटनेत जखमी झाले आहेत, ते तातडीने बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करते.

-द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती

आपत्कालीन दरवाजा नव्हता; श्वास गुदमरला

१. क्लबची रचना आगरात (पाण्याने वेढलेल्या जागेत) करण्यात आली होती. प्रवेशासाठी लाकडी पुलाचा वापर व खालीच बेसमेंटमध्ये किचन अशा धोकादायक आराखड्यामुळे धूर मोठ्या प्रमाणात तळमजल्यात भरला.

२. आग लागल्याचे कळताच लोकांनी जीवाच्या आकांताने पळ काढला; मात्र बेसमेंटमध्ये आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्गच नसल्याने अनेकांचा श्वास गुदमरला. ऑक्सिजनअभावी बहुतेकांचं मृत्यूशी झुंज देणं अपयशी ठरले.

४० सेकंदांत सर्व काही संपले...

शनिवारी (ता.६) रात्री ११.४५ वाजता पहिल्या मजल्यावर म्युझिक-डान्स शो सुरू होता. ‘मेहबूबा, मेहबूबा’ या गाण्यावर नृत्य सुरू असतानाच छताजवळ ज्वाला भडकल्या आणि अवघ्या ४० सेकंदांत आग सर्वत्र पसरली. लाकडी साहित्य आणि पहिल्या मजल्यावरील बार काउंटरमुळे आग अधिक भडकली. काही क्षणांतच ती बेसमेंटपर्यंत पोहोचली अन्‌ धावपळ सुरु झाली.

क्षणभर उशीर झाला असता, तर...

आग लागल्याचे समजताच लोक जीवाच्या आकांताने बाहेर पळू लागले. स्टाफ मदतीला धावत आला. लोक एकमेकांना हात देत होते, परंतु त्या क्षणी कुणालाही वाटले नव्हते की एवढ्या झपाट्याने सर्व काही बदलणार..पहिल्यांदा चेंजिंग रूममध्ये जावे असे मला वाटले, पण माझ्या क्र्यू मेंबरने मला तिकडे जाऊ दिले नाही.

कदाचित त्याच क्षणी माझा जीव वाचला असावा. नाहीतर, मीही धुरात गुदमरून मृत्यूमुखी पडले असते. घरी पोहोचल्यावर मी मुलीला घट्ट मिठी मारली आणि परमेश्वराला धन्यवाद दिले. हा माझा त्या दिवसाचा दुसरा परफॉर्मन्स होता, अशी प्रतिक्रीया बेली डान्सर क्रिस्टिना शेख यांनी एका वृत्तसंस्थेला दिली आहे. कझाकिस्तानची ही प्रोफेशनल डान्सर गोव्यातील आगीच्या घटनेनंतर समाजमाध्यमावर चर्चेत आली आहे.

Romeo Lane fire incident Arpora, Goa
Goa Nightclub Fire: 'बर्च बाय रोमियो लेन'ची खासियत काय? कॉकटेल, म्युझिक आणि 'आयसोलेटेड' पार्टीचा अनुभव देणारा क्लब!

तीन बहिणींचा करुण अंत; एक बचावली

हडफडेतील भीषण आग दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन बहिणींचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक माहिती समोर आली आहे. दिल्ली येथील चार बहिणी क्लबमध्ये आल्या होत्या.

त्यापैकी भावना जोशी या थोडक्यात बचावल्या; परंतु सरोज जोशी, अनिता जोशी आणि कमला जोशी यांचा या आगीत करुण अंत झाला. त्यांच्यासोबत आलेले विनोद कुमार यांचाही मृत्यू झाला असून, एका क्षणात कुटुंबातील चार सदस्यांना गमावल्याने त्यांच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Romeo Lane fire incident Arpora, Goa
Goa Nightclub Fire: "भाजप सरकार हाय हाय..." परवाना नसतानाही नाईट क्लब सुरू कसा? विरोधक आक्रमक! VIDEO

वागातोर, आसगावमध्ये क्लब ‘सील’

रोमिओ लेनचा वागातोर येथील क्लब आणि आसगावमधील ब्यूटीक रिसॉर्ट मामलेदार कार्यालयाकडून सील करण्यात आलेे आहे. साकवाडी हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन या नाईट क्लबमध्ये घडलेल्या अग्नितांडवाच्या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणेकडून ही कारवाई करण्यात आली.

या दुर्घटनाग्रस्त नाईट क्लबमध्ये पर्यटक तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेसाठी आवश्यक सुरक्षात्मक उपाय व्यवस्था नसल्याचे आढळून आले होते. त्यानुसार, या आस्थापनाच्या मालकीच्या वझरात वागातोर येथील रोमिओ लेन क्लब तसेच आसगाव येथील रोमिओ लेन ब्यूटीक रिसॉर्टची पडताळणी सरकारी यंत्रणांनी केली. त्यात त्यांना या ठिकाणी सुरक्षात्मक उपाय नसल्याचे दिसून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com