
पणजी: गोव्याची पहिली महिला कसोटी-आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू, भारताची नावाजलेली अष्टपैलू खेळाडू शिखा पांडे हिने सुमारे दोन दशके गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) प्रतिनिधित्व केल्यानंतर आगामी मोसमापूर्वी राज्यातील क्रिकेटला सोडचिठ्ठी दिली. संघ बदलण्यास संघटनेने तिला परवानगीही दिली आहे.
गोव्याच्या संघातर्फे न खेळण्याबाबत शिखा, तसेच राज्य क्रिकेट संघटनेने अधिकृत कारण दिलेले नाही, मात्र गतमोसमातील मानहानीने दुखावल्यामुळे नाराजीने तिने हा निर्णय घेतल्याचे सूत्राने सांगितले.
२००६-०७ पासून शिखा हिने गोव्याचे राष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार-खेळाडू या नात्याने प्रतिनिधित्व केले. आगामी मोसमात कोणत्या संघातर्फे खेळणार हे ३६ वर्षीय शिखा हिने नमूद केलेले नाही. येत्या सप्टेंबरमध्ये ती वेस्ट इंडीजमधील महिला कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये खेळणार आहे.
‘‘मी गोवा क्रिकेट असोसिएशनकडून ‘ना हरकत दाखला’ (एनओसी) घेतला आहे,’’ एवढेच शिखा हिने सांगितले, पण तिने या विषयावर अधिक भाष्य टाळले. जीसीएच्या प्रमुख पदाधिकाऱ्याने शिखाला ‘एनओसी’ देण्यात आल्याची माहिती दिली, परंतु त्यांनीही त्यासाठीचे कारण दिले नाही. ‘‘आगामी मोसमात शिखा गोव्यातर्फे खेळणार नाही, आम्ही काही दिवसांपूर्वीच तिला एनओसी पत्र दिले आहे,’’ असे या पदाधिकाऱ्याने सांगितले.
गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) २०२४-२५ मधील सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी संघात मोठे बदल केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या शिखा हिच्यासह सात अनुभवी प्रमुख खेळाडूंना जीसीएने संघात स्थान दिले नव्हते. गतमोसमात टी-२० स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूंनी समाधानकारक कामगिरी बजावली होती, तरीही त्यांना वगळण्यात आले होते. तेव्हा ‘जीसीए’तर्फे शिखा अनुपलब्ध असल्याचे कारण देण्यात आले होते. प्रत्यक्षात तिला संघातून वगळण्यात आल्याची तेव्हा चर्चा होती.
गतमोसमात गोव्याच्या सीनियर महिला क्रिकेट संघातील खेळाडूंनी तत्कालीन प्रशिक्षक-महिला क्रिकेट संचालकावर सतावणुकीचे आरोप केले होते. त्यानंतर जीसीए आमसभेतही हा विषय चांगलाच गाजला होता. जीसीएने अंतर्गत चौकशी समिती नेमून प्रकरणी चौकशी केली होती. समितीच्या अहवालानंंतर संबंधित प्रशिक्षकाला ‘क्लीन चिट’ दिल्याचे ‘जीसीए’ने सांगितले होते. प्रत्यक्षात एकंदरीत प्रकरणात राज्यातील महिला क्रिकेटपटू खूपच दुखावल्या होत्या, असे सूत्राने सांगितले होते.
प्राप्त माहितीनुसार, गतमोसमात आरोप झालेल्या महिला क्रिकेट संचालकाची जबाबदारी पाहणाऱ्या संबंधित प्रशिक्षकाला ‘जीसीए’ने यंदा पदावरून दूर केले आहे. सूत्राने सांगितले, की शिखा, तसेच इतर प्रमुख महिला क्रिकेटपटूंची ‘जीसीए’ पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन चर्चा केली. महिला क्रिकेट संरचनेतील बदलाची माहिती दिली, तसेच आगामी मोसमात या खेळाडूंना पुन्हा संघ निवड प्रक्रियेत सामावून घेण्याची ग्वाही दिली, पण अपमानास्पद वागणूक मिळाल्याने दुखावलेली शिखा गोवा क्रिकेट संघ सोडण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहिली, असे सूत्राने सांगितले.
शिखा ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी गोव्याची पहिली महिला क्रिकेटपटू आहे. तिची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकीर्द दशकभराची असून २०१४ साली तिने भारतीय संघात पदार्पण केले. कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
गोवा, दक्षिण विभाग, चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेत तिने संघाचे नेतृत्व केले असून वूमन्स प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे सलग तीन वर्षे प्रतिनिधित्व केले असून या संघाने दोन वेळा अंतिम फेरीपर्यंत मजल मारली.
शिखा भारतातर्फे तीन कसोटी सामने, ५५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने, ६२ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळली आहे. ती वेगवान गोलंदाज असून उपयुक्त बॅटरही आहे. कसोटीत तिने चार, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ७५, तर टी-२० क्रिकेटमध्ये ४३ विकेट टिपल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शिखाने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका सामन्यात अर्धशतक आणि तीन विकेट असे अष्टपैलूत्व प्रदर्शित करणारी शिखा पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिच्या नावावर एकूण १२२ विकेट आहेत.
महिलांच्या विश्वकरंडकात शिखा एक वेळ एकदिवसीय, तर चार वेळा टी-२० स्पर्धांत खेळली आहे. यामध्ये दोन वेळा उपविजेतेपद आणि एक वेळ उपांत्य फेरी अशी कामगिरी भारतीय संघाने बजावली. २०१९ मध्ये आयसीसी एकदिवसीय संघात तिला निवडण्यात आले होते.
परदेशी महिला लीगमध्ये २०२५ मध्ये शिखा हिला महिला कॅरिबियन प्रीमियर लीगसाठी त्रिनबागो नाईट रायडर्स संघाने सलग दुसऱ्या वर्षी निवडले. शिवाय ती ऑस्ट्रेलियातील महिला बिग बॅश, न्यूझीलंडमधील लीग स्पर्धेतही खेळली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.