पणजी: गोव्याच्या रणजी क्रिकेट संघाच्या मोसमपूर्व स्पर्धात्मक तयारीला उद्या बुधवारपासून सुरूवात होत आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या डॉ (कॅप्टन) के. थिम्माप्पिया स्मृती क्रिकेट स्पर्धेत गोव्यासमोर खडतर प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान असेल.
अळूर-बंगळूर येथे बुधवारपासून गोव्याचा अ गटातील पहिला चार दिवसीय सामना मध्य प्रदेशविरुद्ध होईल. त्यानंतर ते ९ ते १२ सप्टेंबर या कालावधीत छत्तीसगडविरुद्ध, तर १४ ते १७ सप्टेंबर या कालावधीत यजमान कर्नाटक इलेव्हन संघाविरुद्ध खेळतील.
गतमोसमात निराशाजनक कामगिरी केल्यामुळे २०२४-२५ मोसमातील रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्याची प्लेट गटात रवानगी झाली आहे. गतमोसमात गोव्याच्या रणजी संघाला सातपैकी पाच सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता, तर दोन सामने अनिर्णित राहिले होते.
पुन्हा एलिट गटात स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या गोव्याकडून अव्वल कामगिरी अपेक्षित आहे. त्यादृष्टीने तयारीसाठी त्यांना डॉ (कॅप्टन) के. थिम्माप्पिया स्मृती क्रिकेट स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरेल. गोव्याची यावेळची रणजी मोहीम येत्या ११ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. मणिपूर, सिक्कीम, नागालँड, मिझोराम व अरुणाचल प्रदेश हे गोव्याचे गटातील प्रतिस्पर्धी आहे.
जीसीए लोकपाल यांच्याकडे गोवा रणजी क्रिकेट संघ व २३ वर्षांखालील क्रिकेट संघ प्रशिक्षक नियुक्ती प्रकरणी आव्हान याचिका वर्ग असल्याने कर्नाटक संघटना क्रिकेट स्पर्धेत दिनेश मोंगिया हे गोव्याच्या सीनियर संघाचे अंतरिम प्रशिक्षक असतील.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.