
पणजी: डॉ. (कॅप्टन) के. थिम्माप्पिया स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य लढतीत गोव्याचा संघ पहिल्या डावातील महत्त्वपूर्ण आघाडीच्या वाटेवर आहे. यजमान कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना (केएससीए) सचिव संघ अजून ९३ धावांनी मागे असून फक्त दोन विकेट बाकी आहेत.
चार दिवसीय सामना अळूर येथील प्लेटिनम ओव्हल मैदानावर सुरू आहे. गोव्याने पहिल्या दिवसअखेरच्या ९ बाद ३२३ वरुन सर्वबाद ३३८ धावा केल्या, नंतर सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर सोमवारी केएससीए सचिव संघाची ८ बाद २४५ अशी स्थिती होती. ८९ धावांवर नाबाद असलेला यष्टिरक्षक-फलंदाज कृतिक कृष्णा याच्यावर त्यांची मदार आहे.
संघाची ५ बाद ९४ अशी नाजूक स्थिती असताना कृतिक याने सलामीचा लोचन गौडा (८८) याच्यासमवेत सहाव्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी करुन यजमान संघाला सावरले. पार्ट टाईम गोलंदाज अभिनव तेजराणा याने स्नेहल कवठणकर याच्याकरवी लोचन याला झेलबाद करून जोडी फोडली. कसोटीपटू करुण नायर फक्त तीन धावा करून बाद झाला. त्याला कौशिक याच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक समर दुभाषीने टिपले.
संक्षिप्त धावफलक : गोवा, पहिला डाव (९ बाद ३२३ वरुन) ः ९४.४ षटकांत सर्वबाद ३३८ (ललित यादव नाबाद ११३, वासुकी कौशिक ८, माधव बजाज ३-८८).
केएससीए सचिव, पहिला डाव ः ८३ षटकांत ८ बाद २४५ (लोचन गौडा ८८, फैझान खान २९, कृतिक कृष्णा नाबाद ८९, अर्जुन तेंडुलकर १७-३-५०-३, वासुकी कौशिक १८-९-२२-१, दर्शन मिसाळ १०-०-६२-०, मोहित रेडकर २२-३-६७-२, ललित यादव १२-३-२७-०, अभिनव तेजराणा ४-०-१४-१).
सचिन तेंडुलकर व राहुल द्रविड हे भारताचे दोन महान फलंदाज समकालीन. एकत्रितपणे त्यांनी देशासाठी अभिमानास्पद विक्रमी कामगिरी बजावताना कितीतरी संस्मरणीय भागीदारी रचल्या. सध्या त्यांचे सुपूत्र अळूर येथील मैदानावर प्रतिस्पर्धी आहेत. सचिनचा मुलगा २५ वर्षीय डावखुरा वेगवान अर्जुन गोव्यातर्फे यंदा चौथा मोसम खेळण्यासाठी सज्ज आहे, तर मध्यमगती गोलंदाजी टाकणारा राहुल यांचा पूत्र १९ वर्षीय समीत कर्नाटकचा नवोदित अष्टपैलू गणला जातो. सोमवारी ते दोघेही आमनेसामने आले, तेव्हा अर्जुनने समीतला बाद केले. वैयक्तिक नऊ धावांवर समीतने गोव्याच्या कश्यप बखले याच्या हाती झेल दिला. या लढतीच्या पहिल्या डावात अर्जुनने तीन गडी बाद केले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.