पणजी: गोव्याच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार, अष्टपैलू शिखा पांडे हिला ऑस्ट्रेलियातील आगामी वूमन्स बिग बॅश लीग (डब्ल्यूबीबीएल) स्पर्धेसाठी ब्रिस्बेन हिट्स संघाने ड्राफ्टद्वारे निवडले. यामुळे तिला या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पदार्पणाची संधी मिळाली आहे.
वूमन्स बिग बॅश लीग ड्राफ्ट निवडीद्वारे विविध संघांनी भारतातील सहा महिला क्रिकेटपटूंची निवड केली आहे. यामध्ये दीप्ती शर्मा व यास्तिका भाटिया (दोघी मेलबर्न स्टार्स), जेमिमा रॉड्रिग्ज व शिखा पांडे (दोघी ब्रिस्बेन हिट्स), स्मृती मानधना (अॅडलेड स्ट्रायकर्स) व डी. हेमलता (पर्थ स्कॉर्चर्स) यांचा समावेश आहे.
इंडियन वूमन्स लीग (आयडब्ल्यूएल) स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सकडून दोन मोसमात शिखा हिने १८ सामन्यांत १९ विकेट टिपल्या आहेत. गत ऑगस्ट महिन्यात तिने वूमन्स कॅरिबियन प्रीमियर लीग (डब्ल्यूसीपीएल) स्पर्धेत त्रिनबागो नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत शिखाने उपयुक्त योगदान करताना नव्या चेंडूने गोलंदाजी करत पाच सामन्यांत चार विकेट व फलंदाजीत ९० धावा अशी कामगिरी बजावली.
आंतरराष्ट्रीय पातळीवर २०१४ ते २०२३ या कालावधीत शिखा भारताकडून तीन कसोटी सामने (चार विकेट), ५५ एकदिवसीय सामने (७५ विकेट) व ६२ टी-२० सामने (४३ विकेट) खेळली आहे.
शिखा ऑगस्टमध्ये वेस्ट इंडीजमधील वूमन्स कॅरिबियन प्रीमियर लीग स्पर्धेत राष्ट्रीय संघातील सहकारी जेमिमा रॉड्रिग्ज हिच्या त्रिनबागो नाईट रायडर्स संघातर्फे खेळली होती. या स्पर्धेत तिचा संघ उपविजेता ठरला. भारतातील इंडियन वूमन्स लीग (आयडब्ल्यूएल) स्पर्धेत ती दिल्ली कॅपिटल्स संघाची २०२३ पासून सदस्य आहे. परदेशी लीग खेळणारी शिखा पहिली गोमंतकीय महिला क्रिकेटपटू आहे. यापूर्वी ती ऑस्ट्रेलियातील स्थानिक क्रिकेटमध्ये क्वीन्सलँड संघाकडून खेळली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.