
पणजी: ज्यावेळी मला माझे वडील पं. जितेंद्र अभिषेकींकडे गायन शिकण्यासाठी घेऊन गेले होते, त्यावेळी माझा मुलगा गायन करून पोटभरू शकेल का? असा प्रश्न विचारला. त्यावेळी अभिषेकींनी सांगितले, मी तुमच्या मुलाला अतिशय उत्तमपणे गाणे शिकवेन, परंतु त्याचे गाणं रसिकांना आवडलं तरच तो गाण्यावर पोट भरू शकतो...
आजपर्यंत गाण्याने मला काहीच कमी पडू दिले नाही आणि रसिकप्रेक्षकांच्या बळावर हा माझा प्रवास सुरूच असून माझा हा गोमंत विभूषण पुरस्कार मी माझे गुरू माडिये, पं. जितेंद्र अभिषेकी आणि गोविंदप्रसाद जयपूरवाले यांना समर्पित करतो आणि गोव्याचा सर्वोच्च पुरस्कार दिल्याबद्दल आभार व्यक्त करत असल्याचे पं. अजित कडकडे यांनी सांगितले.
ते कला अकादमी येथे आयोजित गोमंत विभूषण पुरस्कारावेळी बोलत होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार सदानंद शेट तानावडे, छाया कडकडे, मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार गोविंद गावडे, संकल्प आमोणकर, केदार नाईक आणि डॉ. चंद्रकांत शेट्ये उपस्थित होते.
दरम्यान कडकडे म्हणाले, पं. अभिषेकींनी गायनासोबतच जी काही शिकवण दिली. त्याचे मी आजही तंतोतंत पालन करतो. महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी आहे, परंतु गोवा ही माझी जन्मभूमी असल्याचा मला अभिमान आहे. पुरस्कार सोहळ्याच्या समारोपानंतर उपस्थितांमधून पं. कडकडेंनी समयी किमान एखादे गाणे गावे, अशी मागणी आली. त्यावेळी चाहत्यांच्या आग्रहास्तव कोकणीतून गायन केले. गाण्याचे बोल होते.
गोंयान येवचे अशें
आयले जर तुमच्या मनांन
आयजूच येयात, दुवरं नकात परा...
गोवा ही पं. अजित कडकडे यांची जन्मभूमी, त्यांनी जगभर नाव कमावले, परंतु ते कधीच आपल्या जन्मभूमीला विसरले नाही. त्यांचे गायन हे पुन्हा-पुन्हा रसिकांना ऐकावे असेच वाटते. त्यांच्या समोरील रसिक हा श्रीमंत की गरीब हे त्यांनी कधीच पाहिले नाही. अशा योग्य व्यक्तीला गोमंत विभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला, असेही खासदार सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला सभापती रमेश तवडकर उपस्थित राहणार होते. त्यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत होते, परंतु ते या कार्यक्रमाला अनुपस्थितीत राहिले. परंतु आठवड्याभरापूर्वी मंत्रिमंडळातून डच्चू दिलेल्या कला आणि संस्कृती खात्याचे माजी मंत्री गोविंद गावडे यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पंधरा मिनिटे ते सभागृहात प्रेक्षकांमध्ये स्थानापन्न झाले. मुख्यमंत्र्यांच्या आगमनानंतर डॉ. सावंत आणि गावडे यांच्यात हस्तांदोलन झाले. तसेच मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या असून कार्यक्रमातील त्यांची एन्ट्री लक्षवेधी ठरली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.