
यंदाच्या आयपीएल हंगामात (IPL 2025) मुंबईची शान सूर्या भाऊ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. यंदा खेळलेल्या प्रत्येक सामन्यात त्याने 25 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. आता त्याची नजर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमावर आहे, जो तो मोडण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. आता मुंबई इंडियन्स संघही प्लेऑफमध्ये पोहोचला आहे, त्यामुळे त्याच्यासाठी सचिनचा हा विक्रम मोडणे आणखी सोपे झाले आहे. विशेष म्हणजे, सचिनने हा विक्रम 2010 मध्ये केला होता, तेव्हापासून तो अबाधित आहे, पण आता 15 वर्षांनी तो मोडला जाईल असे दिसते.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. 2010 च्या आयपीएलमध्ये त्याने 15 सामन्यात 618 धावा केल्या होत्या. त्यावर्षी त्याने पाच अर्धशतके झळकावली होती. सचिनची सरासरी 47.53 होती आणि त्याने 132.61 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली होती. तेव्हापासून, कोणीही हा विक्रम मोडू शकलेला नाही. तथापि, 2023 च्या आयपीएलमध्ये सूर्या त्याच्या खूप जवळ पोहोचला होता. त्यावर्षी, सूर्याने 16 सामन्यांमध्ये 605 धावा केल्या होत्या. मात्र तो 618 पर्यंत पोहोचू शकला नव्हता.
आतापर्यंत, यावर्षी सूर्याने मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) 13 सामन्यांमध्ये 583 धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्याची सरासरी 72.87 असून 170 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी करत आहे. लीग स्टेजच्या उर्वरित सामन्यांमध्ये त्याला अजूनही 600 चा टप्पा ओलांडण्याची संधी आहे. यानंतर, प्लेऑफ सामन्यांमध्ये सचिन तेंडुलकरला मागे सोडेल. सूर्याला केवळ 36 धावांची गरज आहे.
दरम्यान, सूर्या देखील ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहे. आता त्याच्यापुढे केवळ दोन फलंदाज आहेत. साई सुदर्शन 617 धावा करुन पहिल्या स्थानी असून शुभमन गिल 601 धावा करुन दुसऱ्या स्थानी आहे. यानंतर सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर आहे. या तिन्ही फलंदाजांचे संघ प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत, त्यामुळे त्यांना अधिक सामने खेळण्याची संधी मिळेल. तथापि, संघ किती सामने खेळतील याबद्दल निश्चितपणे काहीही सांगता येत नाही. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सचिन तेंडुलकरचा हा विक्रम कधी मोडणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.