पणजी: हवामान बदलाचे दुष्परिणाम हळूहळू समोर यायला लागले आहेत. मुसळधार पाऊस त्यामुळे होणारे भूस्खलन आणि पूराने देशाच्या बहुतांश भागात कहर घातला आहे. अशात समोर आलेल्या एका नव्या अभ्यास अहवालाने सर्वांची चिंता वाढवली आहे.
2040 पर्यंत मुंबईसह पणजी आणि चेन्नईमधील 10 टक्के जमीन पाण्याखाली जाईल, असे या अहवालात म्हटले आहे.
बेंगळुरूस्थित थिंक टँक 'सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड पॉलिसी - सीएसटीईपी'ने केलेल्या अभ्यास अहवालात याबाबत माहिती देण्यात आलीय. हवामान बदलामुळे समुद्राची पातळी सातत्याने वाढत असल्याचा दावा नव्या अभ्यासात करण्यात आला आहे.
समुद्राचे पाणी असेच वाढत राहिले तर 2040 पर्यंत मुंबईतील 10 टक्क्यांहून अधिक जमीन आणि पणजी व चेन्नईमधील 10 टक्क्यांपर्यंत जमीन पाण्याखाली जाईल, अशी भीती या अहवालातून व्यक्त करण्यात आलीय.
वाढत्या समुद्र पातळीमुळे कोची, मंगळुरू, विशाखापट्टणम, उडुपी आणि पुरी येथील पाच टक्के जमीन पाण्याखाली जाऊ शकते, असेही हा अहवाल सांगतो.
चेन्नई, मुंबई, तिरुअनंतपुरम, कोची, मंगळुरु, विशाखापट्टणम, कोझीकोड, हल्दिया, कन्याकुमारी, पणजी, पुरी, उडुपी, पारादीप, थुथुकुडी आणि यानाम या 15 भारतीय किनारपट्टीवरील शहरांमध्ये भविष्यातील हवामान बदलामुळे समुद्राची पातळी वाढीच्या अंदाजाचा अभ्यास या अहवालात करण्यात आला.
1987 ते 2021 या काळात मुंबईत समुद्र पातळीत सर्वाधिक 4.440 सेंटीमीटर वाढ झाल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. यानंतर हल्दियामध्ये 2.726 सेमी, विशाखापट्टणममध्ये 2.381 सेमी, कोचीमध्ये 2.213 सेमी, पारादीपमध्ये 0.717 सेमी आणि चेन्नईमध्ये 0.679 सेमीने वाढ झाली आहे.
यापुढे देखील 15 शहरांमध्ये समुद्राच्या पातळीत वाढ होत राहील, असे या अहवालात म्हटले आहे. मुंबईत समुद्राच्या पाणी पातळी वाढण्याचा अंदाज आहे.
1) मुंबई, यानम आणि थुथुकुडीमध्ये 10 टक्क्यांहून अधिक
2) पणजी आणि चेन्नईमध्ये 5-10 टक्के
3) कोची, मंगळुरू, विशाखापट्टणम, हल्दिया, उडुपी, पारादीप आणि पुरीमध्ये 1-5 टक्के जमीन पाण्याखाली जाऊ शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.