पणजी: गोव्याचे ‘पाहुणे’ फलंदाज सलग चौथ्या डावात अपयशी ठरले, तसेच इतर अनुभवी फलंदाजांनीही साफ निराशा केली, फक्त नवोदित अभिनव तेजराणा यानेच झुंज दिली. त्यामुळे संघाला दुसऱ्या डावात धापा टाकत दोनशे धावांपर्यंत मजल मारली, पण मोठा पराभव टाळणे शक्य झाले नाही.
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या कॅप्टन के. थिम्मापिया मेमोरियल क्रिकेट स्पर्धेत छत्तीसगडने गुरुवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी दोनशे धावांची दणदणीत विजय नोंदविला. गोव्याचा हा स्पर्धेतील सलग दुसरा पराभव ठरला. अगोदरच्या लढतीत त्यांना मध्य प्रदेशने डाव व २१६ धावांनी हरविले होते. आता गोव्याचा स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना कर्नाटक इलेव्हन संघाविरुद्ध होईल.
अभिनव तेजराणा याने स्पर्धेच्या चार डावातील तिसरे अर्धशतक झळकावताना ९४ धावांची शैलीदार खेळी केली. गोव्यासमोर चारशे धावांचे आव्हान होते. गुरुवारी सकाळी त्यांचा डाव ५ बाद ४७ धावा असा गडगडला. नंतर अभिनवने दर्शन मिसाळ (२५) याच्यासमवेत सहाव्या विकेटसाठी ६६ धावांची, तर अर्जुन तेंडुलकर (नाबाद ४८) याच्यासह सातव्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केल्यामुळे गोव्याला किमान दोनशे धावा केल्याचे समाधान लाभले. अभिनवला शतक सहा धावांनी हुकले. पार्ट टाईम गोलंदाज संजीत देसाई याने त्याला पायचीत बाद केले. त्याने १६६ चेंडूंतील खेळीत सहा चौकार व एक षटकार मारला.
अभिनव तेजराणा हा फलंदाज मूळचा दिल्लीचा, पण मागील काही वर्षे तो बीसीसीआय वयोगट स्पर्धेत गोव्याकडून खेळत असून आता त्याची नोंदणी ‘स्थानिक’ झाली आहे. त्याची दमदार फलंदाजी गोव्यासाठी आश्वासक ठरत आहे. कॅप्टन के. थिम्मापिया मेमोरियल क्रिकेट स्पर्धेत या डावखुऱ्या फलंदाजाने चार डावात तीन अर्धशतकांसह ५३च्या सरासरीने २१२ धावा केल्या आहे. गतमोसमातील (२०२३-२४) २३ वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेत अभिनवने गोव्यातर्फे पाचशेहून जास्त धावा करून लक्ष वेधले होते. त्याने सहा सामन्यांत दोन शतके व एका अर्धशतकासह ४७.५८च्या सरासरीने ५७१ धावांची नोंद केली होती.
छत्तीसगडविरुद्धचा सामना अळूर-बंगळूर येथे झाला. यापूर्वी कर्नाटकचे प्रतिनिधित्व केलेले रोहन कदम व के. व्ही. सिद्धार्थ हे यंदा गोव्याचे ‘पाहुणे’ क्रिकेटपटू आहेत. त्यांच्यासाठी बंगळूर ‘घरचे’ मैदान आहे, पण या मैदानावरील दोन्ही सामन्यातील चारही डावांत त्यांना अपयश आले. रणजी करंडक स्पर्धेला महिनाभराचा अवधी असताना रोहन व सिद्धार्थ यांचा हरवलेला फॉर्म गोव्यासाठी चिंताजनक आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या कॅप्टन के. थिम्मापिया मेमोरियल क्रिकेट स्पर्धेतील दोन सामन्यांतील चार डावांत रोहनने १२.२५च्या सरासरीने ४९, तर सिद्धार्थने ११.२५च्या सरासरीने ४५ धावा केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.