
पणजी: गोव्यातील राजकीय वर्तुळात सध्या एक नवा वाद चर्चेत आहे. रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी गुरुवारी (१८ ऑक्टोबर) पुकारलेल्या आंदोलनामुळे पणजी शहरात मोठी वाहतूक कोंडी झाली. या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल आम आदमी पक्षाचे अमित पालेकर यांनी जनतेची जाहीर माफी मागितली आहे.
विजय सरदेसाई यांच्या आवाहनानंतर, आझाद मैदानावर सर्वपक्षीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले. सुमारे दीडशे ते दोनशे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते, ज्यामुळे संपूर्ण परिसरात वाहतूक विस्कळीत झाली. या गोंधळामुळे अनेक नागरिकांना कामावर जाण्यास किंवा घरी परतण्यास उशीर झाला. या परिस्थितीवर ‘आप’ने तातडीने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. पालेकर म्हणाले, "आम्ही नम्रतेने जनतेची माफी मागतो. काल आम्ही लोकांचा आवाज बनून रस्त्यावर उतरलो होतो. यामुळे ज्यांना कुणाला त्रास झाला असेल, त्यांच्यासाठी आम्ही क्षमस्व आहोत."
जनतेची माफी मागितल्यानंतर पालेकर यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. "जर आम्ही हे पाऊल उचलले नसते, तर सरकार जागे झालेच नसते. भाजप जेव्हा घाबरतो, तेव्हा एकतर पोलिसांना समोर करतो किंवा धमक्या देतो," अशी टीका त्यांनी केली. ही लढाई लोकांसाठी होती आणि त्यांच्यासाठीच आपण रस्त्यावर उतरलो, असे ते म्हणाले. भाजपने सोशल मीडियावरून कितीही स्वतःचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला, तरी तो फोल ठरेल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
पालेकर यांनी भाजपला एक प्रकारे इशाराच दिला आहे. "भाजपला आता खऱ्या अर्थाने घाबरण्याची वेळ आली आहे," असे म्हणत त्यांनी पुढील संघर्षाची तयारी दर्शविली. गोवा पोलीस आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.