पणजी : नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र सुरुच आहे. आता राज्यातील 16 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून कार्मिक विभागाने बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.
अवर सचिव श्रीपाद आर्लेकर यांची आरोग्य संचालनालयाच्या संचालक (प्रशासकीय) म्हणून बदली करण्यात आली आहे. साबांखाच्या उपसंचालक डॉ. गीता नागवेकर यांना साबांखा संचालक (प्रशासकीय) म्हणून बढती देण्यात आली आहे.
उच्च शिक्षण खात्याचे उपसंचालक (प्रशासकीय) तुषार हळर्णकर यांची गृह खात्याच्या सह सचिव म्हणून, नगरविकास खात्याचे अतिरिक्त संचालक क्लेन मदैरा यांची गोवा पुर्नवसन मंडळाच्या सचिव म्हणून, राज्य कर खात्याचे उप आयुक्त रोहित कदम यांची मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
राज्य कर खात्याच्या उप आयुक्त नेहा अशोक पनवेलकर यांची गोवा गृहनिर्माण मंडळाच्या कार्यकारी संचालक म्हणून, कृषीमंत्र्यांचे अवर सचिव दीपेश प्रियोळकर यांची गोवा फुटबॉल विकास महामंडळाचे सदस्यसचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.
गोवा इंजिनिअरिंग कॉलेजचे उप निबंधक पुंडलिक खोर्जुवेकर यांची गोवा शिक्षण विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक म्हूणन बदली करण्यात आली आहे. राज्य कर खात्याचे उप आयुक्त विशांत नाईक-गावकर यांची गोवा शिक्षण विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालक म्हणून, चंद्रकांत कुंकळकर यांची राज्य कर खात्याच्या अतिरिक्त संचालक म्हणून, राज्य कर - 2 च्या अतिरिक्त आयुक्त स्नेहल नाईक-गोलतेकर यांची विज्ञान आणि तंत्रज्ञानच्या संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.
मडगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आग्नेल फर्नांडिस यांची मागासवर्गीय आयोगाचे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. शिक्षण संचालक भूषण सावईकर यांची माहिती आयोगाचे सचिव म्हणून, तर माहिती आयोगाचे सचिव महादेव आरोंदेकर यांची जीएसआडीचे विशेषाधिकारी म्हणून, साबांखाचे संचालक अजित पंचवाडकर यांची गोवा राज्य अल्पसंख्याक अर्थसहाय्य आणि विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालक म्हणून, उप मुख्य निवडणूक अधिकारी संगिता नाईक यांची गोवा राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.
डॉ. गीता नागवेकर साबांखाच्या उपसंचालक, कोमुनिदादच्या प्रशासक म्हणून काम पाहतील. तुषार हळर्णकर यांच्याकडे सध्या असलेला उच्च शिक्षण खात्याचा उपसंचालकपदाचा आणि अवर सचिवपदाचा कार्यभार कायम राहील. क्लेन मदैरा यांच्याकडे असलेला डिचोली नगरपालिकेचा मुख्याधिकारीपदाचा आणि नगर विकास खात्याचा अतिरिक्त संचालकपदाचा कार्यभार कायम राहील. तर दीपेश प्रियोळकर यांच्याकडील कृषी खात्याचा अवर सचिवपदाचा कार्यभार कायम राहील.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.