Arambol Beach: पेडणे तालुक्यातील मांद्रे, मोरजी व केरी-तेरेखोल अशा तीन सर्वांगसुंदर पर्यटनस्थळांपैकी हरमल समुद्रकिनारा जगात बराच प्रसिद्ध आहे. मात्र अजूनही तो विकासाच्या प्रतीक्षेत आहे.
त्याची कारणे अनेक असली तरी त्याबाबत जोपर्यंत शासनाची मानसिकता होत नाही, तोपर्यंत विकास शून्य. हरमल ही ऋषीमुनी परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. पण शासनाची वक्रदृष्टी व दुजाभाव होत असल्याने हे पर्यटनस्थळ उपेक्षित बनले आहे.
दरवर्षी पर्यटन हंगामात देश-विदेशातील लाखो पर्यटक हरमल किनाऱ्याला भेट देतात. विस्तीर्ण किनारा, लाटांची गाज व पलीकडे परशुराम टेकडीवरून गेल्यास विहंगम तसेच शांत, एकांतातील ‘स्वीट लेक’ अर्थात गोड्या पाण्याचे तळे.
येथे आलेला पर्यटक या गोड्या पाण्याच्या तलावाला भेट दिल्याशिवाय माघारी परतत नाही, हे विशेष. या तळ्याच्या संवर्धनासाठी ज्या प्रकारे प्रयत्न व्हायला पाहिजेत, तसे ते होताना दिसत नाहीत. त्यासाठी सरकार दरबारी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे.
सदर तळ्याच्या उत्तरेला खासगी वनक्षेत्र असून काही भाग भाडेपट्टीवर दिल्याने तेथे बांधकामे व झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. दोन वेळा पंचायतीने पाहणी केली, मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, वन विभाग, उपजिल्हाधिकारी आदी कार्यालयातून ‘तू चाल पुढे’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.
पंचायत क्षेत्रातील निसर्गप्रेमी नागरिक ‘स्वीट लेक’च्या जतनासाठी आवाज उठवत आहेत. तर, काही मंडळी ‘सेटिंग’ करण्यात गुंतली असल्याची चर्चा किनारी भागात सुरू आहे. ‘स्वीट लेक’चे अस्तित्व सेटिंगच्या गर्तेत हरवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रसाधनगृह नसल्याने पर्यटकांची गैरसोय
हरमल किनाऱ्याचे महत्व लक्षात घेऊन तत्कालीन दोन लोकप्रतिनिधीनी ‘हायफाय’ प्रसाधनगृहाची दोनदा पायाभरणी केली व ग्रामस्थांना अचंबित केले. जमीन संपादन करण्यापूर्वी पायाभरणी प्रक्रिया केली.
मात्र नंतर ते श्रेय घेण्याचे नाटक होते हे कळून चुकले. सध्या पार्किंगची सोय खासगीरित्या होत असल्याने गैरसोय होत नाहीय.
परंतु प्रसाधनगृह अत्यावश्यक असून समुद्रस्नान केल्यानंतर कपडे बदलण्यासाठी विशेषत: महिलांना या कक्षाची गरज असते. मात्र सरकारकडून भूसंपादन प्रक्रियेस विलंब होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
चोरी, विनयभंग, दादागिरीचे प्रकार वाढले
किनाऱ्यावर येणाऱ्यांना पर्यटकांना लमाणी महिला व पुरुष मसाज तसेच अन्य प्रकारच्या सोयी पुरवितात. पण अनेकदा पर्यटकांच्या किमती सामानाची चोरी, विनयभंग, दादागिरी आदी प्रकार घडतात.
असे प्रकार रोखण्यासाठी सरकारने किनारी पोलिस विभागाची स्थापना केली. परंतु त्यांच्या अनियमित ‘ड्युटी’मुळे लमाण्यांवर क्वचितच कारवाई होते. हरमल किनाऱ्यावर दोन विनयभंगाचे प्रकार घडले आहेत.
लमाणी महिलांची डोकेदुखी
राज्याच्या किनारी भागात पर्यटनाच्या मुळावर उठवलेली जमात म्हणजे ‘लमाणी’ होय. किनाऱ्यावर पर्यटक उतरले रे उतरले की, लमाणी बाया, त्यांची पोरे पर्यटकांच्या पुढ्यात धाव घेतात आणि वस्तू खरेदीसाठी तगादा लावतात.
तसेच मसाज, वेणी, टॅटू करून घेण्यासाठी पिच्छा पुरवितात. पर्यटकांना ‘उल्लू’ केल्याशिवाय ही मंडळी स्वस्थ बसत नाही. त्यामुळे पर्यटकांना मन:स्ताप सहन करावा लागतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.