

पणजी: विजय हजारे करंडक लिस्ट ए (एकदिवसीय) क्रिकेट स्पर्धेत एलिट क गटातून बाद फेरी गाठण्याची गोव्याचा चांगली संधी प्राप्त झाली होती, पण मागील लढतीत उत्तराखंडविरुद्ध निराशाजनक खेळ करत पराभव पदरी पाडून घेतल्यामुळे त्यांची आता वाटचाल खूपच खडतर बनली आहे. पंजाब व महाराष्ट्र या बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध लढती बाकी असल्यामुळे साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
जयपूर येथे मंगळवारी (ता. ६) पंजाबविरुद्ध, तर गुरुवारी (ता. ८) महाराष्ट्राविरुद्ध गोव्याची लढत होईल. हे दोन्ही सामने जिंकल्यास गोव्याला बाद फेरी गाठता येईल. सध्या पाचपैकी चार सामने जिंकलेला पंजाब संघ १६ गुणांसह अव्वल आहे.
मुंबईनेही चार सामने जिंकत बाद फेरीसाठी दावा केला आहे. त्यांचेही १६ गुण झाले आहेत. महाराष्ट्राने (१.६३६) तीन सामने जिंकले असून सरस धावसरासरीत गोव्याला (-०.०२९) मागे टाकून तिसरा क्रमांक मिळविला आहे. मंगळवारी पंजाबने गोव्याला नमविल्यास त्यांची बाद फेरी जवळपास निश्चित होईल. गोव्याने अनुक्रमे छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, सिक्कीमला नमवून दणक्यात मोहिमेत सुरवात केली होती. नंतर बलाढ्य मुंबईविरुद्ध आणि नंतर उत्तराखंडविरुद्ध पराभूत झाल्यामुळे गोव्याची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.
फलंदाजीत गोव्याने समाधानकारक कामगिरी केलेली असली, तरी गोलंदाजीत निराशाजनक चित्र आहे. कर्नाटकी पाहुणा वासुकी कौशिक याने एकहाती खिंड लढविली आहे. या मध्यमगती गोलंदाजाने पाच सामन्यांत १६.३३च्या सरासरीने १२ गडी बाद केले आहेत. आणखी एक मध्यमगती कर्णधार दीपराज गावकरने २२.८०च्या सरासरीने १० विकेट मिळविल्या आहेत, मात्र उत्तराखंडविरुद्ध त्याला सूर न गवसल्यामुळे एकही बळी मिळाला नाही.
कौशिक व दीपराजने गडी बाद केलेले असले, तरी सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याची महागडी डावखुरी वेगवान गोलंदाजी गोव्यासाठी चिंताजनक ठरली आहे. तो दुखापतीमुळे छत्तीसगडविरुद्ध खेळला नाही, नंतर चारही लढती खेळला, पण एकही गडी बाद केलेला नाही. ३१ षटकांत त्याने २३९ धावा मोजल्या असून त्याची निराशाजनक गोलंदाजी गोव्याला महागात पडली आहे हे कामगिरीवरून जाणवते. पंजाबविरुद्ध अर्जुनला विश्रांती मिळणार की आणखी एक संधी दिली जाईल याकडे लक्ष असेल.
अर्जुन तेंडुलकरची चार सामन्यांतील गोलंदाजी
विरुद्ध कामगिरी
हिमाचलप्रदेश ६-०-५८-०
सिक्कीम ९-२-४९-०
मुंबई ८-०-७८-०
उत्तराखंड ८-०-५४-०
एकूण ३१-२-२३९-०
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.