गोवा: न्यायालयीन निवाडे कोकणीतून देण्याबाबत आपण मुख्य न्यायाधिशांना निवेदन सादर करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी करतात तोपर्यंत त्यापाठोपाठ ज्येष्ठ साहित्यिक पुंडलिक नाईक यांनी राज्यातील सर्व व्यवहार कोकणीतून होण्याची गरज प्रतिपादली आहे. कोकणीला राजभाषेचा दर्जा मिळाल्यास पस्तीस वर्षे झाली; पण अजूनही सर्व सरकारी कामकाज व व्यवहारच नव्हे तर पंचायती, जिल्हा पंचायती व पालिका बैठकांचे कामकाज व नोंदीही विदेशी भाषांतूनच होतात. आता खरेच दिवस बदलतील का? असा प्रश्न कोकणीप्रेमीतून विचारला जात आहे. ∙∙∙
मायकल यांची कबुली
विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी विकासकामांप्रती सरकारकडून दूजाभाव होत नाही, असा जो निर्वाळा दिला आहे त्यामुळे काँग्रेसमधील अनेकांच्या भुवया उंचावणे साहजिक आहे. पण, लोबो यांनी साधेपणाने ही कबुली दिली. कारण ते भाजपमंत्री असताना जे विकासकामांचे प्रस्ताव त्यांच्यासमोर आले ते मंजूर करताना त्यांनी पक्षीय दृष्टीकोन ठेवला नव्हता. पण, इतरांच्या बाबतीत काय? असा प्रश्न उपस्थित होतो. लोबो हे भलतेच महत्त्वाकांक्षी म्हणूनही ओळखले जातात. त्यांच्या या कबुलीचा वेगळा अर्थ काढला जात आहे. काही जण म्हणतात, भाजपकडून प्रकरणे बाहेर काढली जातील म्हणून मायकल घाबरत आहेत. परंतु हे खरे की खोटे कुणास ठाऊक. ∙∙∙
लोकांशी कसे बोलावे ते शिकवा
वीज खात्यातील लाईनमन आणि हेल्परांचा सन्मान सोहळा नुकताच राज्यभर झाला. चांगली गोष्ट आहे, शेवटी या लोकांना याच कामासाठी कामावर घेतले आहे नाही का; पण हे लोक धोकादायक स्थितीत काम करतात म्हणून त्यांचा हा सन्मान. याबद्दल कुणालाही आक्षेप नाही, पण वीज खात्याबरोबरच इतर सर्व सरकारी खात्यात लोकांशी कसे बोलावे याचे जरा प्रशिक्षण द्या या सरकारी कर्मचाऱ्यांना. सरकारी कर्मचाऱ्यांना लोकांच्या खिशातील कर गोळा करूनच पगार दिला जातो ना. पण, सरकारी कार्यालयात जा त्यासाठी या कार्यालयाच्या पायऱ्या झिजवा आणि कामासाठी महिनाभर थांबा, असा प्रकार बऱ्याचदा गरीब बापड्या गोमंतकीयाच्या भाळी येतो. त्यावर योग्य नियंत्रण आणायला हवे. सन्मान सोहळे कराच, काही हरकत नाही, पण निदान या सूचनेकडे तरी संबंधित मंत्री, मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे एवढीच गरीब बापड्या गोमंतकीयांची अपेक्षा. ∙∙∙
मंत्री गावडेंची फटकेबाजी
भाजप सरकारमधील मंत्री व आमदारांनी पदभार मिळाल्यापासून धडाकेबाज सुरवात केली आहे. मंत्र्यांनी तर लोकांमध्ये जाऊन आपापली छाप पाडण्यास तसेच काम सुरू केले आहे. आताच सुरवात झाली आहे. अजून पाच वर्षे आहेत व त्यांचा जोश तेवढाचा कायम राहणार की नाही हे येणारा काळच ठरविल; मात्र सध्या तरी धडाडीने वावरू लागले आहेत. प्रियोळचे आमदार तथा मंत्री गोविंद गावडे यांनी तर क्रीडा खाते मिळाल्यापासून जोरदार फटकेबाजी सुरू केली