
केपे: सध्या पावसाने बराच जोर धरला असल्याने वाऱ्यासह येणाऱ्या पावसामुळे शनिवारी (ता.२६) पहाटे ४.३० वा. बोरीमळ-केपे येथे एल्वीस फर्नांडिस यांच्या बंद असलेल्या जुन्या घरावर भले मोठे झाड पडल्याने या जुन्या मातीच्या घराच्या सहा खोल्या जमीनदोस्त झाल्या.
हे घर कौलारू असल्याने घराचे नळे व इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे कुडचडे अग्निशामक दलाने सांगितले. या घटनेची माहिती मिळताच कुडचडे अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन घरावर पडलेले झाड बाजूला केले.
हे झाड बरेच मोठे असल्याने पूर्णपणे बाजूला करण्यास अग्निशामक दलाला यश आले नसले तरी त्यांनी बऱ्याच प्रमाणात झाडाच्या फांद्या बाजूला केल्याचे सांगितले. केपे मामलेदार कार्यालयाच्या तलाठ्याने घटनास्थळी भेट देऊन घराची पाहणी केली आहे.
फोंडा-पणजी महामार्गावर म्हार्दोळ येथे मुख्य रस्त्यावर शनिवारी (ता.२६) दुपारी भले मोठे जंगली झाड अचानक रस्त्यावर कोसळले. मात्र, सुदैवाने नेहमी गजबजलेल्या या महामार्गावर या घटनेवेळी कुणीच नसल्याने मोठा अनर्थ टळला.
दुपारी १ वा.च्या सुमारास हे भले मोठे जंगली झाड अचानक कोसळल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. त्यानंतर वाहतूक म्हार्दोळ-मंगेशीअंतर्गत रस्त्यावरून वळवण्यात आली. तरीही अवजड वाहतुकीला मात्र अडथळे निर्माण झाले. केवळ दैव बलवत्तर म्हणून ही घटना घडली त्यावेळेला रस्त्यावर एकही वाहन नव्हते, त्यामुळे अनर्थ टळला. मात्र, रस्त्याच्या कडेला असलेल्या राजू काणकोणकर याच्या गाड्याचे काही अंशी नुकसान झाले.
त्यानंतर लगेच कुंडई अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावर पडलेले झाड हटविले. दुपारी २.३० वाजता रस्ता मोकळा करण्यात आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.