Murgao News : कचरा टाकणाऱ्यांवर होणार कारवाई

मुरगाव नगराध्यक्षांचा इशारा : वास्कोत लवकरच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
Murgao News
Murgao NewsGomantak Digital Team
Published on
Updated on

मुरगाव पालिका क्षेत्रात रस्त्याकडेला, मोकळ्या जागेत कचरा टाकणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्ज यांनी दिली.

कचराप्रश्नी मुरगाव पालिका मंडळ, घनकचरा व्यवस्थापन विभाग, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची नुकतीच संयुक्त बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, की तीन, चार प्रभागांमध्ये पायलट प्रोजेक्ट अंतर्गत रहिवाशांमध्ये कचऱ्यासंबंधी जागृती करण्यात येणार आहे. या जागृती कार्यक्रमात आमदारांसह, नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका व पोलिस सहभागी होणार आहेत.

Murgao News
Goa Revolution Day : पणजीतील संस्कृती भवनात 'पुराभिलेख सप्ताह प्रदर्शना'ला सुरुवात

आम्हाला ठिकठिकाणची कचरा स्थळे बंद करावयाची आहेत. त्यासाठी रस्त्याकडेला कचरा टाकणाऱ्यांविरोधात आम्ही कारवाई करण्याबाबत गंभीर असल्याचे नगराध्यक्ष रॉड्रिग्ज यांनी सांगितले. रस्त्यावर कचरा टाकू नका, आपला परिसर स्वच्छ ठेवा, पालिकेला सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी केले. मुरगाव पालिका गेली काही वर्षे कचराप्रश्नी सतत प्रयत्न करीत आहे, परंतु नागरिकांकडून म्हणावे तसे सहकार्य मिळत नसल्याचे रॉड्रिग्ज यांनी सांगितले. या बैठकीत घनकचरा व्यवस्थापनचे पराग रांगणेकर यांनी मार्गदर्शन केले.

Murgao News
Goa Congress : त्रस्‍त जनताच भाजपला घरी पाठवणार : काँग्रेस

दंडात्मक कारवाई व्हावी

एखाद्याला रस्त्याकडेला, मोकळ्या जागेत कचरा टाकताना पकडल्यास त्याच्याविरोधात दंडात्मक कारवाई केली पाहिजे. त्याच्याविरोधात दंडात्मक कारवाई न झाल्यास तो पुन्हा कचरा टाकण्यास घाबरत नाही, असे नगरसेवक यतीन कामुर्लेकर यांनी सांगितले.

Murgao News
Goa News : काकोड्यात ‘चेंबर’चे काम निकृष्ट ; पहिल्याच पावसात पितळ उघडे मलनिस्सारण’मुळे रस्ताही खचला

भाडेकरूंच्या सर्वेक्षणाची गरज

भाडेपट्टीवर राहणारे कामगार सकाळी कामावर जाताना घरातील केरकचरा रस्त्याकडेला टाकतात. भाड्याने राहणारे दारोदार कचरा गोळा करण्यास येणाऱ्या कामगारांकडे कचरा देतात की नाही, हे समजण्यासाठी त्या प्रभागातील भाडेकरूंचे सर्वेक्षण करण्याची गरज आहे, असे नगरसेवक नारायण बोरकर यांनी सांगितले.

Murgao News
Panaji : पहिल्याच पावसाने मिरामार सर्कल जलमय, स्मार्ट सिटीच्या कामाविषयी प्रश्न उपस्थित

वास्कोत बंदी असूनही ‘प्‍लास्‍टिक’चा वापर

कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली असताना येथे सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी मुरगाव पालिकेने पालिका निरीक्षकाची खास नियुक्ती केली आहे. परंतु त्या निरीक्षकाने आत्तापर्यंत किती जणांविरोधात कारवाई केली, हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. लवकरच जागृती मोहीम व कापडी पिशव्यांचे वितरण करण्याचे काम हाती घेणार असल्याचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्ज यांनी जाहीर केले होते.

Murgao News
Goa Revolution Day 2023: क्रांतिदिनाचा इतिहास आता अकरावीच्या पुस्तकातही, शासकीय सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची माहिती

परंतु त्यांची जागृती मोहीम अद्याप सुरू झाली नसल्याचे दिसून येत आहे. कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरू नयेत यासाठी उपाययोजना करणार, असे मुरगाव पालिकेतर्फे नेहमी सांगितले जाते. तथापि संबंधितांच्या वक्तव्यांकडे कोणी लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर बिनदिक्कतपणे करण्यात येत आहे.

Murgao News
Goa Weather Update: राज्यात मॉन्सून जोर पकडणार, वेधशाळेचा अंदाज

विक्रेत्यांकडून कमी जाडीच्या पिशव्यांचा वापर करण्यात येत आहे.. परंतु त्या निरीक्षकाला कोणीच सापडत नाही. प्लास्टिक पिशव्यांऐवजी विक्रेत्यांनी कापडी पिशव्या ग्राहकांना द्याव्यात, यासाठी त्या विक्रेत्यांना आम्ही कापडी पिशव्या देणार असल्याचे नगराध्यक्ष रॉड्रिग्ज यांनी जाहीर केले होते.

लोकांनी कचरा रस्त्याकडेला, मोकळ्या जागेत न टाकता दारोदारी कचरा गोळा करण्यास येणाऱ्या कामगारांकडे द्यावा.

दाजी साळकर, वास्को

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com