Goa Loksabha Election Result: दक्षिण गोवा मतदारसंघातील निकाल जाहीर झाल्यानंतर मुरगाव तालुक्यातून भाजपला ८२६९ मते, तर काँग्रेसला ६२०४ मतदारांनी कौल दिल्याचे स्पष्ट झाले. मुरगाव मतदारसंघात भाजपला २,०६५ मतांची आघाडी मिळाली.
वास्को मतदारसंघातून भाजपला सर्वांत जास्त आघाडी देण्यात वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यशस्वी ठरले. तर सर्वांत कमी आघाडी मुरगाव व कुठ्ठाळी मतदारसंघात मिळाली. मुरगाव तालुक्यातील तीन मतदारसंघांतील मिळून भाजपला ८,०२० मतांची आघाडी मिळाली.
मुरगाव तालुक्यातील कुठ्ठाळी, दाबोळी, वास्को आणि मुरगाव अशा चारही मतदारसंघांतील १ लाख १३ हजार ७३२ मतदारांपैकी ८२ हजार १९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता.
विशेष म्हणजे, चारही मतदारसंघांतून पुरुषांपेक्षा अधिक महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ४१ हजार ५८९ महिलांनी तर ४० हजार ४३० पुरुषांनी मतदान केले होते. या चार मतदारसंघांपैकी मुरगावात सर्वांत जास्त ७४.१० टक्के मतदान झाले. येथील २० हजार १३४ मतदारांपैकी १५ हजार ६० मतदारांनी हक्क बजाविला.
काँग्रेसने मुरगाव तालुक्याला प्रतिनिधित्व देऊन सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून दिला आहे. कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्यावर काँग्रेसने विश्वास दाखविल्यानेच आज त्यांनी लोकशाहीच्या मंदिरात प्रवेश केला आहे. चिखली पंचायत क्षेत्रातील आमचे गाव बंधू या नात्याने फर्नांडिस यांचा मुरगाव ते काणकोणपर्यंत प्रचार केला होता. आज प्रत्यक्षात फर्नांडिस यांचा विजय म्हणजे एका अर्थाने लोकशाहीचाच विजय आहे.
दक्षिण गोव्यात भाजपने प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात न घेताच उमेदवार जाहीर करून घोडचूक केली. तसेच कार्यकर्त्यांना मान न देणे हेही या पराभवामागील प्रमुख कारण आहे. यावर भाजप श्रेष्ठींनी विचारमंथन करावे. दक्षिण गोवा उमेदवाराच्या पराभवातून भाजपने बोध घ्यावा.
सायलेंट व्होटरचा झटका भाजपला बसला. याचे कारण म्हणजे स्थानिक पातळीवरील लोकांचे ज्वलंत प्रश्न सोडवायला पाहिजे होते. आज भाजपकडे सर्व काही असूनही अनेक त्रुटी राहिल्या. उमेदवार ठरविण्याचा निर्णय उशिरा झाला. कार्यकर्त्यांना योग्यवेळी महत्त्वाच्या सूचना देण्यामध्ये ताळमेळ राहिला नाही, हेही दक्षिणेतील पराभवाचे मुख्य कारण आहे.
आज खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय झाला. दक्षिण गोवा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा काँग्रेस उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस विजयी झाल्याने सिद्ध झाले. ज्या दिवशी दक्षिणेत काँग्रेसने फर्नांडिस यांना उमेदवारी जाहीर केली, त्या दिवसापासून काँग्रेसने सर्वसामान्य जनतेची मने जिंकली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.