Rama Kankonkar: ..जागे व्हा गोवेकरांनो! एका हाकेवरून नेते, समाजकार्यकर्ते आझाद मैदानात एकवटले; हल्ल्याचा मुख्य सूत्रधार कोण?

Rama Kankonkar Attack: गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी रामा काणकोणकरांवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी (ता.१८) सायंकाळी समाजमाध्यमातून आझाद मैदानात येण्याची हाक दिली होती.
Rama Kankonkar Assault
Rama Kankonkar AssaultDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी रामा काणकोणकरांवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी (ता.१८) सायंकाळी समाजमाध्यमातून आझाद मैदानात येण्याची हाक दिली होती. त्यानुसार सर्वपक्षीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सकाळी सहभाग घेतला. दीडशे ते दोनशे कार्यकर्ते या ठिकाणी जमले.

आझाद मैदानात मान्यवरांनी रामा काणकोणकरांवरील हल्ल्याचा निषेध करीत राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. त्याशिवाय राजकारण्यांच्या आशीर्वादाशिवाय हा हल्ला होणार नसल्याची टीका उपस्थित नेत्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.

आंदोलनात सहभागी झालेल्यांनी आपली खदखद व्यक्त केल्यानंतर आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी सर्वांनी शांततेत भाजप कार्यालयावर मोर्चा नेण्याचा निर्णय जाहीर केला; परंतु आंदोलनात सहभागी झालेल्या नेत्यांनी थेट पोलिस मुख्यालयात घुसण्याचा निर्णय घेतला.

त्यावेळी काही मोजक्याच नेत्यांना मुख्यालयात सोडण्यात आले, परंतु त्यासाठी पोलिसांनी काही काळ मुख्यालयाचे प्रवेशद्वार बंद करून इतर आंदोलनकर्त्यांना अडवून धरले. त्यामुळे मुख्यालयाबाहेर उपस्थितांनी घोषणाबाजी केल्याने वातावरण तंग बनले.

पोलिस अधीक्षकांना भेटून आल्यानंतर मुख्यालयाबाहेर आलेल्या आमदार सरदेसाई यांनी सांगितले की, आम्ही पोलिस महासंचालकांना भेटण्यासाठी गेलो होतो; परंतु पोलिस अधीक्षक आम्हाला भेटले. राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) लागू करण्याची मागणी आम्ही केली आहे.

त्याचबरोबर इतर मागण्याही मांडल्या असून ‘एनएसए’ लागू करण्याविषयी पोलिस महासंचालकांकडे आपण ती मागणी मांडू, असे आश्वासन त्यांनी दिले.

तेथून आंदोलनकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयाकडे धाव घेतली. त्याचवेळी सरकारी छापखान्याच्या कोपऱ्यावर आंदोलनकर्त्यांनी ठाण मांडले होते. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि खासदार विरियातो फर्नांडिस यांच्यावर कोणी पोलिसांनी दांडा मारल्याने त्या पोलिसाच्या निलंबनाची उपस्थितांनी मागणी केली.

त्यानंतर हा सर्व जमाव पोलिसांचे कडे तोडून आराम हॉटेलच्या चौकात आल्यानंतर पोलिसांनी पुन्हा त्याला अटकाव केला, परंतु आंदोलनकर्त्यांनी त्यानंतर हाही विरोध मोडीत काढीत भाजपच्या कार्यालयाकडे धाव घेतली. त्या ठिकाणी शंभरावर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना कार्यालयाबाहेर कडे करून अडविले.

Rama Kankonkar Assault
Rama Kankonkar Assault: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात मोठी घडामोड! आणखी दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कटाचा उलगडा होणार?

या आंदोलनात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, गोवा प्रभारी सचिव अंजली निंबाळकर, प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतीक्षा खलप, समील वळवईकर, ‘एनएसयूआय’चे नौशाद चौधरी, सुनील कवठणकर, गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत, प्रतिमा कुतिन्हो, प्रकाश वेळीप, महेश म्हांबरे, शिवसेनेचे (उबाठा) जितेश कामत, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) जुझे फिलीप डिसोझा, आपचे वाल्मिकी नाईक, गेर्सन गोम्स, सुरेल तिळवे, रॉक मास्कारेन्हस, सुनील सिंग्नापूरकर, ॲड. सुनील लोरन आणि संदेश तेलेकर-देसाई यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Rama Kankonkar Assault
Rama Kankonkar: राजधानीत रस्‍ता रोखला! 'काणकोणकर' हल्‍ल्‍याचा तीव्र निषेध; सरकारविरोधी घटक एकवटले

वाहतूक कोंडी, लोकांचे हाल

१.आंदोलनकर्त्यांनी आज महात्मा गांधी मार्गावर सरकारी छापखाना संचालनालयाच्या कोपऱ्यावर आंदोलन केल्याने या मार्गावरील वाहतूक अडकून पडली होती. त्यानंतर पुढे १८ जून मार्गावर आराम हॉटेलजवळ पुन्हा आंदोलनकर्त्यांना अडविल्याने १८ जून मार्गावरील वाहतूक अडकून राहिली.

