G20 Defamation Notice to Mario Miranda's Gallery: गोव्यातील G 20 च्या बैठकांना प्रोत्साहनाच्या अनुषंगाने कार्टुनिस्ट मारियो मिरांडा यांच्या कलाकृती बेकायदेशीरपणे वापरल्याचा आरोप मारियो मिरांडाज गॅलरीने एका इव्हेंट मॅनेजमेंट फर्म आणि गोव्यातील अधिकाऱ्यांवर केला होता.
आता गोव्यातील G20 शिखर परिषदेचे आयोजन करणार्या एका खाजगी संस्थेने मारियो मिरांडाज गॅलरीला 25 कोटी रूपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे. बदनामी केल्याबद्दल 25 कोटी रुपयांची मागणी नोटीशीतून केली आहे. स्क्रोल या न्यूज पोर्टलने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मारियो मिरांडा हे चित्रकार, कार्टुनिस्ट होते. 11 डिसेंबर 2011 रोजी त्यांचे निधन झाले होते. त्यांना पद्मविभुषण पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.
2 जुलै रोजी, मारियो गॅलरीने इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सी शॉन अॅडइव्हेंटला नोटीस पाठवली होती आणि गोव्याच्या मुख्य सचिवांना G20 कार्यक्रमांच्या जाहिरातीसाठी मारियो मिरांडा यांच्या कलाकृतीचा अनधिकृत वापर केल्याचा आरोप केला होता.
मिरांडा यांचे काम वापरण्यासाठी एजन्सी आणि गोवा अधिकाऱ्यांनी परवानगी घ्यावी, अशी मागणी गॅलरीने केली होती.
त्याला प्रतिसाद देताना, शॉन अॅडइव्हेंटने 10 जुलै रोजी मानहानीची नोटीस पाठवली आणि दावा केला की मारिओ गॅलरीचा मिरांडा यांच्या कलाकृतींवर कोणताही अधिकार नाही. गॅलरीचे क्युरेटर जेरार्ड दा कुन्हा यांनीही अशी नोटीस आलेल्यास दुजोरा दिला आहे.
ते म्हणाले की, मिरांडा यांच्या कामांचा G20 कार्यक्रमांच्या प्रचारासाठी वापर केला जात असेल तर मारियो गॅलरीला आक्षेप नाही, परंतु आयोजकांनी परवानगी घेणे आवश्यक आहे. प्रत्येकजण परवानगी घेतो. भारतीय नौदल, विमानतळ प्राधिकरण, आयकर विभाग या सर्वांनी परवानगी घेतली आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला हे प्रकरण पहिल्यांदा उघडकीस आले होते जेव्हा मिरांडा यांची मुले - रिशाद आणि राऊल मिरांडा यांनी त्यांच्या वडिलांच्या कॉपीराइट केलेल्या कामाच्या कथित बेकायदेशीर वापरामुळे त्यांना आश्चर्य वाटल्याचे म्हटले आहे.
दा कुन्हा म्हणाले की, आयोजकांनी एका टाईलवर मिरांडा यांचे पेंटिंग वापरले होते जी G20 कार्यक्रमांतील मान्यवरांना भेट म्हणून दिली जात होती. जुने गोवा आणि डोना पॉला येथे 16 फायबर ग्लास पुतळे उभारले आहेत. हे पुतळे मिरांडा यांच्या कार्टुनवरून घेतले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.