Vinoo Mankad Trophy 2024 Goa Vs Nagaland
पणजी: शैलीदार डावखुरा फलंदाज दिशांक मिस्कीन (१०४) याच्या दणदणीत शतकामुळे गोव्याने रविवारी नागालँडवर मोठा विजय प्राप्त केला. १९ वर्षाखालील विनू मांकड करंडक एकदिवसीय क्रिकेट सामन्यात गोव्याने तब्बल २८६ धावांनी जिंकला.
सामना रविवारी पंजाब मधील मल्लानपूर मोहाली येथे झाला. गोव्याचा कर्णधार पुंडलिक नाईक (४१ व ३-९) या अष्टपैलू कामगिरीही निर्णायक ठरली. गोव्याने ९ बाद ३५० धावा केल्यानंतर नागालँडचा डाव ६४ धावांत आटोपला.
हिमाचल प्रदेशविरुद्ध मागील लढतीत झुंझार ५६ केलेल्या दिशांक याने नागालँडविरुद्ध दमदार फलंदाजी करताना शतकाला आक्रमकतेची जोड दिली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस झालेल्या या १८ वर्षीय फलंदाजाने १०४ धावा केल्या. त्याने ९६ चेंडूतील खेळीत नऊ चौकार लगावले. याशिवाय त्याने तीन अर्धशतकी भागीदारी करून संघाला साडेतीनशे धावांचा पल्ला गाठून दिला.
दिशांकने चौथ्या विकेटसाठी यश कसवणकर यांच्या समवेत ७४ धावांची, जीवनकुमार चित्तेम याच्यासह पाचव्या विकेटसाठी ६८ धावांची, तर कर्णधार पुंडलिक नाईक यांच्यासह आठव्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी केली. यश याने ३९ चेंडूत दोन चौकार व एका षटकारासह ४० धावा, जीवन याने २९ चेंडूत ३४ धावा केल्या, तर आक्रमक फलंदाजी केलेल्या पुंडलिक याने अवघ्या २३ चेंडूत पाच चौकार व एका षट्कारासह ४१ धावा नोंदविल्या. त्यापूर्वी सलामीचा फलंदाज दर्पण पागी याने ६५ चेंडूत चार चौकार व एका षटकारसह ४८ धावा केल्या होत्या
विजयासाठी ३५१ धावांचे मोठे आव्हान नागालँडला अजिबात पेलवले नाही. त्यांचा डाव ३३.५ षटकांत संपुष्टात आला. गोव्यातर्फे पुंडलिक नाईकने ९ धावांत ३ गडी बाद केले. याशिवाय निश्चय नाईक व यश कसवणकर यांनी प्रत्येकी दोन गडी टिपले. गोव्याचा हा स्पर्धेतील पहिला विजय ठरला अगोदरच्या लढतीत त्यांना हिमाचल प्रदेशकडून ६९ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. गोव्याचा पुढील सामना आठ रोजी आंध्र प्रदेशविरुद्ध खेळला जाईल.
संक्षिप्त धावफलक
गोवा ः ५० षटकांत ९ बाद ३५० (दर्पण पागी ४८, शंतनू नेवगी १०, निसर्ग नागवेकर ११, दिशांक मिस्कीन १०४, यश कसवणकर ४०, जीवनकुमार चित्तेम ३४, अनुज यादव ८, शमिक कामत १, पुंडलिक नाईक ४१, पियुष देविदास नाबाद १०, निश्चय नाईक ९, सुंदरम कुमार १०-१-५२-४) वि. वि. नागालँड ः ३३.५ षटकांत सर्वबाद ६४ (समीर अली २५, पुंडलिक नाईक ८-२-९-३, शमिक कामत ४-०-९-०, निश्चय नाईक ४.५-१-९-२, अनुज यादव ८-२-१२-१, यश कसवणकर ६-२-६-२, पियुष देविदास ३-०-१८-०).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.