आहे. त्यामुळे क्रीडा खात्याशी संबंधित असलेली कार्यालयातील कर्मचारी वर्ग जो झोपी गेला होता तो जागा झाला आहे. मंत्री केव्हा कार्यालयात धडकतील व फाईल मागतील याचा नेम नाही या विचारानेच सर्वजण कामाला लागले आहेत. गावडे हे नाट्यकर्मी असल्याने त्यांची बोलण्याची शैली व ढब तशी वेगळीच. त्यांचा आवाज हा अधिकाऱ्यांच्या मनात भय घालणारा आहे. त्यांनी जो कामाचा सपाटा लावला आहे तसेच क्रीडामैदानांची पाहणी केली आहे यावरून गोव्यातील क्रीडा क्षेत्राला चांगले दिवस आले आहेत. मात्र, ते कितपत अबाधित राहतील हाही एक प्रश्नच आहे. ∙∙∙
विजयवर दामू सरस
सतत तिसऱ्यावेळी जिंकून आल्यानंतरही राजकीय स्थितीचे अवलोकन करत आहे असे सांगत विजय सरदेसाई हे कासवासारखे कवचात तोंड लपवून बसलेले असताना त्यांचे भाजपातील विरोधक असलेले दामू नाईक मात्र बरेच सक्रिय झालेले दिसतात. दोन दिवसांपूर्वी दामू नाईक यांनी आपण अध्यक्ष असलेल्या घोगळ मडगाव येथील साई सेवा मंडळाच्या देवस्थानात साईबाबांची नवीन मूर्ती प्रतिष्ठापना करण्याचा भव्य समारंभ आयोजित केला. या समारंभाला खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे हे हजर राहिले. इतरही राजकारणी होतेच त्याशिवाय फातोर्डा मतदारसंघातील असंख्य लोक उपस्थित होते. या समारंभातून दामू यांनी अजूनही राजकियदृष्ट्या आपण संपलेलो नाही हे पुन्हा एकदा निर्विवादपणे सिद्ध करून दाखविलेच. ∙∙∙
घुमजाव सुरू
महागाईवर लगाम म्हणून सरकारने प्रत्येक कुटुंबाला वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडर देणार असल्याचे घोषित केले होते. अजून एक महिना झाला नसताना सोशल मीडियावर गॅस सिलिंडर संदर्भात बातमी आली ती म्हणजे तीन सिलिंडर फक्त बीपीएल घटकांना. आता सोशल मीडियावर टीका सत्र सुरू झाले आहे. ‘बीपीएल’ची यादी खरी आहे की खोटी. कारण ‘बीपीएल’ म्हणून रांगेत राहणारे महागड्या गाड्या घेऊन फुकट तांदूळ मिळविण्यासाठी येत असतात. त्यातच नवश्रीमंत गरीब लोकांना गॅस सिलिंडर मोफत देणार असाल तर मग सरकारच्या कमकुवत घटकांनी काय आणि कोणाचे घोडे मारले म्हणून सर्व सुविधांपासून वंचित केले जात असल्याची टीका होऊ लागली आहे. महागाई गरीबांना, मध्यम वर्गीयांना वेगळ्या पद्धतीने न ग्रासता सर्वांना समान झळ पोचवित आहे. आता बातमी खरी की खोटी हे सरकारला माहीत; मात्र घुमजाव होऊ नये ही गोव्यातील सर्वच लोकांची अपेक्षा. ∙∙∙
‘गरज सरो अन् वैद्य मरो’
‘गरज सरो अन् वैद्य मरो’ अशी एक म्हण आहे. राजकारणात ह्या म्हणीचा तसा पदोपदी अनुभव येतो. राजकारणातले एखाद्याचे महत्त्व जरा कमी झाले किंवा निवडणुकीत एखाद्या मंत्र्याचा पराभव झाला. मग तो मंत्री, नेता का असेना, पक्षासाठी त्याचे मोठे योगदान का असेना ह्या सध्याच्या पक्क्या व्यावहारिक राजकारणात त्याला पक्षात फारसे महत्त्व राहत नाही. बुधवारी पेडणे नगरपालिकेच्या इमारतीचा पायाभरणी समारंभ मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाला. वास्तविक ह्या इमारत प्रकल्पासाठी या भागाचे तकालिन आमदार व माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचे मोठे योगदान आहे. नोव्हेंबरमध्ये ही पालिकेची जुनी इमारत पाडून प्रत्यक्ष कामालाही प्रारंभ झाला. परंतु मडगावात बाबू हरले. पेडण्यात प्रवीण आर्लेकर जिंकले. विधानसभा निवडणूक झाल्यावर लगेच एका महिन्याच्या आत सरकारला पायाभरणीसाठी वेळ मिळाला. पायाभरणी समारंभाला नवे आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक आले. मोठमोठी भाषणे झाली. पण, हा प्रकल्प ज्यांच्या प्रयत्नामुळे झाला त्या बाबू आजगावकरांचा कुणीही उल्लेख केला नाही. त्यामुळे बाबूंचे कार्यकर्ते आणि हितचिंतक यांच्या मनाला ही घटना बरीच लागून गेली आहे. ∙∙∙
दिगंबरची पुन्हा चर्चा
दिगंबर कामत आपल्या खासगी कामासाठीही दिल्लीत गेले तरी येथे गोव्यात ते भाजपात सामील झालेच अशा वावड्या उडू लागतात. मागच्यावेळी ते एका लग्न समारंभासाठी आपल्या पत्नीसह दिल्लीत गेले आणि स्थानिक सोडाच राष्ट्रीय वाहिन्यांनी देखील दिगंबर भाजपात डेरेदाखल होणार अशा बातम्या दिल्या. आता पुन्हा एकदा कामत लग्नासाठीच दिल्लीला गेले आहेत. पण, तरीही एका स्थानिक वृत्तपत्राने सुतावरून स्वर्ग गाठताना पुन्हा याची जोड त्यांच्या कथित भाजप प्रवेशाकडे जोडलीच. काही का असेना या ना त्या कारणाने दिगंबर यांची चर्चा मात्र होतच असते, याचे नवल नको. ∙∙∙
त्याचे स्वप्न पूर्ण झाले!
कुंकळ्ळी पालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष ॲथनी यांची कुंकळ्ळी पालिकेचे अध्यक्ष होणे ही इच्छा होती. मात्र लक्ष्मण नाईक यांच्यामुळे वाझ यांची संधी हुकली. आता लक्ष्मण नाईक यांच्या आजारपणामुळे ॲथनी यांचे नशीब खुलले. एक महिना का होईना ॲथनीला अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसण्याचा मान मिळाला व काळ्या फलकावर प्रभारी म्हणून नाव पडलेच. ∙∙∙
पत्रकार की पाटकर खोटे?
जिभेला हाड असते तर आपण बोलताना शंभर वेळा विचार केला असता. राजकारणी बोलताना काय बोलावे याचा विचार न करता तोंडाला येणार ते बोलतात व अंगावर आल्यावर त्याचे खापर इतरांवर फोडतात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आपले पाप पत्रकारांवर व नेटिझनच्या माथ्यावर मारायचा प्रयत्न करीत असल्याचे उघड झाले आहे. अमित पाटकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसची दारे पक्षबदलूंना खुली असल्याचे विधान केले होते. वर्तमानपत्रात गद्दाराची घर वापसीची बातमी प्रसिद्ध झाल्यावर नेटिझनकडून पाटकर ट्रोल व्हायला लागले आहेत. चेतना यात्रेत बोलताना पाटकर यांनी आपण त्या गावचे नसल्याचाच आव आणला. आता नेटिझन पाटकर यांना सांगायला लागले आहेत ‘मिस्टर पाटकर बिहेव प्रॉपर्ली ओर एल्स विल बी कॉल्ड जोकर.’ ∙∙∙
खाणींबाबत या बोटावरची थुंकी...
