

डिचोली: डिचोली तालुक्यातील आमठाणे जलाशयात सध्या मुबलक जलसाठा उपलब्ध झाल्याने साळ येथील शापोरा नदीतून पाणी सोडण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. गेल्या एप्रिल महिन्यापासून जलाशयातील पाणीपातळी घटल्यामुळे जलसाठा कायम राखण्यासाठी शापोरा नदीतील बंधाऱ्यातून मोठ्या जलवाहिनीद्वारे पाणी आमठाणे जलाशयात वळविण्यात येत होते.
मात्र, आता पावसाळ्याची चाहूल लागल्याने आणि जलाशयातील पाणीपातळी समाधानकारक वाढल्याने हा पुरवठा थांबविण्यात आला आहे. मेणकुरे-धुमासे पंचायत क्षेत्रातील या जलाशयाचे कार्यक्षेत्र ५८२ हेक्टर मीटर असून पूर्ण जलपातळी ५२ मीटर आहे. धरणावरील सर्व्हिस गेटच्या दुरुस्तीनंतर जानेवारी महिन्यात जलसाठ्याची पातळी नियंत्रित करण्यात आली होती.
त्यानंतर पाण्याची पातळी कमी होऊन परिसरातील पात्र कोरडे पडल्याने शापोरा नदीचे पाणी जलाशयात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता जलाशयात पुरेसा जलसाठा उपलब्ध असून पावसाळाही जवळ आल्याने नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नसल्याचे जलस्रोत खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे उत्तर गोव्याच्या पाणीपुरवठ्याबाबतचा संभाव्य धोका सध्या टळल्याचे चित्र आहे.
रविवारी सायंकाळपर्यंत आमठाणे जलाशयातील जलपातळी ४६.२ मीटर इतकी नोंदविण्यात आली. एप्रिल महिन्यात हीच पातळी ४४.८ मीटरपर्यंत खाली आली होती. त्यामुळे गेल्या महिन्याच्या तुलनेत सुमारे दीड मीटरने जलसाठ्यात वाढ झाली आहे. आमठाणे जलाशयातील पाणी अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात प्रक्रिया करून उत्तर गोव्यातील विविध भागांना पुरविले जाते. त्यामुळे या जलाशयाच्या जलसाठ्याला विशेष महत्त्व आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.