म्हापसा : छाननी समितीच्या निर्देशानंतर बार्देश उपजिल्हाधिकारी गुरुदास देसाई यांनी सोमवारी (ता.२२) नगरसेवक तारक आरोलकर यांनी दिलेले ओबीसी प्रमाणपत्र रद्द केले. आरोलकर यांनी ओबीसीसाठी राखीव असलेल्या म्हापसा नगरपालिकेच्या प्रभाग 7 मधून निवडणूक लढवली होती आणि ते निवडून आले होते.
माजी नगरसेवक फ्रँकी कार्व्हालो यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. कार्व्हालो यांनी समाजकल्याण विभागाच्या तीन सदस्यीय छाननी समितीकडे धाव घेतली होती. याप्रकरणी छाननी समितीने निवाडा देत म्हटले होते, की म्हापसा पालिकेचे नगरसेवक तारक आरोलकर यांनी सादर केलेले कथित ओबीसी प्रमाणपत्र हे पडताळले गेले नाही. त्यामुळे बार्देश उपजिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रमाणपत्र रद्द करावे. दरम्यान, आता उपजिल्हाधिकाऱ्यांनी ओबीसी प्रमाणपत्र रद्द केल्याने तारक आरोलकरांचे नगरसेवक धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.
फ्रँकी कार्व्हालो यांनी 2021 मध्ये तारक आरोलकर यांच्या विरोधात वरील छाननी समितीकडे तक्रार केली होती. कारण, आरोलकरांनी एप्रिल 2021च्या म्हापसा पालिका निवडणुकीत ओबीसीचे खोटे प्रमाणपत्र सादर करून ही निवडणूक लढवली होती. त्यानंतर, म्हापसा पालिकेच्या प्रभाग 7 मधून आरोलकर हे ओबीसी आरक्षित प्रभागातून जिंकून आले होते.
आरोलकरांनी आपल्या वडिलांचे खोटे जन्म प्रमाणपत्र जोडून हे ओबीसी प्रमाणपत्र मिळविले होते.निवडणूकावेळी बार्देश उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर सदर प्रमाणपत्र हे रद्द करण्याचे निर्देश या छाननी समितीने दिलेत, असेही फ्रँकी कार्व्हालो यांनी सांगितले होते.
अपात्रतेची टांगती तलवार!
ओबीसी प्रमाणपत्र रद्द झाल्याने आता नगरसेवक तारक आरोलकर यांचे पालिका नगरसेवक सदस्यत्व सध्या कात्रीत सापडले आहे. या ओबीसी दाखल्याची प्रत राज्य निवडणूक आयोगाकडे पुढील निर्णयासाठी पाठवली जाईल. सदर दाखला मागे घेतल्याने नगरसेवकाच्या भवितव्यावर पुढील निर्णय हा राज्य निवडणूक आयोगाकडून घेतला जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
उपजिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाची प्रत संबंधित प्राधिकारणीला पाठवली गेली आहे. यात पालिका संचालनालय, म्हापसा पालिका, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी तसेच निवडणूक आयोगाचा त्यात समावेश आहे.
उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला दाखला मागे घेतल्याने त्याची दखल घेऊन उच्च प्राधिकारणीने आरोलकरांना तातडीने अपात्र घोषीत करावे, अशी प्रतिक्रिया तक्रारदार फ्रॅन्की कार्व्हालो यांनी दिली
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.