Ponda Municipal Council: फोंड्याचा नवा नगराध्यक्ष कोण? रितेश यांच्या राजीनाम्यानंतर भाजपमधील गटबाजी उघड

Ritesh Naik Resigned: फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे फोंड्यात राजकीय नाट्य परत एकदा रंगले आहे.
Ritesh Naik Resigned
Ritesh Naik Resigned

फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे फोंड्यात राजकीय नाट्य परत एकदा रंगले आहे. हा राजीनामा अलिखित करारानुसार असला असे सांगण्यात येत असले तरी या मागे भाजपचेच काही नगरसेवक असल्याचे कळते. तसेच मगोपचे नेते डॉ. केतन भाटीकर यांच्या गटातील काही नगरसेवकांचाही या ‘मुव्ह’ ला पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वी डॉ. केतन भाटीकर यांनी रितेश नाईक पायउतार होणार असे सूतोवाच केले होते. ते भाकीत खरे ठरल्याचे बघायला मिळत आहे. पालिका मंडळात भाजपचे दहा नगरसेवक असले तरी त्यांच्यात एकवाक्यता दिसत नाही. पाच नगरसेवक माजी नगराध्यक्ष तसेच विद्यमान नगरसेवक विश्‍वनाथ दळवी यांच्या गटात तर पाच नगरसेवक रितेश नाईक यांच्या गटात आहेत. त्यामुळे भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर यायला लागली आहे.

आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून सध्या विश्‍वनाथ दळवी व रितेश नाईक यांच्यामध्ये शह काटशहाचे राजकारण सुरू झाले असून दळवींनी तर प्रोग्रेसिव्ह फोंडा’ ही संस्‍था अस्तित्वात आणून आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांनाच आव्हान द्यायला सुरुवात केली आहे.

Ritesh Naik Resigned
Ponda Municipality: फोंड्यात बेकायदा दुचाकी विक्री करणाऱ्या आस्थापनाला सील; पालिकेची कारवाई

विरोधी गटात पाच नगरसेवक असून त्यापैकी चार नगरसेवक भाटीकर गटाचे तर माजी नगराध्यक्ष तसेच पालिकेतील सर्वात ज्येष्ठ नगरसेवक व्यंकटेश नाईक हे अपक्ष म्हणून कार्यरत आहेत. यापैकी दोन नगरसेवकांचा दळवींना आतून पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सध्या नगरपालिकेतील राजकीय नाट्याला धार चढली असून भविष्यात ही धार अधिक तीव्र होण्याची शक्यता दिसत आहे.

सर्व काही श्रेष्ठींवर : दळवी

पुढील नगराध्यक्षांच्या निवडीबाबत फोंडा भाजपचे गटाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक विश्‍वनाथ दळवी यांना विचारल्यावर त्यांनी सर्व काही श्रेष्ठींच्या निर्णयावर अवलंबून असल्याचे सांगितले. त्यांचा निर्णय हा भाजपच्या सर्व नगरसेवकांना शिरोधार्य असणार आहे असे सांगून या सध्या सुरू असलेल्या नगरपालिकेतील राजकीय नाट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण तरीही ‘परदे के पीछे’ बरेच काही शिजत असल्याचे संकेत मिळत आहेत.

Ritesh Naik Resigned
Ponda Municipal Council: निवडणुकीनंतरही फोंड्यातील राजकारण ‘तेज’; भाजपात अस्वस्थता

रवींच्या भूमिकेकडे लक्ष

तसेच रितेश यांच्या गटातून दोन वेळा निवडून आलेले नगरसेवक आनंद नाईक यांचाही नगराध्यक्ष पदावर डोळा असल्यामुळे त्यातून कलगीतुरा रंगण्याचे संकेत मिळत आहेत. आनंद नाईक यांनी या पदावर दावा केल्यास दळवींबरोबर भाटीकरांचे नगरसेवक हात मिळवणी करू शकतात असा होरा आहे. या सगळ्या नाट्यात कृषीमंत्री रवी नाईक हे सध्या स्थितप्रज्ञाच्या भूमिकेत वावरताना दिसत असले तरी ते कधी कोणती ‘चाल’ खेळतील याचा अंदाज वर्तविणे कठीण आहे.

अनेक प्रश्‍नचिन्हे...

जवळजवळ सव्वा वर्ष नगराध्यक्षपदी असलेल्या रितेशांच्या पायउतारामुळे पालिकेत परत एकदा संगीत खुर्चीचा खेळ सुरू होण्याची चिन्हे दिसायला लागली आहेत. गेल्या खेपेला एकूण सहा नगरसेवकांनी नगराध्यक्ष पद भूषविले होते. यावेळी त्याची पुनरावृत्ती होऊ शकते. असे संकेत रितेश यांच्या राजीनाम्यामुळे मिळायला लागले आहेत. एकंदरीत रितेश यांच्या राजीनाम्यामुळे फोंड्याच्या राजकीय व्यासपीठावर अनेक प्रश्‍नचिन्हे निर्माण झाली असून नवीन नगराध्यक्षांच्या निवडीनंतर ही प्रश्‍नचिन्हे वाढतात की कमी होतात हे बघावे लागेल.

Ritesh Naik Resigned
Ponda Municipal Council: फोंडा नगराध्यक्षपदी रितेश तर उपनगराध्यक्षपदी दीपा कोलवेकर यांची निवड

विश्‍वनाथ दळवींचा नंबर...

रितेश यांच्या पायउतारनंतर नगराध्यक्ष होण्याकरिता विश्‍वनाथ दळवींचा नंबर असल्याचे सांगितले जात असले तरी याबाबतीत दळवी मौन बाळगून आहेत. त्यांच्या गटातील वीरेंद्र ढवळीकर यांना नगराध्यक्षच्या खुर्चीवर बसून पडद्यामागून सूत्रे चालवण्याचा त्यांचा मनोदय असल्याची माहिती काही नगरसेवकांकडून प्राप्त झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com