
पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) माजी संघ प्रशिक्षकाकडून महिला क्रिकेटपटूंची झालेली कथित सतावणूक, अपमान व मानहानीचे पडसाद आता उमटू लागले आहेत. दीर्घानुभवी आंतरराष्ट्रीय अनुभवी अष्टपैलू शिखा पांडे हिला संघ सोडण्यासाठी ना हरकत दाखला (एनओसी) मिळाल्यानंतर आणखी एक प्रमुख खेळाडू गोव्याच्या संघाला सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात होती, मात्र संघटनेतील जबाबदार पदाधिकाऱ्यांची शिष्टाई सफल ठरल्यामुळे या उपयुक्त खेळाडूने राज्याकडून खेळण्याचे ठरविल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली.
संभाव्य सीनियर महिला संघाच्या मोसमपूर्व सराव शिबिरास सुरवात झाली आहे. शिखा पांडे हिने गोवा क्रिकेट संघासोबतचे नाते तोडताना कोणतेही अधिकृत कारण दिलेले नाही, मात्र गतमोसमात महिला क्रिकेटपटूंनी माजी प्रशिक्षकावर केलेल्या सतावणुकीच्या आरोपाची पार्श्वभूमी असल्याचे स्पष्ट आहे, असे जीसीए संबंधित सूत्राने सांगितले.
संघातील बरेच अनुभवी खेळाडू खूपच नाराज असून त्यापैकी एका महिला खेळाडूने संघ सोडून अन्यत्र खेळण्याबाबत आपला विचार जीसीए पदाधिकाऱ्यांना कळविला होता. या खेळाडूची जीसीएच्या जबाबदार पदाधिकाऱ्याने समजूत काढली. या महिला क्रिकेटपटूचे नाव उघड करण्यास सूत्राने नकार दिला.
सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याच्या वयोगट महिला संघातून खेळत असल्यापासून ही खेळाडू सातत्याने योगदान देत आहे. सीनियर संघातही ती प्रमुख खेळाडू बनली आहे. गतमोसमात माजी प्रशिक्षकाने फलंदाजी क्रमवारीबाबत आपल्यावर अन्याय केल्याची या महिला क्रिकेटपटूची भावना आहे. सलामीस किंवा मध्यफळीत फलंदाजीची क्षमता असूनही आपल्या अगदी खालच्या क्रमांकावर फलंदाजीस पाठविल्यामुळे ही खेळाडू संघ व्यवस्थापनावर चिडली होती. सूत्रानुसार, जीसीएने या खेळाडूस यापुढे सन्मानजनक वागणुकीचे आश्वासन देण्यात आले आहे.
२०२४-२५ मोसमात टी-२० स्पर्धेत खेळलेल्या गोव्याच्या संघातील शिखा पांडे हिच्यासह श्रेया परब, विनवी गुरव, सुनंदा येत्रेकर, तनया नाईक, दिव्या नाईक, मेताली गवंडर या प्रमुख खेळाडूंना एकदिवसीय स्पर्धेसाठी वगळण्यात आले होते. दरम्यान, यावेळचा सीनियर महिला क्रिकेट संघाचा देशांतर्गत मोसम आठ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. गोव्याचा संघ सीनियर महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत खेळणार असून त्यांचे सामने छत्तीसगडमधील रायपूर येथे ८ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत खेळले जातील.
प्राप्त माहितीनुसार, गोवा क्रिकेट असोसिएशनने इतर राज्यातील महिला क्रिकेटपटूंना गोव्याच्या संघातून ‘पाहुणे’ या नात्याने न खेळविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार, २०२३-२४ व २०२४-२५ मध्ये गोव्याकडून खेळलेली बडोद्याची अष्टपैलू तरन्नुम पठाण यंदा गोव्याचे प्रतिनिधित्व करण्याची शक्यता नाही. शिवाय गतमोसमातील मध्य प्रदेशची अष्टपैलू प्रीती यादव हिलाही गोव्याच्या संघात जागा मिळणे अशक्य आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये तब्बल १९ मोसम गोव्यातर्फे खेळल्यानंतर २०२५-२६ मोसमास बडोद्याकडून खेळण्यासाठी अनुभवी अष्टपैलू शिखा पांडे सज्ज झाल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार, आगामी सीनियर महिला क्रिकेट स्पर्धांसाठी बडोदा क्रिकेट असोसिएशनने ३६ वर्षीय शिखा हिच्याशी करार केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.