पणजी : काँग्रेसचे आमदार फुटून भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या अफवा रोज येत असून येणाऱ्या काळात पक्षांतर होणार असल्याची चर्चा सध्या राज्यात सुरू आहे, परंतु पक्षांतराचा एक प्रयत्न विफल केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हे शांत बसलेले नसून आपण कुठल्याही परिस्थितीत पक्षांतर व्हायला देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. हिंमत असेल, तर राजीनामा द्या आणि पक्षांतर करा, असे जाहीर आव्हान पाटकर यांनी फुटीर आमदारांना दिले आहे.
पक्षांतर करण्याच्या अफवा सुरूच असून मंगळवारी रात्री उशीरा पक्षाचे आमदार विधानसभेत पोहोचल्याची अफवा पसरल्याने खळबळ उडाली होती. त्यात सभापती रमेश तवडकर आणि काँग्रेसच्या आमदारांचे फोन लागत नसल्याने एक खळबळ उडाली होती. आज पक्षांतर होणार अशी अफवा पसरली होती. ज्यांना पक्ष सोडून जायचे असेल, त्यांनी खुशीने जावे, परंतु त्यासाठी आमदारकीचा राजीनामा देऊन लोकांच्या समोर जावे. त्यांच्यात ही हिंमत नाही. कारण लोकांनी त्यांना काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आणले आहे. असे केल्यास त्यांचा पराभव निश्चित असल्याचे पाटकर म्हणाले.
विधिमंडळ गटनेता येत्या आठवड्यात?
काँग्रेस विधिमंडळ गटनेतेपदावरून मायकल लोबो यांची हकालपट्टी होऊन जवळपास तीन आठवडे पूर्ण व्हायला आले असले, तरी पक्षाचा नवीन नेता ठरत नाही. यासंदर्भात दिल्लीत पाटकर यांची केंद्रीय नेत्यांसबोत बैठक झाली होती. या आठवड्यात आणखी एक बैठक होणार होती, परंतु पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू असल्याने अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून निषेध प्रदर्शन सुरू आहे. त्यामुळे केंद्रीय नेते यात व्यस्त असल्याने विधिमंडळ गटनेता ठरण्यासाठी विलंब होत असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली. पुढच्या आठवड्यात विधिमंडळ गटनेता निवडण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.