

मडगाव: गोव्यात मोठा गाजावाजा करून आम आदमी पक्षाने जिल्हा पंचायत निवडणुकीत तब्बल ४२ उमेदवार उभे केले. तसेच आपणच भाजपला पर्याय असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्यक्षात गोमंतकीय मतदारांनी या पक्षाला फक्त ३७,२१२ एवढीच मते देऊन पाचव्या क्रमांकावर फेकले. तसेच ‘आप’ हा कधीच गोव्यात पर्याय होऊ शकत नाही हे स्पष्ट केले.
त्यामानाने संपूर्ण गोव्यात २८ उमेदवार उभे केलेल्या ‘आरजी’ने एकूण ५७,५८१ मते मिळवून चौथा क्रमांक पटकावला. एकूण ९ ठिकाणी आपले उमेदवार उभे केलेल्या गोवा फॉरवर्डला ३०,५७४ मते मिळवता आली असून हा पक्ष सहाव्या क्रमांकावर राहिला.
‘आप’ने मोठा गाजावाजा करून यावेळी जिल्हा पंचायत निवडणुकीत आपले उमेदवार सगळीकडे उभे केले होते. मात्र एक कोलवा मतदारसंघ वगळता अन्य कुठल्याही मतदारसंघात आपला उमेदवार जिंकून आणता आले नाहीत. उलट बाणावलीतील आपली जागा त्यांनी गमावली. या निवडणुकीत पर्याय म्हणून पुढे आणलेल्या ‘आप’ला फक्त ५.९५ टक्के मते प्राप्त झाली आहेत.
यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना राजकीय विश्लेषक प्रभाकर तिंबले म्हणाले, यावेळी जिल्हा पंचायत निवडणुकीत जो निकाल लागला आहे ते पाहिल्यास गोव्यातील मतदाराने ‘आप’ला पूर्णत: नाकारले आहे हे तर स्पष्ट झाले आहेच. शिवाय सासष्टी तालुक्यात या पक्षाला आम आदमी ज्या प्रकारे मतदान केले ते पाहिल्यास, तुम्ही मैदानात राहून भाजपविरोधी मतांची विभागणी करणार असाल तर आम्ही ते खपवून घेणार नाही हा इशाराही दिला आहे.
सासष्टीतील कोलवा मतदारसंघात आम आदमी पक्षाला ३२१४ मते प्राप्त झाली. नुवेमध्ये ‘आप’चे लुईस बार्रेटो हे ३०३१ मते घेऊ शकले. बाणावलीत जोजेफ पिमेंता यांना ४४६९ मते तर वेळ्ळी मतदारसंघात इसाका फर्नांडिस यांना २४१७ मते प्राप्त झाली. या व्यतिरिक्त अन्य मतदारसंघात आम आदमी पक्ष फारशी मते घेऊ शकला नाही. काही मतदारसंघांत त्यांची मते २५० ते ४००च्या आसपास असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या पक्षाला गोव्यात लोकांमध्ये स्थान नाही हे स्पष्ट झाले आहे.
मागच्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात ‘आरजी’ने दहा टक्क्यांच्या आसपास मते मिळवली होती. यावेळी जिल्हा पंचायत निवडणुकीत या पक्षाने आपले २८ उमेदवार उभे केले होते. त्यांनी एकूण ५७,५८१ मते मिळवली असून त्यांची मतांची टक्केवारी ९.२३ टक्के एवढी झाली आहे. उत्तर गोव्यात सांताक्रुझ आणि सेंट लॉरेन्स या दोन मतदारसंघात त्यांचे उमेदवार जिंकून आले तर दक्षिण गोव्यात शिरोडा, वेळ्ळी आणि नुवे या मतदारसंघात त्यांच्या उमेदवारांनी चांगली कामगिरी केली.
जिल्हा पंचायत निवडणुकीत गोवा फॉरवर्डने ९ ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. त्यांची एकूण मतांची संख्या ३०,५४७ एवढी असून एकूण मतांची टक्केवारी ४.९० टक्के एवढी आहे. राय मतदारसंघात त्यांचा उमेदवार निवडून आल्याने जिल्हा पंचायत निवडणुकीत त्यांनी आपले खाते खोलले. मात्र रिवण मतदारसंघात त्यांचा उमेदवार फक्त १९ मतांनी पराभूत झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.