
मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने आयपीएलच्या यंदाच्या हंगामातही आपला जबरदस्त फॉर्म कायम ठेवला आहे. आयपीएल 2025 मध्ये खराब सुरुवातीनंतर दमदार पुनरागमन करणाऱ्या मुंबईला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यात सूर्याच्या दमदार फलंदाजीने महत्त्वाची भूमिका बजावली. लीगच्या शेवटच्या सामन्यात पंजाबविरुद्ध खेळताना सूर्याने विश्वविक्रम केला. सूर्याने टी-20 क्रिकेटमध्ये सलग सर्वाधिक वेळा एका डावात 25 किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा विक्रम केला. एवढेच नाहीतर त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडला.
दरम्यान, जयपूर येथे मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएलचा 69वा सामना खेळला जात आहे. दोन्ही संघांचा या हंगामातील लीग टप्प्यातील हा शेवटचा सामना आहे. तसेच, प्लेऑफमध्ये पहिले किंवा दुसरे स्थान गाठण्याच्या दृष्टीने दोन्ही संघासाठी हा सामना निर्णायक ठरणार आहे. अशा परिस्थितीत, पहिल्यांदा करताना मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने संघाला निराश केले नाही. गेल्या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावून संघाला प्लेऑफमध्ये नेणाऱ्या सूर्याने यावेळीही दमदार खेळी खेळली. त्याने संघाला मजबूत धावसंख्येपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
सहाव्या षटकात पहिली विकेट पडल्यानंतर मुंबईचा उपकर्णधार सूर्या मैदानावर आला. त्याने येताच चौकार मारुन खाते खोलले. यादरम्यान, सूर्याने 9व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारला, ज्यामुळे त्याची वैयक्तिक धावसंख्या 22 धावांवरुन 26 धावांवर पोहोचली. विशेष म्हणजे, सूर्याने या चौकाराच्या जोरावर इतिहास रचला. सूर्याने सलग 14व्या डावात 25 धावांचा टप्पा ओलांडला. यासह त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी टी-20 कर्णधार टेम्बा बावुमाला मागे टाकत नवा विश्वविक्रम केला. एवढेच नाहीतर आयपीएलच्या (IPL) इतिहासात पहिल्यांदाच एका फलंदाजाने लीग टप्प्यातील प्रत्येक सामन्यात 25 पेक्षा जास्त धावा केल्या.
तसेच, सूर्याने या चौकारासह 605 धावांचा टप्पाही ओलांडला. यापूर्वी, सूर्याने आयपीएल 2023 मध्ये 605 धावा केल्या होत्या, जी त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी होती. या हंगामात सूर्याने या धावसंख्येपेक्षा जास्त धावा केल्या. विशेष म्हणजे, त्याने मुंबईचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) विक्रमही मोडला. सचिनने 2010 च्या हंगामात 618 धावा केल्या होत्या, ज्या आयपीएलच्या गेल्या 17 हंगामात मुंबईच्या कोणत्याही फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावा होत्या. सूर्याने त्यालाही मागे सोडले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.