२.त्यानंतर पुन्हा भाजप कार्यालयाकडे आंदोलनकर्त्यांनी धाव घेतल्याने पोलिसांचा लवाजमा आणि आंदोलनकर्त्यांच्या गर्दीमुळे आत्माराम बोरकर मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर चर्च स्क्वेअरकडे आंदोलन करण्यात आल्यानंतर पणजी बाहेर जाणाऱ्या वाहनधारकांना पुन्हा वाहने वळवून हिंदू फार्मसीकडून मुख्य रस्त्यावर यावे लागले होते.

३. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी बांदोडकर मार्ग अडविल्याने पणजी बसस्थानक, पर्वरी, बांबोळी या परिसरातही वाहतूक कोंडी दिसून आली. शाळा सुटण्याच्या सुमारास रास्ता रोको झाल्याने अनेक पालकांची वाहने वाहतूक कोंडीत अडकली होती, त्याबद्दल काही पालकांनी नाराजी व्यक्त केली.

४.आंदोलनकर्त्यांनी चर्च चौकात येऊन मुख्यमंत्री निवासाकडे जाणाऱ्या मार्गावर ठाण मांडले. त्या ठिकाणीही पोलिसांनी आपले वाहन आडवे लावून पोलिसांचे कडे करून आंदोलनकर्त्यांना अडवले. त्याच ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी पुन्हा ठिय्या मांडला.

सरकारमधील लोकांशी संबंधित असलेल्यांनी रामा काणकोणकरांवर केलेला हल्ला निषेधार्ह आहे. राज्यात गोवेकर खरोखर सुरक्षित आहेत का, असा प्रश्न पडतो. या हल्ल्याची योजना कोणी आखली? यामागील सूत्रधार कोण आहे? या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. आम्ही या कृत्याचा तीव्र निषेध करतो.

युरी आलेमाव

आम्ही काणकोणकर यांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहोत. लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आंदोलन करीत आहेत. राज्य सरकार गोवा संपवण्यासाठी निघाले असल्यानेच लोक रस्त्यावर येत आहेत. सरकारविरुद्ध कोण बोलेल, त्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होत आहे. आरोपी जामिनावर सुटल्यानंतरही गुन्हा करीत आहेत, त्यामुळे यामागील मुख्य सूत्रधार कोण? जो कोणी मुख्य सूत्रधार आहे, त्याला सर्वांसमोर आणायला हवे.

ॲड. कार्लुस फेरेरा, आमदार

राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप आम्ही यापूर्वीपासूनच करीत आहोत. सामाजिक कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो, या हल्ल्यातील मुख्य सूत्रधारास अटक झाली पाहिजे, अन्यथा गोवा बंद पुकारू.

अमित पाटकर

राज्यात भाजप सरकार सालाझार राजवटीची नक्कल करत आहे. सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांवर हल्ले होणे आता नित्याचे झाले आहे. आमदारांना विधानसभेत बोलू न देणाऱ्या सरकारकडून लोकांना न्याय मिळण्याची अपेक्षा तुम्ही करू शकत नाही.

वीरेश बोरकर, आमदार

कार्यकर्ते, विरोधी पक्ष, उटा आणि स्थानिक लोक रामावरील हल्ल्याला ‘लोकशाहीला धोका’ मानतात आणि या हल्ल्यामागील सूत्रधारावर कठोर कारवाई करावी. आम्ही या हल्ल्याचा तीव्र निषेध करीत आहोत, पण मुख्य गुन्हेगारावर कारवाई केली गेली नाही, तर आम्ही पुढील आवाहन करू आणि गोवा बंदचा विचारदेखील करू.

एलिना साल्ढाणा

काणकोणकर राज्यातील समस्यांविषयी आवाज उठवत आहेत, ते खरे राखणदार आहेत. बेकायदेशीर कामांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे सरकारकडून त्यांना असे बक्षीस मिळाले? आम्ही सरकारला माफ करू शकत नाही. मार्चमध्ये काणकोणकरांवर हल्ला झाला होता, आता तर खुनी हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्यामागील मुख्य सूत्रधारास अटक करावी.

माजी आमदार प्रसाद गावकर

जागे व्हा गोवेकरांनो.., गोमंतकीयांना घराबाहेर पडून चुकीच्या कृत्यांविरुद्ध एकत्र येण्याचे आणि काल क्रूर हल्ला झालेल्या सामाजिक कार्यकर्ता रामा काणकोणकर यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठिंबा दर्शवावा.

ॲड. अमित पालेकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com