Margao Woman Assaulted: गुन्हेगारीचा अड्डा बनलेला मडगाव येथील कोकण रेल्वे परिसर सोमवारी रात्री रेणुका बहादूर या महिलेला झालेल्या अमानुष मारहाणीमुळे पुन्हा चर्चेत आला.
येथील बेकायदा मथुरा बारचा चालक सुजित कुमार सिंग, सुनील कुमार सिंग आणि दिपू या तिघांनी या महिलेला जबर मारहाण केली.
सुनील कुमार याचा कुत्रा भुंकत रेणुकाच्या अंगावर धावत आल्यामुळे तिने शिव्या दिल्याने त्यांच्यात वाद झाला.
याप्रकरणी मडगाव पोलिसांनी या तिघांवर गुन्हा नोंदवला असून सुजीत कुमार सिंग आणि दिपू यांना अटक केली आहे. सुनील कुमार सिंग हा फरार झाला आहे.
यावेळी सुजीतने लोखंडी सळीने तिच्या हाता- पायावर वार केले. यात रेणुकाचा एक हात-पाय मोडला असून सध्या तिच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. यासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, येथे मथुरा नावाचा बेकायदा बार आहे. या बारला अबकारी परवाना नाही.
हा बार रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत बिनदिक्कतपणे सुरू असतो. त्याच बारजवळ हा हल्ला झाला. हा बार सुनील कुमार आणि सुजित कुमार चालवतात.
सोमवारी रात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. रेणुका ही याच परिसरात राहात असून येथून ती जेवण घेऊन जात होती.
यावेळी संशयित तिथे बसले होते. सुनील कुमारचा कुत्रा भुंकत रेणुकाच्या अंगावर धावल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यातूनच त्यांनी तिला बेदम मारहाण केली.
पिंक फोर्स आली पण... :
या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेसाठी असलेली पिंक फोर्स ही महिला पोलिसांची पिंक कार घटनास्थळी आली; पण त्यांनी काहीही केले नाही.
गस्तीवर असलेल्या पोलिसांनीही काहीच कारवाई केली नाही. त्यानंतर रुग्णवाहिका आली आणि स्थानिकांनी रेणुकाला रुग्णालयात दाखल केले.
वादग्रस्त बारच्या सुरस कथांची चर्चा
वादग्रस्त मथुरा बार अबकारी परवान्याशिवाय चालविला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. एरवी दारूची दुकाने रात्री ११ वाजता बंद होणे आवश्यक असताना हा बार मात्र पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू असतो.
या बारमधून रेल्वेतून बेकायदेशीर दारू वाहतूक होत असल्याची माहिती प्राप्त झाली असून अबकारी खाते आणि पोलिस निद्रिस्त आहेत का, असा सवाल लोकांनी केला आहे.
पार्श्वभूमी गुन्हेगारीची-
ज्यांनी मारहाण केली, त्यापैकी सुनीलकुमार हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, तर सुजीतकुमारचीही पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे. रेणुकाची जबानी घेण्यासाठी पोलिस गोमेकॉत गेले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी दिली.
बेकायदा दारू विक्री-
संशयित सुनील कुमार हा गुजरात व मुंबई येथे रेल्वेतून दारू तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा सदस्य असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ड्रग्स पेडलिंग केसमध्येही त्याचा सहभाग असून कोकण रेल्वे पोलिस स्थानकात त्याच्यावर गुन्हेही नोंद केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.