राज्यातील खनिज खाणींबाबत राज्य असो वा केंद्र सरकार, या बोटावरची थुंकी त्या बोटावर करून एकप्रकारे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रकार चालल्याचा आरोप होत आहे. दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील खाणी लीलावाद्वारे सुरू करणार असल्याचे जाहीर केले. दिल्लीला गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे सुतोवाच केले आहे. मात्र निवडणुकीच्या पूर्वी ‘सरकार तुमच्या दारी’च्या कार्यक्रमात याच मुख्यमंत्र्यांनी खाणी तीन महिन्यांत सुरू करणार असल्याचे अभिवचनच दिले होते. आता तीन महिने कधी उलटून गेले त्याची आठवण मुख्यमंत्र्यांना करून द्यायची आहे का? कारण तीन महिन्यांचे सहा महिने उलटले तरी अजून खाणी सुरू व्हायचे काही नाव घेत नाही. ∙∙∙
सोनारानेच टोचले कान
कोलवा सांडपाणी व मलमूत्र निचरा प्रकल्पाचा मुद्दा या दिवसांत काही घटकांना निमित्त मिळाला होता. त्या सर्वांनाच केवळ नव्हे, तर त्यांच्या दडपणाला बळी पडून सांडपाणी वाहिनीच्या कामाला स्थगिती दिलेल्या बाणावली पंचायतीला उच्च न्यायालयाने फटकारले आहे. या कामात कोणी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केल्यास तो न्यायालयाचा अवमान मानला जाईल, अशी तंबी दिल्याने विविध विकास प्रकल्पांविरोधात एल्गार करणाऱ्यांना योग्य तो संदेश जाणार आहे. ∙∙∙
आयपीएसला गोव्याचा मोह
गोव्यात बदली झालेल्या प्रत्येक आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्याला मुदत संपली तरी गोव्यातून जाण्यास पाय उचलत नाही. गोवा हे छोटे राज्य असल्याने येथे या अधिकाऱ्यांना मिळणारे अधिकार व सुविधा हे इतर राज्यात मिळत नाहीत. मोठ्या राज्यामध्ये अनेक असे अधिकारी असतात त्यामुळे तेवढे महत्त्व मिळत नाही. चार वर्षापूर्वी गोव्यात बदली झालेले पोलिस महानिरीक्षक राजेश कुमार हे उपमहानिरीक्षक म्हणून आले होते. त्यांचा कालावधी दोन वर्षांचाच होता व त्यानंतर त्यांची बदली होणे क्रमप्राप्त होते. दरम्यान त्यांना महानिरीक्षकपदी बढती मिळाली होती. बढती मिळाल्यावर केंद्रातून बदली होते मात्र त्यांना गोव्याचा मोह इतका पडला की त्यांना गोव्यातून बदली होऊ नये म्हणून या सरकारशी जवळीक केली. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांची दिल्लीला बदली झाली होती मात्र तरीही त्यांनी ती पुढे रेटण्यास यशस्वी ठरले. निवडणूक झाली तरी ते गोव्यातून जाण्याचे नाव घेत नव्हते; मात्र चार वर्षे झाल्याने अखेर त्यांना गोवा सोडण्याची पाळी आली. सरकारनेही त्यांना गोवा पोलिस सेवेतून मुक्त केले.∙∙∙
एल्टन ‘हेवी व्हेट’ आमदार !
काँग्रेस पक्षात यापूर्वी अनेक वजनदार आमदार व मंत्री झाले आहेत. आता काँग्रेसची स्थिती कुपोषितांसारखी झाली आहे. काँग्रेसच्या कुंकळ्ळी येथील चेतना यात्रेच्या उद्घाटन सोहळ्यास केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा उशिरा पोहचले. प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हे बोलत असताना आमदार एल्टन यांनी एन्ट्री घेतली. पाटकर यांनी एल्टनचा परिचय काँग्रेसचे हेवी व्हेट आमदार असा करताच अनेकांच्या भुवया उंचावल्या नाही तर नवल. एल्टन हेवी व्हेट त्यांनी बाबूला पराजित केले म्हणून नव्हे, तर ते धनांने गब्बर म्हणून हेवी व्हेट समजले का? काही का असेना चेतना यात्रेच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने एल्टन यांची चेतना जागली असणार हे मात्र निश्चित. ∙∙∙
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.